शास्ते ९:१-५७

  • अबीमलेख शखेममध्ये राजा बनतो (१-६)

  • योथामने दिलेलं झाडांचं उदाहरण (७-२१)

  • अबीमलेखचं जुलमी शासन (२२-२३)

  • अबीमलेख शखेमवर हल्ला करतो (३४-४९)

  • एक स्त्री अबीमलेखला जखमी करते; त्याचा मृत्यू (५०-५७)

 पुढे यरुब्बालचा* मुलगा अबीमलेख+ शखेममध्ये आपल्या मामांकडे गेला. तो त्यांना आणि आपल्या आजोबांच्या* घराण्यातल्या सर्वांना म्हणाला: २  “शखेमच्या सर्व पुढाऱ्‍यांना* विचारा: ‘तुम्हाला काय योग्य वाटतं, यरुब्बालच्या सगळ्या ७० मुलांनी तुमच्यावर राज्य करावं,+ की फक्‍त एका माणसाने? पण तुमचं आणि माझं रक्‍ताचं नातं आहे हे विसरू नका.’” ३  म्हणून त्याच्या मामांनी त्याच्या वतीने शखेमच्या पुढाऱ्‍यांना तसं विचारलं. तेव्हा ते म्हणाले, की ‘तो आपलाच भाऊ आहे.’ आणि त्यांची मनं अबीमलेखकडे वळली. ४  मग त्यांनी त्याला बआल-बरीथच्या+ मंदिरातून चांदीचे ७० तुकडे दिले. ते पैसे देऊन अबीमलेखने काही रिकामटेकड्या आणि गुंड प्रवृत्तीच्या माणसांना आपल्यासोबत घेतलं. ५  त्यानंतर तो अफ्रा+ इथे आपल्या वडिलांच्या घरी गेला. आणि त्याने आपल्या भावांना, म्हणजे यरुब्बालच्या ७० मुलांना एकाच खडकावर मारून टाकलं.+ पण यरुब्बालचा सगळ्यात लहान मुलगा, योथाम हा लपून बसला होता आणि म्हणून फक्‍त तोच वाचला. ६  मग शखेमचे सर्व पुढारी आणि बेथ-मिल्लोचे सगळे लोक एकत्र आले, आणि शखेममधल्या मोठ्या झाडाशेजारी असलेल्या स्तंभाजवळ त्यांनी अबीमलेखला+ आपला राजा बनवलं. ७  योथामला ही गोष्ट कळली तेव्हा तो लगेच गरिज्जीम+ डोंगरावर जाऊन उभा राहिला, आणि मोठ्या आवाजात त्यांना म्हणाला: “शखेमच्या पुढाऱ्‍यांनो! माझं ऐका म्हणजे देवसुद्धा तुमचं ऐकेल. ८  एकदा सगळ्या झाडांनी आपल्यावर एक राजा नेमायचं ठरवलं. म्हणून ते जैतुनाच्या झाडाला म्हणाले: ‘तू आमच्यावर राज्य कर.’+ ९  पण जैतुनाचं झाड त्यांना म्हणालं: ‘देवाचा आणि माणसांचा गौरव करायला तेल द्यायचं सोडून, मी इतर झाडांवर राज्य का करू?’* १०  मग झाडांनी अंजिराच्या झाडाला म्हटलं: ‘ये आणि आमच्यावर राज्य कर.’ ११  पण अंजिराचं झाड त्यांना म्हणालं: ‘गोड आणि रसाळ फळ द्यायचं सोडून मी इतर झाडांवर राज्य का करू?’* १२  त्यानंतर ती झाडं द्राक्षवेलीला म्हणाली: ‘ये आणि आमच्यावर राज्य कर.’ १३  तेव्हा द्राक्षवेल त्यांना म्हणाली: ‘देवाचं आणि माणसांचं मन आनंदित करणारा नवीन द्राक्षारस द्यायचं सोडून, मी इतर झाडांवर राज्य का करू?’* १४  शेवटी ती सगळी झाडं काटेरी झुडपाला म्हणाली: ‘ये आणि आमच्यावर राज्य कर.’+ १५  त्यावर काटेरी झुडूप त्या झाडांना म्हणालं: ‘तुम्ही जर खरंच मला तुमचा राजा बनवणार असाल, तर या आणि माझ्या सावलीत आश्रय घ्या. नाहीतर, माझ्यातून आग निघून ती लबानोनचे देवदार वृक्ष भस्म करेल.’ १६  तर आता विचार करा, अबीमलेखला राजा बनवून+ तुम्ही खरंच प्रामाणिकपणे आणि योग्यपणे वागलात का? तुम्ही यरुब्बालला आणि त्याच्या घराण्याला चांगुलपणा दाखवलात का? त्याच्याशी जसं वागायला हवं होतं, तसं तुम्ही वागलात का? १७  माझे वडील तुमच्यासाठी लढले.+ त्यांनी आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानी लोकांच्या हातून वाचवलं.+ १८  पण आज तुम्ही माझ्या वडिलांच्याच घराण्याविरुद्ध उठला आहात; त्यांच्या ७० मुलांना तुम्ही खडकावर मारून टाकलं.+ आणि त्यांच्या दासीचा मुलगा अबीमलेख+ याला तुम्ही शखेमच्या पुढाऱ्‍यांवर राजा बनवलं. का, तर तो तुमचा भाऊ आहे म्हणून! १९  आज जर तुम्ही यरुब्बालशी आणि त्याच्या घराण्याशी खरंच प्रामाणिकपणे आणि योग्यपणे वागत असाल, तर अबीमलेखमुळे आनंद करा आणि त्यालासुद्धा तुमच्यामुळे आनंद मिळो. २०  पण तसं जर नसेल, तर शखेमच्या पुढाऱ्‍यांना आणि बेथ-मिल्लोच्या+ लोकांना अबीमलेख आगीने भस्म करो. आणि शखेमचे पुढारी आणि बेथ-मिल्लोचे लोक अबीमलेखला भस्म करोत.”+ २१  मग आपला भाऊ अबीमलेख याच्या भीतीमुळे योथाम+ तिथून पळून गेला आणि बैरमध्ये जाऊन राहिला. २२  अबीमलेखने इस्राएलवर तीन वर्षं राज्य केलं.* २३  मग देवाने अबीमलेख व शखेमच्या पुढाऱ्‍यांमध्ये वैर निर्माण होऊ दिलं आणि ते पुढारी अबीमलेखशी कपटीपणे वागू लागले. २४  अबीमलेखने शखेमच्या पुढाऱ्‍यांसोबत मिळून यरुब्बालच्या ७० मुलांना, म्हणजे आपल्या भावांना मारून टाकलं होतं. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आणि अबीमलेखवर आणि त्या पुढाऱ्‍यांवर रक्‍ताचा दोष लावण्यासाठी देवाने असं होऊ दिलं.+ २५  शखेमच्या पुढाऱ्‍यांनी अबीमलेखवर हल्ला करायला डोंगरांवर काही माणसं लपवून बसवली होती. ती माणसं, त्या रस्त्याने येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रत्येकाला लुटायची. या गोष्टीची खबर अबीमलेखला देण्यात आली. २६  या काळात, एबदचा मुलगा गाल आपल्या भावांसोबत शखेममध्ये+ राहायला आला. तेव्हा तो आपल्याला मदत करेल अशी आशा शखेमचे पुढारी करू लागले. २७  ते आपल्या द्राक्षमळ्यांत गेले आणि त्यांनी द्राक्षं गोळा केली. द्राक्षं तुडवून त्यांनी त्यांचा रस काढला आणि उत्सव केला. नंतर आपल्या देवाच्या मंदिरात जाऊन+ त्यांनी खाणंपिणं केलं आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले. २८  तेव्हा एबदचा मुलगा गाल म्हणाला: “कोण हा अबीमलेख, आणि कोण हा शखेम?