शास्ते १५:१-२०

  • शमशोन पलिष्टी लोकांचा बदला घेतो (१-२०)

१५  मग काही काळाने गव्हाच्या कापणीच्या हंगामात, शमशोन एक बकरीचं पिल्लू घेऊन आपल्या बायकोला भेटायला गेला. तो म्हणाला: “मला माझ्या बायकोच्या खोलीत* जायचंय.” पण तिच्या वडिलांनी त्याला आत जाऊ दिलं नाही. २  ते त्याला म्हणाले: “मला वाटलं, की तू तिचा तिरस्कार करतोस.+ म्हणून मी तिचं लग्न तुझ्या सोबत्याशी लावून दिलं.+ पण बघ! तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षाही सुंदर आहे. तू तिच्याशी लग्न कर.” ३  त्यावर शमशोन म्हणाला: “या वेळेस मी पलिष्टी लोकांचं नुकसान केलं, तर ते माझ्यावर दोष लावू शकणार नाहीत.” ४  त्यानंतर शमशोन तिथून निघाला आणि त्याने ३०० कोल्हे पकडले. त्याने दोन-दोन कोल्ह्यांच्या शेपट्या एकमेकांना बांधल्या आणि त्यांत एक मशाल अडकवली. ५  मग त्याने मशाली पेटवल्या आणि पलिष्टी लोकांच्या उभ्या पिकांत कोल्ह्यांना सोडून दिलं. त्याने धान्याच्या पेंढ्या, शेतांतलं उभं पीक, द्राक्षमळे आणि जैतुनाच्या बागा असं सगळं काही जाळून टाकलं. ६  “हे कोणी केलं?” असं पलिष्टी लोक विचारू लागले, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की “तिम्नामध्ये राहणाऱ्‍या एका माणसाच्या जावयाने, शमशोनने हे केलंय. कारण, त्याच्या सासऱ्‍याने त्याची बायको त्याच्या सोबत्याला देऊन टाकली.”+ हे ऐकल्यावर पलिष्टी लोकांनी जाऊन त्या मुलीला आणि तिच्या वडिलांना जाळून टाकलं.+ ७  तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला: “तुम्ही असं वागलात, तर आता मीही बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.”+ ८  मग त्याने त्यांच्यातल्या एकेकाला मारून त्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली. त्यानंतर तो एटाम खडकांतल्या एका गुहेत* जाऊन राहिला. ९  नंतर पलिष्टी लोकांनी यहूदामध्ये येऊन छावणी केली आणि लेहीवर+ हल्ला केला. १०  तेव्हा यहूदाचे लोक त्यांना म्हणाले: “तुम्ही आमच्या विरोधात का उठलात?” त्यावर ते म्हणाले: “आम्ही शमशोनला पकडायला आलोय. त्याने आमचं जसं केलं, तसंच आता आम्हीही त्याचं करू.” ११  तेव्हा यहूदातली ३,००० माणसं एटाम खडकांतल्या गुहेकडे गेली आणि शमशोनला म्हणाली: “आपल्यावर पलिष्टी लोकांचं राज्य आहे हे तुला माहीत आहे ना?+ मग असं वागून तू आमच्यावर संकट का आणलंस?” त्यावर तो त्यांना म्हणाला: “ते माझ्याशी जसं वागले, तसंच मी त्यांच्याशी वागलो.” १२  पण ते त्याला म्हणाले: “आम्ही तुला पकडून* पलिष्टी लोकांच्या हवाली करायला आलो आहोत.” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला: “तुम्ही मला मारून टाकणार नाही अशी शपथ आधी घ्या.” १३  ते त्याला म्हणाले: “आम्ही तुला मारून टाकणार नाही. फक्‍त तुला बांधून त्यांच्या हवाली करू.” मग त्यांनी शमशोनला दोन नवीन रश्‍शांनी बांधून खडकांतल्या गुहेतून बाहेर आणलं. १४  तो लेही इथे आला तेव्हा त्याला पाहून पलिष्टी लोकांनी आपल्या विजयाचा जयघोष केला. त्या वेळी यहोवाची पवित्र शक्‍ती* शमशोनवर कार्य करू लागली+ आणि त्याच्या हातांना बांधलेल्या रश्‍शा, जळलेल्या दोरांसारख्या झाल्या आणि गळून पडल्या.+ १५  तेव्हा शमशोनला, नुकत्याच मेलेल्या एका गाढवाच्या जबड्याचं हाड सापडलं. ते घेऊन त्याने १,००० पलिष्टी माणसांना मारून टाकलं.+ १६  मग शमशोन म्हणाला: “गाढवाच्या जबड्याने रचले मी उंच ढिगार! गाढवाच्या जबड्याने मारली मी माणसं हजार.”+ १७  त्यानंतर त्याने जबड्याचं ते हाड फेकून दिलं आणि त्या जागेला रामाथ-लेही*+ असं नाव दिलं. १८  मग शमशोनला खूप तहान लागली. तेव्हा त्याने यहोवाचा धावा करून म्हटलं: “तुझ्या या सेवकाला तू इतका मोठा विजय मिळवून दिलास. पण आता मी तहानेने व्याकूळ होऊन मरावं आणि सुंता न झालेल्या लोकांच्या हाती पडावं काय?” १९  तेव्हा देवाने लेही इथे एक खड्डा खोदला आणि त्यातून पाणी वाहू लागलं.+ ते पाणी प्यायल्यावर शमशोनच्या जिवात जीव आला आणि तो ताजातवाना झाला. म्हणून त्याने त्या जागेचं नाव एन-हक्कोरे* असं ठेवलं. ते आजही लेही इथे आहे. २०  शमशोनने पलिष्टी लोकांच्या काळात २० वर्षं इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं.+

तळटीपा

किंवा “आतल्या खोलीत.”
किंवा “कपारीत.”
किंवा “बांधून.”
म्हणजे, “जबड्याची टेकडी.”
म्हणजे, “धावा करणाऱ्‍याचा झरा.”