शास्ते १३:१-२५

  • मानोहा आणि त्याच्या बायकोला एक स्वर्गदूत भेटतो (१-२३)

  • शमशोनचा जन्म (२४, २५)

१३  इस्राएली लोक पुन्हा एकदा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करू लागले.+ म्हणून यहोवाने त्यांना ४० वर्षांसाठी पलिष्टी लोकांच्या हवाली केलं.+ २  त्या काळात, सरा+ या शहरात दान+ वंशातला एक माणूस राहत होता. त्याचं नाव मानोहा+ होतं. त्याची बायको वांझ असून तिला एकही मूलबाळ नव्हतं.+ ३  एक दिवस, यहोवाचा स्वर्गदूत त्या स्त्रीसमोर प्रकट झाला आणि तिला म्हणाला: “तू जरी वांझ असलीस आणि तुला मूलबाळ नसलं, तरी आता तू गरोदर राहशील आणि एका मुलाला जन्म देशील.+ ४  म्हणून आता काळजी घे. द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नकोस.+ आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस.+ ५  बघ! तू नक्की गरोदर राहशील आणि एका मुलाला जन्म देशील. त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नकोस,+ कारण तो मुलगा जन्मापासून* देवाचा नाझीर* असेल. आणि तोच इस्राएलला पलिष्टी लोकांच्या हातून वाचवेल.”+ ६  मग त्या स्त्रीने आपल्या नवऱ्‍याकडे जाऊन त्याला सर्वकाही सांगितलं. ती म्हणाली: “खऱ्‍या देवाचा एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याचं स्वरूप अतिशय तेजस्वी, खऱ्‍या देवाच्या स्वर्गदूतासारखं होतं! तो कुठून आला होता हे मी त्याला विचारलं नाही. आणि त्यानेही मला त्याचं नाव सांगितलं नाही.+ ७  पण तो मला म्हणाला: ‘तू गरोदर राहशील आणि एका मुलाला जन्म देशील. म्हणून आता काळजी घे. द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नकोस. आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. कारण तो मुलगा जन्मापासून* मरेपर्यंत देवाचा नाझीर होईल.’” ८  हे ऐकून मानोहाने यहोवाला प्रार्थनेत अशी विनवणी केली: “हे यहोवा, तू ज्या माणसाला पाठवलं होतंस, त्या खऱ्‍या देवाच्या माणसाला कृपा करून परत एकदा आमच्याकडे पाठव. म्हणजे जे मूल जन्माला येणार आहे त्याचं पालनपोषण आम्ही कसं करायचं हे तो आम्हाला सांगेल.” ९  खऱ्‍या देवाने मानोहाची ही विनंती ऐकली. मानोहाची बायको बाहेर शेतात बसली होती, तेव्हा खऱ्‍या देवाचा माणूस पुन्हा एकदा तिच्याकडे आला. पण तिचा नवरा त्या वेळी तिच्यासोबत नव्हता. १०  म्हणून ती लगेच धावत जाऊन आपल्या नवऱ्‍याला म्हणाली: “अहो! त्या दिवशी जो माणूस माझ्यासमोर प्रकट झाला होता, तो परत आलाय.”+ ११  तेव्हा मानोहा आपल्या बायकोसोबत त्या माणसाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “त्या दिवशी माझ्या बायकोशी बोललात ते तुम्हीच का?” त्यावर तो म्हणाला: “हो, मीच तो.” १२  मग मानोहा म्हणाला: “तुम्ही जसं म्हणालात तसंच घडो! पण मला सांगा, त्या मुलाचं जीवन कसं असेल आणि तो काय करेल?”+ १३  त्यावर यहोवाचा स्वर्गदूत मानोहाला म्हणाला: “मी तुझ्या बायकोला ज्या-ज्या गोष्टींपासून दूर राहायला सांगितलं, त्यांपासून तिने दूर राहावं.+ १४  तिने द्राक्षं किंवा द्राक्षांपासून बनलेला कोणताही पदार्थ खाऊ नये. आणि द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नये.+ शिवाय, तिने कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये.+ मी जे काही तिला सांगितलंय, ते सगळं तिने काळजीपूर्वक पाळावं.” १५  मग मानोहा यहोवाच्या स्वर्गदूताला म्हणाला: “आम्ही तुमच्यासाठी एक करडू* कापतो आणि त्याचं मांस शिजवून आणतो.+ तोपर्यंत थोडा वेळ थांबा.” १६  पण यहोवाचा स्वर्गदूत मानोहाला म्हणाला: “मी थांबलो तरी जेवणार नाही. पण तुझी इच्छा असेल, तर तू यहोवासाठी होमार्पण देऊ शकतोस.” तो यहोवाचा स्वर्गदूत होता हे मानोहाला माहीत नव्हतं. १७  मग मानोहा यहोवाच्या स्वर्गदूताला म्हणाला: “तुमचं नाव काय ते आम्हाला सांगा.+ म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं घडल्यावर आम्ही तुमचा आदर-सन्मान करू.” १८  पण यहोवाचा स्वर्गदूत त्याला म्हणाला: “माझं नाव विचारू नकोस, कारण ते अगदी विलक्षण आहे.” १९  मग मानोहाने एका खडकावर यहोवाला अन्‍नार्पण आणि एक करडू अर्पण केलं. तेव्हा देवाने मानोहा आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यांदेखत एक अद्‌भुत गोष्ट केली. २०  वेदीवरून आगीचे लोट वर आकाशाकडे जाऊ लागले, तेव्हा आगीच्या त्या लोटांसोबत यहोवाचा स्वर्गदूतही वर जाऊ लागला. ते पाहून मानोहा आणि त्याची बायको यांनी लगेच जमिनीवर पडून दंडवत घातला. २१  त्या वेळी मानोहाला समजलं की तो यहोवाचा स्वर्गदूत होता.+ त्यानंतर यहोवाचा स्वर्गदूत पुन्हा कधीही मानोहासमोर आणि त्याच्या बायकोसमोर प्रकट झाला नाही. २२  मानोहा आपल्या बायकोला म्हणाला: “आता आपण नक्कीच मरणार, कारण आपण देवाला पाहिलंय!”+ २३  पण त्याची बायको त्याला म्हणाली: “यहोवाला जर आपल्याला मारून टाकायचं असतं, तर त्याने आपल्या हातून होमार्पण आणि अन्‍नार्पण स्वीकारलंच नसतं.+ त्याने या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या आणि यांपैकी कुठल्याही गोष्टी आपल्याला सांगितल्या नसत्या.” २४  काही काळाने, त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव शमशोन ठेवलं.+ तो मुलगा वाढत गेला आणि यहोवा त्याला आशीर्वादित करत राहिला. २५  पुढे शमशोन जेव्हा सरा आणि अष्टावोल+ यांच्या मधे असलेल्या महने-दान+ या ठिकाणी होता, तेव्हा यहोवाची पवित्र शक्‍ती* त्याच्यावर जोरदारपणे कार्य करू लागली.+

तळटीपा

शब्दशः “गर्भापासून.”
शब्दशः “गर्भापासून.”
किंवा “बकरीचं पिल्लू.”