* आम्ही का त्यांच्या अधीन राहावं? तो तर यरुब्बालचा+ मुलगा ना? आणि जबूल तरी कोण? तोही त्याचाच अधिकारी ना? अबीमलेखच्या अधीन राहण्यापेक्षा आम्ही शखेमचा पिता हमोर याच्या मुलांच्या अधीन राहू. २९  हे लोक माझ्या अधिकाराखाली असते, तर मी अबीमलेखला त्याच्या पदावरून उलथून टाकलं असतं.” मग त्याने अबीमलेखला आव्हान देऊन म्हटलं: “तुला तुझं सैन्य जितकं वाढवायचं असेल तितकं वाढव, आणि माझ्याशी युद्ध करायला ये.” ३०  एबदचा मुलगा गाल याचं हे बोलणं जेव्हा शहराचा अधिकारी जबूल याने ऐकलं, तेव्हा त्याचा राग भडकला. ३१  आणि त्याने गुप्तपणे* काही माणसांना अबीमलेखकडे असा संदेश घेऊन पाठवलं: “एबदचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊ शखेममध्ये आले आहेत, आणि ते शहरातल्या लोकांना तुझ्याविरुद्ध भडकवत आहेत. ३२  म्हणून आता आपल्या माणसांना घेऊन रात्रीच इथे ये आणि हल्ला करण्यासाठी शहराबाहेर लपून बस. ३३  सकाळी सूर्य उगवताच शहरावर हल्ला कर. मग गाल आणि त्याची माणसं तुझ्याशी लढायला येतील, तेव्हा कसंही करून त्याला हरवून टाक.” ३४  म्हणून अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघाले, आणि सैनिकांच्या चार तुकड्या करून ते शखेमजवळ लपून बसले. ३५  दुसऱ्‍या दिवशी एबदचा मुलगा गाल शहराच्या दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला, तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक लपून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर आले. ३६  गालने त्यांना बघितलं तेव्हा तो जबूलला म्हणाला: “ते बघ! लोक डोंगरांवरून खाली उतरत आहेत.” पण जबूल त्याला म्हणाला: “तुला जे दिसतंय ती माणसं नाहीत, त्या डोंगरांच्या सावल्या आहेत.” ३७  नंतर गाल पुन्हा म्हणाला: “बघ! लोक डोंगराळ प्रदेशाच्या मधल्या भागातून उतरत आहेत. आणि एक तुकडी मौननीमच्या मोठ्या झाडाच्या रस्त्याने येत आहे.” ३८  त्यावर जबूल त्याला म्हणाला: “तू खूप फुशारकी मारत होतास ना, की ‘कोण हा अबीमलेख, आणि आम्ही का त्याच्या अधीन राहावं?’+ मग आता काय झालं? तू याच लोकांना तुच्छ लेखलं होतंस ना? आता जा आणि लढ त्यांच्याशी.” ३९  म्हणून गाल शखेमच्या पुढाऱ्‍यांना घेऊन अबीमलेखशी लढायला गेला. ४०  पण लढाईत अबीमलेखने गालचा पाठलाग केला, तेव्हा गालने तिथून पळ काढला. बरेच लोक मारले गेले आणि अगदी शहराच्या दरवाजापर्यंत लोकांचे मृतदेह पडले. ४१  मग अबीमलेख अरुमा इथे आपल्या घरी परत गेला. आणि जबूलने+ गालला आणि त्याच्या भावांना शखेममधून हाकलून दिलं. ४२  दुसऱ्‍या दिवशी, शखेमचे लोक शहराबाहेर पडत असल्याची खबर अबीमलेखला देण्यात आली. ४३  म्हणून त्याने आपल्या सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि हल्ला करण्यासाठी त्यांना शहराबाहेर लपून बसायला सांगितलं. मग लोक शहरातून बाहेर येत असल्याचं त्याने बघितलं, तेव्हा त्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारून टाकलं. ४४  दोन तुकड्या शहराबाहेर असलेल्या सर्व लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असताना, अबीमलेख आणि त्याच्यासोबतची माणसं पुढे आली, आणि