शास्ते २:१-२३

  • यहोवाच्या स्वर्गदूताने दिलेला इशारा (१-५)

  • यहोशवाचा मृत्यू (६-१०)

  • इस्राएलला वाचवण्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक (११-२३)

 मग यहोवाचा स्वर्गदूत+ गिलगाल+ इथून निघाला आणि बोखीममध्ये आला. तो इस्राएली लोकांना म्हणाला: “मी तुम्हाला इजिप्तमधून* बाहेर काढलं, आणि जो देश तुमच्या पूर्वजांना द्यायचं वचन दिलं होतं, त्या देशात तुम्हाला आणलं.+ मी तुम्हाला असंही म्हणालो होतो: ‘मी तुमच्यासोबत जो करार केला, तो मी कधीच मोडणार नाही.+ २  या देशातल्या लोकांसोबत करार करू नका.+ त्यांच्या वेदी पाडून टाका.’+ पण, तुम्ही माझं ऐकलं नाही.+ तुम्ही असं का केलं? ३  म्हणून मी म्हणालो होतो त्याप्रमाणे, ‘मी त्यांना तुमच्यासमोरून हाकलून देणार नाही;+ ते तुम्हाला आपल्या जाळ्यात अडकवतील+ आणि तुम्ही बहकून त्यांच्या दैवतांची उपासना करू लागाल.’”+ ४  यहोवाच्या स्वर्गदूताने इस्राएली लोकांना हे सांगितलं, तेव्हा ते मोठ्याने रडू लागले. ५  त्यामुळे, त्यांनी त्या जागेचं नाव बोखीम* ठेवलं आणि तिथे यहोवाला बलिदान अर्पण केलं. ६  यहोशवाने इस्राएली लोकांना पाठवून दिलं, तेव्हा ते आपापल्या वारशाच्या प्रदेशाचा ताबा घ्यायला निघून गेले.+ ७  यहोशवा जिवंत असेपर्यंत, तसंच त्याच्या मृत्यूनंतर मागे राहिलेले वडीलजन जिवंत असेपर्यंत, इस्राएली लोक यहोवाची उपासना करत राहिले. यहोवाने इस्राएलसाठी केलेल्या मोठमोठ्या गोष्टी या वडीलजनांनी पाहिल्या होत्या.+ ८  मग यहोवाचा सेवक, म्हणजे नूनचा मुलगा यहोशवा वयाच्या ११० व्या वर्षी मरण पावला.+ ९  लोकांनी त्याला तिमनाथ-हेरेस+ इथे त्याच्या वारशाच्या प्रदेशात पुरलं; हे ठिकाण, गाश पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ भागात आहे.+ १०  ती संपूर्ण पिढी मरण पावली.* त्यानंतर, अशी एक पिढी जन्माला आली जिला यहोवाची ओळख नव्हती किंवा त्याने इस्राएलसाठी केलेल्या गोष्टींची माहिती नव्हती. ११  त्यामुळे, इस्राएली लोकांनी यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते केलं, आणि ते बआल दैवतांची पूजा करू लागले.+ १२  ज्या देवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं होतं त्या त्यांच्या पूर्वजांच्या देवाला, यहोवाला त्यांनी सोडून दिलं.+ ते त्यांच्या आसपास राहणाऱ्‍या लोकांच्या दैवतांमागे लागले+ आणि त्यांच्या पाया पडू लागले. असं करून त्यांनी यहोवाचा क्रोध भडकवला.+ १३  त्यांनी यहोवाला सोडून दिलं आणि ते बआल व अष्टारोथच्या मूर्तींची पूजा करू लागले.+ १४  म्हणून, इस्राएली लोकांवर यहोवाचा क्रोध भडकला. त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिलं* आणि लुटारूंनी त्यांना लुटलं.+ देवाने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हवाली केलं,+ आणि ते आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरू शकले नाहीत.+ १५  यहोवाने म्हटलं होतं आणि यहोवाने शपथ घेतली होती त्याप्रमाणेच घडलं.+ यहोवा त्यांच्या विरोधात असल्यामुळे, ते जिथे कुठे जायचे तिथे तो त्यांच्यावर संकटं आणायचा,+ आणि त्यांचं जीवन दुःखाने भरून जायचं.+ १६  मग, यहोवा त्यांच्यासाठी न्यायाधीश नेमायचा, आणि हे न्यायाधीश त्यांना लुटारूंच्या हातून वाचवायचे.+ १७  पण, इस्राएली लोक त्या न्यायाधीशांचंही ऐकायचे नाहीत; ते इतर दैवतांची उपासना करायचे* आणि त्यांच्या पाया पडायचे. त्यांचे पूर्वज ज्या मार्गाने चालले त्यापासून ते लगेच बहकले. त्यांच्या पूर्वजांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्या;+ पण यांनी मात्र त्या पाळल्या नाहीत. १८  त्यांच्यावर जुलूम करणाऱ्‍या+ आणि त्यांना वाईट वागणूक देणाऱ्‍या लोकांमुळे ते कण्हायचे, तेव्हा यहोवाला त्यांची दया यायची.+ आणि त्यांना वाचवण्यासाठी यहोवा न्यायाधीश नेमायचा.+ त्या न्यायाधीशाच्या संपूर्ण जीवनकाळात यहोवा त्याच्यासोबत राहून इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवायचा. १९  पण, न्यायाधीशाचा मृत्यू झाल्यानंतर इस्राएली लोक परत इतर दैवतांच्या मागे लागून त्यांची उपासना करायचे आणि त्यांच्या पाया पडायचे.+ अशा रितीने, ते आपल्या वाडवडिलांपेक्षाही जास्त वाईट वागायचे. इस्राएली लोकांनी आपली वाईट कामं आणि आपला हट्टी स्वभाव सोडला नाही. २०  शेवटी यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला,+ आणि तो म्हणाला: “मी यांच्या पूर्वजांशी जो करार केला होता तो या राष्ट्राने मोडला आहे,+ आणि माझ्या आज्ञा त्यांनी पाळल्या नाहीत.+ २१  म्हणून, यहोशवाच्या मृत्यूनंतर या देशात जी शत्रू राष्ट्रं उरली आहेत त्यांपैकी एकही राष्ट्र मी त्यांच्यापुढून घालवून देणार नाही.+ २२  इस्राएली लोक आपल्या पूर्वजांप्रमाणे यहोवाच्या मार्गाने चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी असं करीन.”+ २३  म्हणूनच, यहोवाने त्या राष्ट्रांना राहू दिलं. त्याने त्यांना लगेच हाकलून दिलं नाही, किंवा त्यांना यहोशवाच्याही हाती दिलं नाही.

तळटीपा

किंवा “मिसरमधून.”
म्हणजे, “शोक करणारे.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाली.”
शब्दशः “विकलं.”
किंवा “इतर दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायचे.”