स्तोत्रं २४:१-१०
-
गौरवी राजा दरवाजातून आत येतो
-
पृथ्वी यहोवाची आहे (१)
-
दावीदचं गीत.
२४ पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही यहोवाचं आहे;+उपजाऊ जमीन आणि तिच्यावर राहणारे सर्व त्याचेच आहेत.
२ कारण त्याने समुद्रांवर तिचा पाया घातलाय;+त्याने नद्यांवर तिला स्थिर केलंय.
३ यहोवाच्या पर्वतावर कोण चढून जाऊ शकतो?+
आणि त्याच्या पवित्र ठिकाणी कोण उभा राहू शकतो?
४ ज्याचे हात निर्दोष आणि मन शुद्ध आहे;+ज्याने माझ्या जिवाची* खोटी शपथ घेतली नाही;किंवा कपटी मनाने शपथ घेतली नाही,+ असा माणूस.
५ त्याला यहोवाकडून आशीर्वाद मिळतील;+त्याचं तारण करणारा देव त्याला नीतिमान ठरवेल.*+
६ ही त्याचा शोध घेणाऱ्यांची पिढी आहे.
याकोबच्या देवा, हे तुझी कृपा मिळवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. (सेला )
७ दरवाजांनो, आपली डोकी वर करा;+प्राचीन काळातल्या प्रवेशद्वारांनो, उघडा!*
गौरवी राजाला आत येऊ द्या!+
८ हा गौरवी राजा कोण?
तो बलवान आणि शक्तिशाली यहोवा आहे;+तो युद्धात पराक्रमी असलेला यहोवा आहे.+
९ दरवाजांनो, आपली डोकी वर करा;+प्राचीन काळातल्या प्रवेशद्वारांनो, उघडा!
गौरवी राजाला आत येऊ द्या!
१० कोण आहे हा गौरवी राजा?
तो गौरवी राजा, सैन्यांचा देव यहोवा आहे.+ (सेला )
तळटीपा
^ किंवा “माझ्या जीवनाची.” शपथ घेणारी व्यक्ती यहोवाच्या जीवनाची शपथ घेते, असं यावरून सूचित होतं.
^ किंवा “न्याय देईल.”
^ किंवा “उठा.”