शास्ते १४:१-२०

  • शमशोन न्यायाधीश पलिष्टी मुलगी पाहतो (१-४)

  • शमशोन यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने सिंहाला मारतो (५-९)

  • लग्नाच्या वेळी शमशोनने घातलेलं कोडं (१०-१९)

  • शमशोनची बायको त्याच्या सोबत्याला देण्यात येते (२०)

१४  नंतर शमशोन तिम्ना इथे गेला. तिथे त्याला एक पलिष्टी मुलगी दिसली. २  मग तो आपल्या घरी गेला आणि आईवडिलांना म्हणाला: “तिम्नामध्ये मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे. मला ती बायको करून द्या.” ३  पण त्याचे आईवडील त्याला म्हणाले: “तुला काय आपल्या सगळ्या नातेवाइकांमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये मुलगी मिळाली नाही का?+ तू त्या सुंता* न झालेल्या पलिष्टी लोकांची मुलगी बायको करायला का निघालास?” पण शमशोन आपल्या वडिलांना म्हणाला: “माझं तिच्याशीच लग्न लावून द्या. तीच माझ्यासाठी योग्य आहे.” ४  अर्थात, हे सगळं यहोवा घडवून आणत आहे हे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं नाही. कारण तो* पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची संधी पाहत होता. त्या काळात, पलिष्टी लोक इस्राएली लोकांवर राज्य करत होते.+ ५  मग शमशोन आपल्या आईवडिलांसोबत तिम्ना इथे गेला. तो जेव्हा तिम्नाच्या द्राक्षमळ्यांजवळ पोहोचला, तेव्हा अचानक एक सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. ६  त्याच वेळी, यहोवाची पवित्र शक्‍ती* शमशोनवर जोरदारपणे कार्य करू लागली.+ आणि एखाद्या बकरीच्या पिल्लाला फाडून टाकावं, तसं त्याने आपल्या हातांनी त्या सिंहाला फाडून त्याचे दोन तुकडे केले. पण त्याबद्दल त्याने आपल्या आईवडिलांना काहीच सांगितलं नाही. ७  मग तो तिम्ना इथे गेला आणि त्या मुलीशी बोलला. तेव्हा तीच आपल्यासाठी योग्य आहे याची त्याला खातरी पटली.+ ८  काही दिवसांनी, शमशोन त्या मुलीला आपल्या घरी आणण्यासाठी तिम्नाला जायला निघाला.+ रस्त्याने जात असताना तो त्या मेलेल्या सिंहाला बघायला गेला. आणि तिथे त्याला सिंहाचा सांगाडा दिसला. त्यात त्याला मधाने भरलेलं मधमाश्‍यांचं पोळं दिसलं. ९  त्यातला काही मध काढून त्याने हातात घेतला आणि तो खात-खात रस्त्याने जाऊ लागला. मग आईवडिलांना गाठल्यावर त्याने त्यांनाही काही मध खायला दिला. पण, आपण सिंहाच्या सांगाड्यातून हा मध काढला आहे हे त्याने आपल्या आईवडिलांना सांगितलं नाही. १०  शमशोन आपल्या वडिलांसोबत मुलीच्या घरी गेला आणि तिथे त्याने एक मोठी मेजवानी ठेवली; नवऱ्‍या मुलाने अशी मेजवानी ठेवण्याची त्या काळात प्रथाच होती. ११  शमशोन तिथे आला तेव्हा त्याच्या सोबतीला ३० तरुण देण्यात आले. १२  मग शमशोन त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला एक कोडं घालतो. मेजवानीच्या या सात दिवसांत तुम्ही ते सोडवलं आणि त्याचं अचूक उत्तर दिलं, तर मी तुम्हाला मलमलीच्या* कापडाचे ३० अंगरखे आणि कपड्यांचे ३० जोड देईन. १३  पण जर तुम्हाला ते कोडं सोडवता आलं नाही, तर मलमलीचे ३० अंगरखे आणि कपड्यांचे ३० जोड तुम्हाला मला द्यावे लागतील.” त्यावर ते त्याला म्हणाले: “सांग तुझं कोडं. आम्हाला ऐकू तर दे.” १४  तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला: “खाणाऱ्‍यातून मिळालं खाण्यासाठी,बलवानातून निघालं ते मधुर अति.”+ पण तीन दिवसांपर्यंत त्यांना ते कोडं काही सोडवता आलं नाही. १५  मग चौथ्या दिवशी ते शमशोनच्या बायकोला म्हणाले: “काहीतरी युक्‍ती करून+ तुझ्या नवऱ्‍याकडून कोड्याचं उत्तर काढून घे. नाहीतर, आम्ही तुला आणि तुझ्या वडिलांच्या घराण्याला जाळून टाकू. तू काय आमची मालमत्ता लुटायला आम्हाला इथे बोलवलंस?” १६  म्हणून शमशोनची बायको त्याच्यापुढे रडून त्याला म्हणू लागली: “तुमचं माझ्यावर मुळीच प्रेम नाही.+ तुम्ही माझा तिरस्कार करता. म्हणूनच तर तुम्ही माझ्या लोकांना कोडं घालून त्याचं उत्तर मला सांगत नाही.” त्यावर तो तिला म्हणाला: “मी माझ्या आईवडिलांनाही सांगितलं नाही, तर तुला का सांगू?” १७  पण, मेजवानीच्या सातव्या दिवसापर्यंत ती त्याच्यापुढे रडत राहिली. तिने त्याला इतकी गळ घातली, की शेवटी सातव्या दिवशी त्याने तिला त्या कोड्याचं उत्तर सांगून टाकलं. त्यानंतर तिने ते उत्तर आपल्या लोकांना जाऊन सांगितलं.+ १८  मग सातव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी* शहरातली माणसं त्याच्याकडे आली आणि त्याला म्हणाली: “मधापेक्षा मधुर काय असू शकतं? आणि सिंहापेक्षा बलवान कोण असू शकतो?”+ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माझी गाय नांगराला जुंपली नसती,+तर तुम्हाला कधीच हे कोडं सोडवता आलं नसतं.” १९  मग यहोवाची पवित्र शक्‍ती शमशोनवर कार्य करू लागली+ आणि तो अष्कलोनला+ गेला. तिथे त्याने ३० माणसांना ठार मारलं. त्याने त्यांचे कपडे काढून घेतले आणि कोडं सोडवणाऱ्‍यांना ते दिले.+ त्यानंतर तो रागारागाने आपल्या वडिलांच्या घरी निघून गेला. २०  मग शमशोनच्या बायकोचं+ लग्न त्याच्या सोबतीला असलेल्या तरुणांपैकी एकाशी लावून देण्यात आलं.+

तळटीपा

हे बहुतेक देवाला सूचित करतं.
किंवा कदाचित, “तो आतल्या खोलीत जाण्यापूर्वी.”