त्यांनी शहराच्या दरवाजाचा ताबा घेतला. ४५  अबीमलेखने दिवसभर त्या शहराशी लढाई करून ते ताब्यात घेतलं. त्याने त्या शहरातल्या लोकांना मारून टाकलं. मग ते शहर उद्ध्‌वस्त करून+ त्याने तिथल्या जमिनीवर मीठ फेकलं. ४६  शखेमच्या मनोऱ्‍यात* राहणाऱ्‍या पुढाऱ्‍यांनी ही गोष्ट ऐकली, तेव्हा ते लगेच एल-बरीथ*+ दैवताच्या मंदिरातल्या आतल्या खोलीत* जाऊन लपले. ४७  शखेमच्या मनोऱ्‍यातले सगळे पुढारी एकत्र जमल्याची खबर अबीमलेखला मिळाली, तेव्हा लगेच ४८  तो आणि त्याच्यासोबतची सगळी माणसं सलमोन डोंगरावर गेली. तिथे अबीमलेखने कुऱ्‍हाड घेऊन झाडाची एक फांदी तोडली आणि ती उचलून आपल्या खांद्यावर घेतली. मग सोबत असलेल्या लोकांना तो म्हणाला: “मी जसं केलं, तसंच तुम्हीही करा. वेळ घालवू नका!” ४९  तेव्हा सर्व लोकांनी फांद्या तोडून त्या खांद्यावर घेतल्या आणि ते अबीमलेखच्या मागे जाऊ लागले. मग, त्या फांद्या मंदिरातल्या आतल्या खोलीच्या आजूबाजूला रचून त्यांनी आग लावली. अशा प्रकारे, शखेमच्या मनोऱ्‍यातले सगळे लोक, म्हणजे जवळजवळ १,००० स्त्री-पुरुष मरण पावले. ५०  मग अबीमलेख तेबेस इथे गेला. आणि त्या शहराला वेढा घालून त्याने ते ताब्यात घेतलं. ५१  शहराच्या मधोमध एक मजबूत मनोरा* होता. म्हणून सगळे स्त्री-पुरुष आणि शहराचे सगळे पुढारी त्यात पळून गेले. त्यांनी मनोऱ्‍याचा दरवाजा आतून बंद केला आणि ते छतावर गेले. ५२  अबीमलेख मनोऱ्‍यापर्यंत पोहोचला आणि त्याने त्यावर हल्ला केला. मनोऱ्‍याला आग लावण्यासाठी तो त्याच्या दरवाजाजवळ गेला. ५३  तेवढ्यात एका स्त्रीने अबीमलेखच्या डोक्यावर जात्याचा वरचा दगड घातला आणि त्याची कवटी फोडली.+ ५४  तेव्हा अबीमलेखने लगेच, आपल्या शस्त्रवाहकाला बोलावून म्हटलं: “तुझी तलवार काढ आणि मला मारून टाक. नाहीतर, एका बाईने मला मारून टाकलं असं लोक म्हणतील.” म्हणून त्याच्या शस्त्रवाहकाने तलवारीने त्याला भोसकलं आणि तो मेला. ५५  अबीमलेख मेला आहे हे पाहून सर्व इस्राएली माणसं आपल्या घरी परत गेली. ५६  अबीमलेखने आपल्या ७० भावांना मारून आपल्या वडिलांविरुद्ध जो अपराध केला होता त्याबद्दल देवाने अशा रितीने त्याची परतफेड केली.+ ५७  तसंच, शखेमच्या माणसांची सगळी दुष्टाई देवाने त्यांच्याच माथ्यावर उलटवली. आणि अशा प्रकारे यरुब्बालचा+ मुलगा योथाम याने दिलेला शाप खरा ठरला.+

तळटीपा

शब्दशः “आईचे वडील.”
म्हणजे, गिदोनचा. शास ६:३२ पाहा.
किंवा कदाचित, “जमीनदारांना.”
शब्दशः “मी इतर झाडांवर का डोलू?”
शब्दशः “मी इतर झाडांवर का डोलू?”
शब्दशः “मी इतर झाडांवर का डोलू?”
किंवा “राजा असल्यासारखं राज्य केलं.”
बहुतेक शखेमचा अधिकारी जबूल.
किंवा “चलाखीने.”
अतिशय उंच इमारत.
याला बाल-बरीथ असंही म्हटलं जातं.
किंवा “सगळ्यात सुरक्षित खोलीत.”
अतिशय उंच इमारत.