सफन्या ३:१-२०
३ त्या बंडखोर, दूषित आणि अत्याचारी नगरीचा धिक्कार असो!+
२ तिला कोणाचंही ऐकायचं नव्हतं;+ तिने ताडन* स्वीकारलं नाही.+
तिने यहोवावर भरवसा ठेवला नाही;+ ती आपल्या देवाजवळ गेली नाही.+
३ तिच्यामधले अधिकारी गरजणारे सिंह आहेत.+
तिचे न्यायाधीश रात्री शिकार करणारे लांडगे आहेत.
सकाळपर्यंत ते चावायला साधं हाडही ठेवत नाहीत.
४ तिचे संदेष्टे उद्धट आणि विश्वासघातकी आहेत.+
तिचे याजक पवित्र गोष्टी दूषित करतात;+ते कायदा मोडतात.+
५ तिच्यामध्ये राहणारा यहोवा नीतिमान आहे;+ तो कधीही अन्याय करत नाही.
पहाट जशी न चुकता उगवते,तसा तो दररोज सकाळी आपले न्याय-निर्णय प्रकट करतो.+
पण तरी अनीतिमान माणसाला लाज वाटत नाही.+
६ “मी राष्ट्रांचा नाश केला; त्यांचे बुरूज उजाड झाले.
मी त्यांचे रस्ते उद्ध्वस्त केले, त्यामुळे त्यांवरून कोणी ये-जा करत नव्हतं.
त्यांची शहरं ओसाड पडली, त्यांत एकही माणूस, एकही रहिवासी उरला नाही.+
७ तिचं ठिकाण नष्ट होऊ नये म्हणून,+मी म्हणालो, ‘आता तरी तू नक्कीच माझं भय मानशील आणि ताडन* स्वीकारशील,’+
कारण या सर्व गोष्टींचा मला तिच्याकडून हिशोब घ्यावा लागेल.*
पण ते आणखीनच दुष्टपणे वागू लागले.+
८ यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी मी लूट घेण्यासाठी उठीन,*त्या दिवसापर्यंत माझी धीराने वाट पाहत राहा;+कारण मी राष्ट्रांना गोळा करण्याचा, राज्यांना एकत्र आणण्याचा,आणि त्यांच्यावर माझा संताप, माझा सगळा क्रोध ओतण्याचा निर्णय* घेतला आहे;+कारण माझ्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल.+
९ तेव्हा मी लोकांची भाषा बदलून त्यांना एक शुद्ध भाषा देईन,म्हणजे ते सर्व जण यहोवा या नावाने मला हाक मारतील,आणि खांद्याला खांदा लावून माझी सेवा करतील.’*+
१० मला प्रार्थना करणारे, म्हणजे पांगापांग झालेले माझे लोक,कूशच्या नद्यांच्या प्रदेशातून, माझ्यासाठी भेट आणतील.+
११ त्या दिवशी, माझ्याविरुद्ध केलेल्या तुझ्या सर्व बंडखोर कृत्यांबद्दल,तुला लज्जित केलं जाणार नाही.+
कारण मी तुझ्यामधून गर्विष्ठपणे बढाया मारणाऱ्यांना काढून टाकीन;मग माझ्या पवित्र पर्वतावर, तू पुन्हा कधीही गर्विष्ठपणे वागणार नाहीस.+
१२ मी तुझ्यामध्ये नम्र आणि दीनदुबळ्या लोकांना राहू देईन,+आणि ते यहोवा या माझ्या नावामध्ये आश्रय घेतील.
१३ इस्राएलचे उरलेले लोक+ अनीतीने वागणार नाहीत;+ते खोटं बोलणार नाहीत किंवा आपल्या जिभेने कोणाची फसवणूक करणार नाहीत.
ते खातील* आणि आराम करतील; कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”+
१४ हे सीयोनच्या मुली, आनंदाने जयजयकार कर!
हे इस्राएल, जयघोष कर!+
हे यरुशलेमच्या मुली,+ खूश हो आणि पूर्ण मनाने आनंद साजरा कर!
१५ यहोवाने तुझ्याविरुद्धचे न्यायदंड रद्द केले आहेत.+
त्याने तुझ्या शत्रूला परत पाठवलं आहे.+
इस्राएलचा राजा यहोवा तुझ्यासोबत आहे.+
यापुढे तुला संकटाची भीती वाटणार नाही.+
१६ त्या दिवशी यरुशलेमला असं म्हटलं जाईल:
“हे सीयोन, घाबरू नकोस.+
निराश होऊ नकोस.
१७ तुझा देव यहोवा तुझ्यासोबत आहे.+
एका वीर योद्ध्याप्रमाणे, तो तुला वाचवेल.
तुझ्यामुळे त्याला अतिशय आनंद होईल.+
तो आपल्या प्रेमात शांत* होईल.
तुझ्याबद्दल आनंद झाल्यामुळे तो मोठ्याने गाईल.
१८ तुझ्या सणांना येऊ न शकल्यामुळे जे दुःख करतात,+ त्यांना मी गोळा करीन;परक्या देशात निंदा सहन करत असल्यामुळे ते तुझ्याकडे येऊ शकले नाहीत.+
१९ पाहा! त्या वेळी मी तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या सर्वांना शिक्षा देईन;+जे* लंगडत होते त्यांना मी वाचवीन,+
ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांना मी एकत्र करीन.+
आणि ज्या देशात त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं,त्या देशात मी त्यांना स्तुती आणि प्रतिष्ठा* मिळवून देईन.
२० ज्या वेळी मी तुम्हाला गोळा करीन,त्या वेळी मी तुम्हाला परत आणीन.
मी तुमच्यादेखत तुमच्या बंदिवानांना परत आणीन,+आणि अशा रितीने पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा* आणि स्तुती मिळवून देईन,”+ असं यहोवा म्हणतो.
तळटीपा
^ किंवा “शिस्त.”
^ किंवा “शिक्षा करावी लागेल.”
^ किंवा “शिस्त.”
^ किंवा कदाचित, “साक्षीदार म्हणून उभा राहीन.”
^ किंवा “न्याय-निर्णय.”
^ किंवा “एकतेत माझी उपासना करतील.”
^ किंवा “चरतील.”
^ किंवा “गप्प; समाधानी; तृप्त.”
^ शब्दशः “जी.”
^ शब्दशः “एक नाव.”
^ शब्दशः “एक नाव.”