स्तोत्रं १०३:१-२२
दावीदचं गीत.
१०३ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!
मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.
२ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!
त्याचे सगळे उपकार मी कधीही विसरणार नाही.+
३ तो तुझे सर्व अपराध क्षमा करतो+आणि तुझी सगळी दुखणी बरी करतो.+
४ तो तुला खळग्यातून* सोडवतो+आणि त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचा आणि दयेचा मुकुट तुला घालतो.+
५ तो तुला आयुष्यभर चांगल्या गोष्टी देऊन तृप्त करतो;+त्यामुळे तू गरुडासारखा तरुण आणि जोमदार राहतोस.+
६ जुलूम सहन करणाऱ्या सर्वांसाठी,यहोवा नीतिमत्त्वाने+ आणि न्यायाने कार्य करतो.+
७ त्याने मोशेला आपले मार्ग दाखवले,+इस्राएलच्या सर्व मुलांना त्याने आपली कार्यं दाखवली.+
८ यहोवा दयाळू आणि करुणामय* आहे;+तो सहनशील आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला देव आहे.+
९ तो कायम दोष दाखवत राहणार नाही+आणि सर्वकाळ मनात राग ठेवणार नाही.+
१० त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही+आणि आपल्या अपराधांच्या मानाने आपल्याला मोबदला दिला नाही.+
११ कारण आकाश पृथ्वीपेक्षा जितकं उंच आहे,तितकंच त्याचं भय मानणाऱ्यांसाठी, त्याचं एकनिष्ठ प्रेम मोठं आहे.+
१२ पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.+
१३ पिता ज्याप्रमाणे आपल्या मुलांना दया दाखवतो,त्याचप्रमाणे यहोवाने त्याचं भय मानणाऱ्यांवर दया केली आहे.+
१४ कारण आपली रचना कशी करण्यात आली, हे त्याला माहीत आहे,+आपण फक्त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो.+
१५ नाशवंत माणसाचं आयुष्य गवतासारखं असतं;+तो रानातल्या फुलाप्रमाणे उमलतो.+
१६ पण वारा वाहिला, की ते नाहीसं होतं,जणू ते तिथे नव्हतंच.*
१७ पण जे यहोवाची भीती बाळगतात,त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम+आणि त्यांच्या नातवंडांबद्दल त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ* टिकून राहतं.+
१८ जे त्याचा करार पाळतात;+जे त्याच्या आदेशांचं काळजीपूर्वक पालन करतात, त्यांच्यासाठी ते सर्वकाळ टिकून राहतं.
१९ यहोवाने स्वर्गात आपलं राजासन स्थापन केलंय.+
त्याचं राज्य सर्वांवर आहे.+
२० यहोवाच्या आज्ञेप्रमाणे चालणाऱ्या+ आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणाऱ्या*त्याच्या सर्व शक्तिशाली स्वर्गदूतांनो,+ त्याची स्तुती करा!
२१ यहोवाच्या सर्व सैन्यांनो,त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करणाऱ्या त्याच्या सेवकांनो,+ त्याची स्तुती करा!+
२२ यहोवा राज्य करत असलेल्या सर्व ठिकाणांत,*त्याने निर्माण केलेल्या सर्व जिवांनो, त्याची स्तुती करा!
मी अगदी अंतःकरणापासून यहोवाची स्तुती करीन.
तळटीपा
^ किंवा “कबरेतून.”
^ किंवा “कृपाळू.”
^ किंवा “प्रेमदयेने.”
^ शब्दशः “आणि त्याचं ठिकाण त्यापुढे त्याला ओळखत नाही.”
^ किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”
^ शब्दशः “त्याच्या शब्दाचा आवाज ऐकणाऱ्या.”
^ किंवा “त्याच्या सर्वोच्च अधिकाराच्या सर्व ठिकाणांत.”