शास्ते ७:१-२५

  • गिदोन आणि त्याची ३०० माणसं (१-८)

  • गिदोनचं सैन्य मिद्यानला हरवतं (९-२५)

    • “यहोवाची तलवार आणि गिदोनची तलवार!” (२०)

    • मिद्यानच्या छावणीत उडालेला गोंधळ (२१, २२)

 मग यरुब्बाल, म्हणजे गिदोन+ आणि त्याच्यासोबतची माणसं सकाळीच उठली आणि त्यांनी ‘हरोदच्या झऱ्‍याजवळ’ छावणी केली. त्यांच्या उत्तरेकडे मोरे टेकडीजवळ असलेल्या खोऱ्‍यात मिद्यानी लोकांची छावणी होती. २  यहोवा गिदोनला म्हणाला: “तुझ्यासोबत खूप जास्त माणसं आहेत. मी जर मिद्यानी लोकांना तुमच्या हाती दिलं,+ तर कदाचित इस्राएली लोक माझ्यासमोर बढाई मारून असं म्हणतील, की ‘आम्ही स्वतःच्या बळावर जिंकलो.’+ ३  तर आता जा, आणि सगळ्यांसमोर अशी घोषणा कर: ‘कोणाला युद्धाची भीती वाटत असेल किंवा कोणाचा थरकाप उडत असेल, तर त्याने आपल्या घरी परत जावं.’”+ गिदोनने ही घोषणा करून माणसांची पारख केली, तेव्हा त्यांच्यापैकी २२,००० पुरुष घरी परत गेले, आणि फक्‍त १०,००० थांबले. ४  पण यहोवा गिदोनला म्हणाला: “अजूनही खूप जास्त माणसं आहेत. असं कर, त्यांना खाली झऱ्‍याकडे घेऊन जा. म्हणजे, तिथे त्यांची पारख करण्यासाठी मी तुला मदत करीन. मी ज्याच्याविषयी तुला म्हणेन, की ‘याने तुझ्यासोबत जावं,’ तर त्याला आपल्यासोबत घे. पण जर एखाद्याविषयी मी म्हणालो, की ‘याने तुझ्यासोबत जाऊ नये,’ तर त्याला आपल्यासोबत घेऊ नकोस.” ५  तेव्हा गिदोन आपल्या माणसांना खाली झऱ्‍याकडे घेऊन गेला. मग यहोवा गिदोनला म्हणाला: “जी माणसं पाणी हातात घेऊन पितील* त्यांना बाजूला काढ; आणि जी माणसं पाणी पिण्यासाठी गुडघे टेकून खाली वाकतील त्यांना बाजूला काढ.” ६  पाणी हातात घेऊन पिणारे पुरुष ३०० होते. बाकीची सर्व माणसं गुडघे टेकून पाणी प्यायली. ७  यहोवा गिदोनला म्हणाला: “या ३०० पुरुषांद्वारेच मी इस्राएलचा बचाव करीन, आणि मिद्यानी लोकांना तुझ्या हाती देईन.+ बाकीच्यांना मात्र आपापल्या घरी पाठवून दे.” ८  म्हणून गिदोनने ३०० माणसांना ठेवून घेतलं आणि बाकीच्यांना घरी पाठवून दिलं. या बाकीच्या माणसांकडून त्यांनी अन्‍नसामग्री आणि रणशिंगं घेतली. त्यांच्या शत्रूंची, म्हणजे मिद्यानी लोकांची छावणी खाली खोऱ्‍यात होती.+ ९  त्या रात्री यहोवा गिदोनला म्हणाला: “ऊठ, आणि त्या छावणीवर हल्ला कर. कारण, मी ती तुझ्या हाती दिली आहे.+ १०  पण, जर तुला हल्ला करायला भीती वाटत असेल, तर तुझा सहायक पुरा, याला सोबत घेऊन खाली छावणीत जा. ११  आणि ते आपसात काय बोलतात ते ऐक. मग, छावणीवर हल्ला करण्याचं धैर्य तुला मिळेल.” तेव्हा, गिदोन आणि त्याचा सहायक पुरा, खाली मिद्यानी लोकांच्या छावणीजवळ गेले. १२  मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे सर्व लोक+ खाली खोऱ्‍यात टोळांच्या थव्यासारखे पसरलेले होते. आणि त्यांच्या उंटांची संख्या, समुद्रकिनाऱ्‍यावरच्या वाळूइतकी अगणित होती.+ १३  गिदोन जेव्हा मिद्यानी लोकांच्या छावणीजवळ आला, तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला आपण पाहिलेलं स्वप्न सांगत होता. तो म्हणाला: “मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहिलं, की जवाची एक गोल भाकर मिद्यानी लोकांच्या छावणीत घरंगळत आली आणि एका तंबूला येऊन धडकली. ती इतक्या जोरात धडकली, की तंबू कोसळला;+ तो उलटून पडला आणि जमीनदोस्त झाला.” १४  त्यावर त्या मनुष्याचा सोबती त्याला म्हणाला: “हे दुसरं काही नसून, योवाशचा मुलगा गिदोन या इस्राएली माणसाची तलवार आहे.