शास्ते ४:१-२४

  • कनानचा राजा याबीन इस्राएलवर अत्याचार करतो (१-३)

  • संदेष्टी दबोरा आणि बाराक न्यायाधीश (४-१६)

  • सेनापती सीसराचा याएल खून करते (१७-२४)

 पण, एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोक पुन्हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करू लागले.+ २  म्हणून यहोवाने त्यांना कनानचा राजा याबीन याच्या हाती दिलं.*+ तो हासोरमध्ये राज्य करायचा. त्याच्या सेनापतीचं नाव सीसरा होतं, आणि तो हरोशेथ-गोयीम+ इथे राहायचा. ३  याबीनकडे युद्धाचे ९०० लोखंडी रथ होते, आणि त्या रथांच्या चाकांना लांब सुऱ्‍या होत्या.+ याबीन २० वर्षांपासून इस्राएली लोकांवर भयंकर अत्याचार करत होता.+ म्हणून इस्राएली लोक मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+ ४  त्या काळात, इस्राएलमध्ये दबोरा नावाची संदेष्टी+ देवाचे न्याय-निर्णय* लोकांना कळवायची. ती लप्पिदोथची बायको होती. ५  ती एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात, रामाच्या+ आणि बेथेलच्या+ मधे असलेल्या दबोराच्या खजुराच्या झाडाखाली बसायची. इस्राएली लोक देवाचे न्याय-निर्णय माहीत करून घेण्यासाठी तिच्याकडे जायचे. ६  दबोराने केदेश-नफताली+ इथून अबीनवामचा मुलगा बाराक+ याला बोलावून घेतलं. ती त्याला म्हणाली: “इस्राएलचा देव यहोवा याने तुला अशी आज्ञा दिली आहे, की ‘नफताली आणि जबुलून वंशातल्या १०,००० पुरुषांना सोबत घे आणि ताबोर डोंगरावर जा. ७  मी याबीनचा सेनापती सीसरा याला कीशोनच्या खोऱ्‍याजवळ*+ आणीन. तो आपले युद्धाचे रथ आणि सैन्य घेऊन तिथे येईल, आणि मी त्याला तुझ्या हाती देईन.’”+ ८  तेव्हा बाराक तिला म्हणाला: “तू जर माझ्यासोबत आलीस, तर मी जाईन. नाहीतर मी जाणार नाही.” ९  त्यावर ती म्हणाली: “मी तुझ्यासोबत नक्की येईन. पण, ज्या मोहिमेवर तू चालला आहेस त्याचं श्रेय तुला मिळणार नाही. कारण, यहोवा एका स्त्रीच्या हातून सीसराला मारून टाकेल.”+ मग दबोरा बाराकसोबत केदेशला गेली.+ १०  बाराकने जबुलून आणि नफताली+ वंशांना केदेश इथे बोलावून घेतलं. तेव्हा, १०,००० पुरुष त्याच्यामागे गेले. दबोराही त्याच्यासोबत गेली. ११  हेबेर नावाचा एक केनी+ माणूस आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. आणि तो केदेशमध्ये साननीम इथल्या मोठ्या वृक्षाजवळ तंबूत राहत होता. केनी लोक हे मोशेचा सासरा होबाब याचे वंशज होते.+ १२  सीसराला कोणीतरी सांगितलं, की अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरावर आला आहे.+ १३  तेव्हा, सीसराने कीशोनच्या खोऱ्‍याकडे+ जाण्यासाठी लगेच आपले युद्धाचे सगळे रथ (चाकांना लांब सुऱ्‍या असलेले ९०० लोखंडी रथ) आणि आपलं सगळं सैन्य हरोशेथ-गोयीममधून बोलावून जमा केलं. १४  मग दबोरा बाराकला म्हणाली: “तयार हो! कारण आजच यहोवा सीसराला तुझ्या हाती देणार आहे. पाहा, यहोवा तुझ्यापुढे निघालाय.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरून उतरला, आणि त्याच्यामागे १०,००० पुरुष गेले. १५  मग यहोवाने बाराकसमोर सीसरा, त्याचे रथ आणि त्याच्या सगळ्या सैन्याला गोंधळात टाकलं.+ शेवटी आपला जीव वाचवण्यासाठी सीसरा रथातून उतरून पळून गेला. १६  बाराकने हरोशेथ-गोयीमपर्यंत रथांचा आणि सैन्याचा पाठलाग केला. सीसराच्या सगळ्या सैन्याचा तलवारीने नाश झाला; त्यातला एकही वाचला नाही.+ १७  पण, सीसरा मात्र केनी हेबेरची+ बायको याएल+ हिच्या तंबूकडे पळून गेला. कारण, हासोरचा राजा याबीन+ आणि केनी हेबेरचं घराणं यांच्यात शांतीचे संबंध होते. १८  मग याएल सीसराला भेटायला तंबूच्या बाहेर आली, आणि म्हणाली: “या महाराज, आत या. घाबरू नका.” तेव्हा तो आत गेला आणि तिने त्याच्या अंगावर घोंगडी टाकली. १९  तो तिला म्हणाला: “मला खूप तहान लागली आहे. मला जरा पाणी दे प्यायला.” तेव्हा तिने चामड्याची पिशवी उघडली आणि त्यातलं दूध त्याला प्यायला दिलं.+ त्यानंतर तिने पुन्हा त्याच्या अंगावर घोंगडी टाकली. २०  तो तिला म्हणाला: “तंबूच्या दाराजवळ उभी राहा. आणि जर कोणी आलं आणि विचारलं, की ‘आत कोणी माणूस आहे का?’ तर ‘नाही!’ म्हणून सांग.” २१  सीसरा अतिशय थकला होता, त्यामुळे तो गाढ झोपून गेला. तेव्हा, हेबेरची बायको याएल हिने तंबू ठोकायचा एक मोठा खिळा आणि एक हातोडा घेतला. मग हळूच त्याच्याजवळ जाऊन तिने तो खिळा त्याच्या कानशिलात ठोकला. तेव्हा तो खिळा त्याच्या डोक्यातून आरपार जाऊन जमिनीत रुतला, आणि सीसरा जागीच मेला.+ २२  सीसराचा शोध करत बाराक तिथे पोहोचला. तेव्हा, याएल त्याला भेटायला बाहेर आली आणि म्हणाली: “तुम्ही ज्या माणसाला शोधताय, तो कुठे आहे ते मी दाखवते. या माझ्यासोबत.” तो तिच्यासोबत तंबूत गेला, तेव्हा सीसराच्या कानशिलातून खिळा आरपार गेलेला, आणि तो मरून पडलेला त्याला दिसला. २३  त्या दिवशी, देवाने कनानचा राजा याबीन याच्यावर इस्राएली लोकांना विजय मिळवून दिला.+ २४  कनानचा+ राजा याबीन याच्यावर इस्राएली लोकांचं वर्चस्व वाढत गेलं. आणि शेवटी त्यांनी त्याचा नाश केला.+

तळटीपा

शब्दशः “विकलं.”