शास्ते १७:१-१३

  • मीखाने बनवलेल्या मूर्ती आणि त्याचा याजक (१-१३)

१७  एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात+ मीखा नावाचा एक माणूस राहायचा. २  तो आपल्या आईला म्हणाला: “तुला आठवतं, कोणीतरी तुझे १,१०० चांदीचे तुकडे चोरले होते आणि माझ्यासमोर तू त्याला शाप देत होतीस? ते माझ्याकडे आहेत. खरंतर मीच ते घेतले होते.” त्यावर त्याची आई त्याला म्हणाली: “माझ्या बाळा, यहोवा तुला आशीर्वाद देवो.” ३  मग त्याने ते १,१०० चांदीचे तुकडे आपल्या आईला परत दिले. पण त्याची आई म्हणाली: “ही चांदी मी यहोवाला समर्पित करते. यापासून तुझ्यासाठी एक कोरीव मूर्ती आणि एक धातूची मूर्ती बनव.+ मग ही चांदी तुझी होईल.” ४  त्याने ते चांदीचे तुकडे आपल्या आईला परत केले, तेव्हा त्यातले २०० तुकडे घेऊन तिने सोनाराला दिले. सोनाराने त्यांपासून एक कोरीव मूर्ती आणि एक धातूची मूर्ती बनवली. मग त्या मूर्ती मीखाच्या घरात ठेवण्यात आल्या. ५  मीखा नावाच्या या माणसाचं एक देवघर होतं. त्याने कुलदैवतांच्या मूर्ती*+ आणि एक एफोद*+ बनवलं आणि आपल्या एका मुलाला याजक म्हणून नेमलं.+ ६  त्या काळात इस्राएलवर कोणीही राजा नव्हता.+ प्रत्येक जण स्वतःला योग्य वाटेल तसं करायचा.+ ७  यहूदातल्या बेथलेहेम+ शहरात एक तरुण राहायचा. तो एक लेवी+ असून काही काळापासून यहूदाच्या लोकांमध्ये राहत होता. ८  एक दिवस, त्या तरुणाने यहूदातलं बेथलेहेम शहर सोडलं आणि राहण्यासाठी तो दुसरं एक ठिकाण शोधायला निघाला. प्रवास करत करत तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात राहत असलेल्या मीखाच्या घरी पोहोचला.+ ९  तेव्हा मीखाने त्याला विचारलं: “तू कुठून आलास?” तो म्हणाला: “मी यहूदातल्या बेथलेहेममधून आलोय. मी एक लेवी आहे आणि राहण्यासाठी कुठे जागा मिळते का ते शोधतोय.” १०  त्यावर मीखा त्याला म्हणाला: “माझ्याकडेच राहा आणि याजक व सल्लागार* म्हणून माझ्यासाठी काम कर. मी तुला वर्षाला चांदीचे दहा तुकडे आणि कपड्यांचा एक जोड देईन. तसंच तुझ्या खाण्या-पिण्याची व्यवस्थाही करीन.” हे ऐकून तो लेवी त्याच्या घरात गेला. ११  मग तो लेवी मीखाच्या घरात राहायला तयार झाला आणि तो मीखाला आपल्या मुलासारखाच झाला. १२  मीखाने त्या लेवीला आपला याजक म्हणून नेमलं.+ आणि तो मीखाच्या घरात राहू लागला. १३  मीखा म्हणाला: “लेवी वंशाचा माणूस माझा याजक असल्यामुळे यहोवा माझं भलं करेल अशी आता मला खातरी आहे.”

तळटीपा

किंवा “तेराफीम मूर्ती.”
किंवा “वडील.”