+ देवाने मिद्यानला आणि संपूर्ण छावणीला त्याच्या हाती दिलंय.”+ १५  गिदोनने ते स्वप्न आणि त्याचा अर्थ ऐकला,+ तेव्हा त्याने लगेच देवाला नमन केलं. त्यानंतर, तो इस्राएलच्या छावणीत परत आला आणि लोकांना म्हणाला: “उठा! यहोवाने मिद्यानी लोकांची छावणी तुमच्या हाती दिली आहे.” १६  मग त्याने त्या ३०० पुरुषांच्या तीन तुकड्या केल्या. त्याने प्रत्येकाला एक रणशिंग+ आणि एक रिकामी घागर दिली; घागरींच्या आत मशाली ठेवल्या होत्या. १७  तो त्यांना म्हणाला: “माझ्याकडे लक्ष द्या आणि मी जसं करीन अगदी तसंच करा. छावणीच्या जवळ पोहोचल्यावर मी जे करीन तेच तुम्हीसुद्धा करा. १८  मी आणि माझ्यासोबत असलेल्या माणसांनी रणशिंगं फुंकली, की छावणीच्या सभोवती उभे असलेल्यांनीही लगेच रणशिंगं फुंकावीत, आणि मोठ्याने ओरडून म्हणावं, ‘हे युद्ध यहोवाचं आहे! गिदोनचं आहे!’” १९  रात्री दुसऱ्‍या प्रहराच्या* सुरुवातीला जेव्हा पहारा नुकताच बदलला, तेव्हा गिदोन आणि त्याच्यासोबत असलेली १०० माणसं छावणीजवळ पोहोचली. त्यांनी रणशिंगं फुंकली+ आणि हातांतल्या घागरी फोडल्या.+ २०  तिन्ही तुकड्यांनी आपापली रणशिंगं फुंकली आणि घागरी फोडल्या. प्रत्येकाने आपल्या डाव्या हातात मशाल धरली आणि उजव्या हातात रणशिंग धरून ते फुंकलं; मग ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “यहोवाची तलवार आणि गिदोनची तलवार!” २१  गिदोनचा प्रत्येक माणूस छावणीच्या सभोवती आपापल्या जागी उभा होता. पण, संपूर्ण मिद्यानी सेना मात्र मोठमोठ्याने ओरडत सैरावैरा पळत होती.+ २२  हे सर्व घडत असताना, ती ३०० माणसं रणशिंगं फुंकत राहिली. यहोवाने, छावणीतल्या सर्वांना एकमेकांच्या विरोधात उठवलं आणि ते एकमेकांवर तलवार चालवू लागले.+ शत्रूंची सेना पळत सुटली आणि सरेराजवळ असलेल्या बेथ-शिट्टापर्यंत गेली; तिथून ती टब्बाथाजवळ असलेल्या आबेल-महोलाच्या+ सीमेपर्यंत पळाली. २३  तेव्हा नफताली, आशेर आणि मनश्‍शे+ वंशांतल्या सगळ्या इस्राएली माणसांना बोलावण्यात आलं, आणि त्यांनी मिद्यानी लोकांचा पाठलाग केला. २४  गिदोनने एफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात दूतांच्या हातून संदेश पाठवून म्हटलं: “मिद्यानी लोकांवर हल्ला करायला खाली जा. ते बेथ-बाराच्या झऱ्‍यांपर्यंत आणि यार्देन नदीपर्यंत पोहोचायच्या आत तुम्ही तिथे जा, आणि त्यांनी नदी पार करू नये म्हणून तिथले उतार अडवून धरा.” तेव्हा, एफ्राईमची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी बेथ-बारा आणि यार्देनपर्यंतचे उतार अडवून धरले. २५  तसंच, त्यांनी ओरेब आणि जेब या दोन मिद्यानी सेनापतींनाही पकडलं. त्यांनी ओरेबला, ओरेबच्या खडकावर+ आणि जेबला, जेबच्या द्राक्षकुंडाजवळ ठार मारलं. ते मिद्यानी लोकांचा पाठलाग करत राहिले.+ मग जेव्हा ते यार्देनच्या प्रदेशात गिदोनकडे आले, तेव्हा ते आपल्यासोबत ओरेब आणि जेब यांची मुंडकी घेऊन आले.

तळटीपा

शब्दशः “कुत्रे पाणी पितात तसं जिभेने पाणी पितील.”
रात्री सुमारे १० ते पहाटे सुमारे २ वाजेपर्यंत.