शास्ते २१:१-२५

  • बन्यामीन वंश वाचवला जातो (१-२५)

२१  इस्राएली लोकांनी मिस्पा+ इथे शपथ घेतली होती, की “आपल्यापैकी कोणीही बन्यामिनी माणसांशी आपल्या मुलींची लग्नं लावून देणार नाही.”+ २  नंतर इस्राएली लोक बेथेल इथे गेले.+ तिथे ते खऱ्‍या देवासमोर बसून संध्याकाळपर्यंत मोठ्याने रडून आक्रोश करत राहिले. ३  ते म्हणत होते: “हे इस्राएलच्या देवा यहोवा! इस्राएलमध्ये हे काय घडलं? आमच्यातला एक वंश आज कमी झालाय. असं का झालं?” ४  मग दुसऱ्‍या दिवशी लोक पहाटेच उठले आणि त्यांनी तिथे एक वेदी बांधली. त्यावर त्यांनी होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली.+ ५  मग त्यांनी विचारलं: “इस्राएलचे सगळे वंश यहोवासमोर जमले होते, तेव्हा असा एखादा वंश होता का जो तिथे हजर नव्हता?” कारण त्यांनी अशी शपथ घेतली होती, की जो कोणी मिस्पा इथे यहोवासमोर हजर राहणार नाही त्याला ठार मारलं जाईल. ६  आपल्या बन्यामिनी बांधवांच्या बाबतीत जे काही झालं त्याचा विचार करून इस्राएली लोकांना फार वाईट वाटलं. ते म्हणाले: “इस्राएलमधून आज एक वंश संपलाय. ७  आपण आपल्या मुलींची लग्नं बन्यामिनी माणसांशी लावून देणार नाही+ अशी शपथ आपण यहोवासमोर घेतली होती.+ पण आता त्यांच्यापैकी जे उरले आहेत त्यांना बायका मिळवून देण्यासाठी आपण काही करू शकतो का?” ८  मग त्यांनी विचारलं: “इस्राएलच्या वंशांपैकी असे काही लोक होते का जे मिस्पामध्ये यहोवासमोर हजर राहिले नव्हते?”+ तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की इस्राएलची मंडळी जमली होती तिथे याबेश-गिलाद इथून कोणीही छावणीत आलं नव्हतं. ९  कारण लोकांची मोजणी केल्यावर, याबेश-गिलादचा एकही रहिवासी आला नव्हता हे त्यांना दिसून आलं. १०  तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी आपल्यामधून १२,००० शूर योद्ध्यांना तिथे पाठवलं. ते त्यांना म्हणाले: “जा आणि याबेश-गिलादच्या सगळ्या लोकांना तलवारीने मारून टाका; बायका-मुलांनाही सोडू नका.+ ११  तिथल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला मारून टाका. फक्‍त कुमारी मुलींना जिवंत सोडा.” १२  मग याबेश-गिलादमध्ये त्यांना अशा ४०० कुमारी मुली सापडल्या, ज्यांनी कधीही कुठल्या पुरुषासोबत संबंध ठेवले नव्हते. आणि ते त्या मुलींना कनान देशात शिलो+ इथल्या छावणीत घेऊन आले. १३  मग सर्व इस्राएली लोकांनी रिम्मोन खडकावर+ राहणाऱ्‍या बन्यामिनी माणसांकडे शांतीचा संदेश पाठवला. १४  तेव्हा बन्यामिनी माणसं परत आली. मग इस्राएली लोकांनी याबेश-गिलादमधल्या ज्या मुलींना जिवंत ठेवलं होतं, त्या मुली त्यांनी बन्यामिनी माणसांना बायका म्हणून दिल्या.+ पण बन्यामिनी माणसांच्या तुलनेत त्या मुलींची संख्या कमी होती. १५  यहोवाने बन्यामिनी लोकांना इस्राएलच्या बाकीच्या वंशांपासून वेगळं केल्यामुळे इस्राएली लोकांना त्यांच्याबद्दल फार वाईट वाटलं.+ १६  म्हणून इस्राएली लोकांचे वडील म्हणाले: “आपण सगळ्या बन्यामिनी स्त्रियांना मारून टाकलं. मग या उरलेल्या माणसांना बायका मिळवून देण्यासाठी आपण काय करू शकतो?” १७  ते पुढे म्हणाले: “बन्यामीनच्या बचावलेल्या माणसांचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे;* नाहीतर इस्राएलमधून हा वंशच नाहीसा होईल. १८  पण आपण आपल्या मुलींची लग्नं त्यांच्याशी लावून देऊ शकत नाही. कारण आपण अशी शपथ घेतली आहे, की इस्राएली लोकांपैकी जो कोणी बन्यामीनला आपली मुलगी देईल त्याला शाप लागेल.”+ १९  मग ते म्हणाले: “हे बघा, दरवर्षी शिलोमध्ये+ यहोवासाठी उत्सव साजरा केला जातो. हे ठिकाण बेथेलच्या उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्‍या महामार्गाच्या पूर्वेला आणि लबोनाच्या दक्षिणेला आहे.” २०  नंतर त्यांनी बन्यामीनच्या माणसांना आज्ञा केली: “तिथे जा आणि द्राक्षमळ्यांत लपून बसा. २१  शिलोतल्या मुली नृत्य करायला आल्या की द्राक्षमळ्यांतून बाहेर या. मग तुमच्यापैकी प्रत्येकाने त्यांतली एक मुलगी बायको करण्यासाठी उचलावी आणि बन्यामीनच्या प्रदेशात परत जावं. २२  आणि याबद्दल जर मुलींच्या वडिलांनी किंवा भावांनी आमच्याकडे तक्रार केली, तर आम्ही त्यांना म्हणू: ‘आमच्यावर आणि त्यांच्यावर दया करा. कारण, त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी युद्धात आम्हाला मुली मिळाल्या नाहीत.+ आणि दोषी ठरू नये म्हणून तुम्ही स्वतःहून तुमच्या मुली त्यांना दिल्या नाहीत.’”+ २३  बन्यामिनी माणसांनी तसंच केलं. त्यांच्यातला प्रत्येक जण नृत्य करणाऱ्‍या मुलींपैकी एक मुलगी बायको करण्यासाठी घेऊन गेला. त्यानंतर ते आपल्या वारशाच्या प्रदेशात गेले आणि तिथली शहरं परत बांधून+ तिथे राहू लागले. २४  मग इस्राएली लोकही आपापल्या वारशाच्या प्रदेशात गेले. प्रत्येक जण आपल्या वंशाकडे आणि घराण्याकडे गेला. २५  त्या काळात इस्राएलवर कोणीही राजा नव्हता.+ प्रत्येक जण स्वतःला योग्य वाटेल तसं करायचा.

तळटीपा

शब्दशः “माणसांना त्यांच्या वारशाचा प्रदेश मिळाला पाहिजे.”