शास्ते ५:१-३१

  • दबोरा आणि बाराकचं विजयगीत (१-३१)

    • सीसराविरुद्ध तारे लढतात (२०)

    • कीशोन नदीला पूर येतो (२१)

    • यहोवावर प्रेम करणारे सूर्यासारखे तेजस्वी (३१)

 त्या दिवशी, अबीनवामचा मुलगा बाराक+ याच्यासोबत दबोराने+ हे गीत गायलं:+  २  “यहोवाची स्तुती करा! कारण इस्राएल स्वेच्छेने पुढे आला,+त्याच्या योद्ध्यांनी आपले केस मोकळे सोडलेत.*  ३  हे राजांनो ऐका! हे शासकांनो कान द्या! मी यहोवासाठी गीत गाईन. इस्राएलचा देव+ यहोवा याच्या स्तुतीसाठी मी गीत गाईन.*+  ४  हे यहोवा, तू सेईरमधून निघाला,+अदोमच्या प्रदेशातून चालत गेला,तेव्हा पृथ्वी हादरली आणि आकाशाने वर्षाव केला,हो, ढगांनी पाण्याचा वर्षाव केला.  ५  यहोवासमोर पर्वत वितळले,*+यहोवासमोर, इस्राएलच्या देवासमोर+ सीनाय पर्वतसुद्धा वितळला.+  ६  अनाथचा मुलगा शमगार+ याच्या दिवसांत,याएलच्या+ दिवसांत, रस्ते सुनसान पडले;प्रवासी आडमार्गाने ये-जा करायचे.  ७  इस्राएलची गावं ओसाड पडली;त्यांत एकही उरला नाही,तेव्हा मी, दबोरा+ त्यांच्या मदतीसाठी आले,आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला.+  ८  त्यांनी नवनवीन देव निवडले;+मग शहरांच्या फाटकांवर युद्ध झाले.+ इस्राएलच्या ४०,००० योद्ध्यांपैकी एकाकडेही ढाल किंवा बरची* नव्हती.  ९  इस्राएलच्या अधिपतींना,+लढाईसाठी स्वच्छेने पुढे आलेल्यांना,+ माझा पूर्ण पाठिंबा आहे. यहोवाची स्तुती करा! १०  पांढऱ्‍या गाढवांवर स्वारी करणाऱ्‍यांनो,उत्कृष्ट गालिच्यांवर बसणाऱ्‍यांनो,आणि रस्त्याने चालणाऱ्‍यांनो,याकडे लक्ष द्या! ११  पाणवठ्यांवर मेंढपाळ* आपसात बोलत होते;ते यहोवाची नीतिमान कार्यं आठवून त्याचे गुणगान करत होते,इस्राएलच्या गावांत राहणाऱ्‍या त्याच्या लोकांच्या नीतिमान कार्यांची प्रशंसा करत होते. तेव्हा यहोवाचे लोक शहरांच्या फाटकांकडे गेले. १२  हे दबोरा,+ जागी हो! जागी हो आणि एक गीत गा!+ हे बाराक,+ अबीनवामच्या मुला ऊठ! ऊठ आणि तुझ्या बंदिवानांना घेऊन जा. १३  मग उरलेले लोक खाली प्रतिष्ठित लोकांकडे आले;शूरवीरांचा सामना करण्यासाठी यहोवाचे लोक माझ्याकडे आले. १४  जे खोऱ्‍यात उतरले ते एफ्राईमचे होते;हे बन्यामीन, ते तुझ्या पाठोपाठ, तुझ्या लोकांसोबत येत आहेत. माखीरमधून+ सेनापती खाली गेले,आणि सैन्यात भरती करणारे* जबुलूनमधून आले. १५  इस्साखारचे पुढारी दबोरासोबत होते,इस्साखारप्रमाणेच, बाराकही+ दबोरासोबत होता. तो खोऱ्‍यात चालून गेला.+ रऊबेन वंश मात्र द्विधा मनस्थितीत होता.* १६  तुम्ही ओझ्यामुळे दबलेल्या जनावरासारखं का बसून राहिलात? मेंढपाळांच्या बासऱ्‍यांच्या सुरात धुंद का झालात?+ हो, रऊबेन वंश द्विधा मनस्थितीत होता.* १७  गिलाद यार्देनच्या पलीकडेच राहिला;+आणि दान जहाजांकडेच थांबला.+ आशेर समुद्रकिनाऱ्‍यावर स्वस्थ बसून राहिला,तो आपल्या बंदरांजवळून जराही हलला नाही.+ १८  जबुलूनच्या लोकांनी आपला जीव धोक्यात घातला;डोंगरांवर+ नफतालीनेसुद्धा+ आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. १९  राजे आले आणि लढले;तानखमध्ये, मगिद्दोच्या झऱ्‍याजवळ+कनानचे राजे लढले.+ पण, चांदीची लूट त्यांना घेता आली नाही.+ २०  आकाशातून तारे लढले;आपापल्या कक्षांतून ते सीसराविरुद्ध लढले. २१  कीशोन ओढ्याने,हो, प्राचीन काळातल्या त्या कीशोन ओढ्याने त्यांना वाहून नेलं.+ मी शूरवीरांना पायांखाली तुडवलं. २२  घोडे भरधाव वेगाने आले,आणि दमदार घोडे टापा आपटू लागले.+ २३  यहोवाचा स्वर्गदूत म्हणाला, ‘मेरोजला शाप द्या,हो, तिथल्या लोकांना शाप द्या. कारण ते यहोवाच्या मदतीला,शूरवीरांसोबत यहोवाच्या मदतीला आले नाहीत.’ २४  केनी हेबेरची+ बायको, याएल+ सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित आहे;तंबूंमध्ये राहणाऱ्‍या सगळ्या स्त्रियांमध्ये ती धन्य आहे. २५  सीसराने पाणी मागितलं; तिने त्याला दूध दिलं. राजेशाही कटोऱ्‍यात तिने त्याला सायीचं दूध* दिलं.+ २६  हात पुढे करून तिने तंबूचा मोठा खिळा घेतला,आणि उजव्या हाताने कारागिराचा हातोडा उचलला. हातोड्याने तिने सीसराला मारलं आणि त्याचं डोकं फोडलं,त्याच्या कानशिलात तिने खिळा असा ठोकला, की तो आरपार गेला.+ २७  सीसरा तिच्या पायांजवळ कोसळून पडला; तो कोसळला आणि तिथेच पडून राहिला;हो, तिच्या पायांजवळ तो कोसळून पडला;तो जिथे कोसळला, तिथेच मरून पडला. २८  एका स्त्रीने खिडकीतून डोकावलं,हो, सीसराच्या आईने जाळीतून बाहेर पाहिलं,‘त्याचा रथ यायला उशीर का झाला? त्याच्या घोड्यांच्या टापांचा आवाज अजून का ऐकू येत नाही?’+ २९  महालातल्या बुद्धिमान स्त्रियांनी तिला म्हटलं;मनातल्या मनात तिनेही विचार केला, ३०  ‘ते नक्कीच लुटलेला माल वाटून घेत असतील,प्रत्येक योद्ध्याला एक किंवा दोन मुली दिल्या जात असतील,सीसराला रंगीत कपडे, हो लुटीत मिळालेले रंगीबेरंगी कपडे दिले जात असतील,प्रत्येक लुटारूला दोन-दोन कपडे,हो, गळ्यात घालण्यासाठी भरतकाम केलेले रंगीत कपडे दिले जात असतील.’ ३१  हे यहोवा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा असाच नाश होवो,+पण तुझ्यावर प्रेम करणारे, उगवत्या सूर्याच्या तेजासारखे तेजस्वी होवोत!” त्यानंतर, देशात ४० वर्षं शांती टिकून राहिली.+

तळटीपा

हे कदाचित देवाला वाहिलेल्या शपथेचं किंवा त्याला केलेल्या समर्पणाचं चिन्ह असावं.
किंवा “संगीताची वाद्यं वाजवेन.”
किंवा कदाचित, “हादरले.”
म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.
शब्दशः “पाणी पाजणारे.”
किंवा कदाचित, “शास्त्र्याचं लेखन साहित्य सांभाळणारे.”
किंवा “मन चाचपडत राहिला.”
किंवा “मन चाचपडत राहिला.”
किंवा “दही.”