स्तोत्रं ३१:१-२४
दावीदचं गीत. संचालकासाठी.
३१ हे यहोवा, मी तुझा आश्रय घेतलाय.+
मला कधीच लज्जित होऊ देऊ नकोस.+
तुझ्या नीतिमत्त्वामुळे माझी सुटका कर.+
२ माझी प्रार्थना ऐक.*
माझी सुटका करायला लवकर ये.+
माझ्यासाठी पर्वतावरच्या गडासारखा हो;सुरक्षित आश्रय होऊन मला वाचव.+
३ कारण तू माझा खडक आणि माझा गड आहेस;+तुझ्या नावासाठी+ तू मला मार्ग दाखवशील आणि सांभाळशील.+
४ त्यांनी गुप्तपणे माझ्यासाठी पसरलेल्या जाळ्यातून तू मला सोडवशील,+कारण तू माझा दुर्ग आहेस.+
५ मी आपलं जीवन तुझ्या हातात सोपवतो.+
हे यहोवा, सत्याच्या देवा,*+ तू मला सोडवलं आहेस.
६ बिनकामाच्या, निरुपयोगी मूर्तींची उपासना करणाऱ्यांचा मी द्वेष करतो;माझा भरवसा तर यहोवावर आहे.
७ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मी मनापासून आनंदी होईन,कारण तू माझं दुःख पाहिलं आहेस;+मला* होणाऱ्या यातना तू जाणतोस.
८ तू मला शत्रूंच्या हाती दिलं नाहीस;तर एका सुरक्षित* ठिकाणी तू मला उभं केलं आहेस.
९ हे यहोवा, माझ्यावर कृपा कर, कारण मी दुःखी आहे.
शोकाने माझी नजर आणि माझं सगळं शरीर कमजोर झालंय.+
१० दुःखाने माझं जीवन संपवून टाकलंय+आणि कण्हण्यात माझं आयुष्य गेलंय.+
माझ्या अपराधामुळे मी दुर्बळ झालोय;माझी हाडं झिजली आहेत.+
११ माझे सर्व शत्रू, खासकरून माझे शेजारीमला तुच्छ लेखतात.+
माझ्या ओळखीचे लोक मला घाबरतात;चारचौघांत मला पाहिल्यावर, ते माझ्यापासून दूर पळतात.+
१२ त्यांनी माझी आठवण मनातून काढून टाकली आहे;मेलेल्या माणसाप्रमाणे ते मला विसरून गेले आहेत.
माझी अवस्था एखाद्या फुटलेल्या रांजणासारखी झाली आहे.
१३ भीतीने मला घेरलंय,+कारण मी बऱ्याच खोट्या अफवा ऐकल्या आहेत.
ते माझ्याविरुद्ध एकत्र येऊन,मला मारून टाकण्याचा* कट रचतात.+
१४ पण हे यहोवा, माझा तुझ्यावर भरवसा आहे.+
मी म्हणतो, “तू माझा देव आहेस.”+
१५ माझं आयुष्य* तुझ्या हातात आहे.
माझ्या शत्रूंपासून आणि माझा छळ करणाऱ्यांपासून माझी सुटका कर.+
१६ तुझ्या या सेवकावर कृपा कर.+
तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी मला वाचव.
१७ हे यहोवा, मी तुला हाक मारीन, तेव्हा मला लज्जित होऊ देऊ नकोस.+
दुष्टांची लाजिरवाणी स्थिती होऊ दे;+ते कबरेत* कायमचे गप्प होवोत.+
१८ खोटं बोलणारे मुके होऊ दे,+नीतिमानांना तुच्छ लेखून, त्यांच्याशी गर्विष्ठपणे आणि उद्धटपणे बोलणाऱ्यांची वाचा जाऊ दे.
१९ तुझा चांगुलपणा किती विशाल आहे!+
तुझं भय मानणाऱ्यांसाठी तू तो साठवून ठेवला आहेस.+
तुझा आश्रय घेणाऱ्यांसाठी, तू तो सर्व लोकांसमोर प्रकट करतोस.+
२० तू त्यांना माणसांच्या कटकारस्थानांपासून,आपल्या जवळ, एका गुप्त ठिकाणी लपवशील;+तू निंदा करणाऱ्यांच्या हल्ल्यांपासून,*त्यांना आपल्या आश्रयात लपवशील.+
२१ यहोवाची स्तुती असो!
कारण त्याने वेढा पडलेल्या शहरात,+ अद्भुत रितीने माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखवलंय.+
२२ मी तर घाबरलो आणि म्हणालो:
“तुझ्या डोळ्यांसमोर मी मरून जाईन.”+
पण मी तुला हाक मारली, तेव्हा तू माझ्या याचना ऐकल्यास.+
२३ यहोवाच्या सर्व एकनिष्ठ सेवकांनो, त्याच्यावर प्रेम करा!+
यहोवा विश्वासू लोकांचं रक्षण करतो,+पण गर्विष्ठपणे वागणाऱ्यांची तो चांगलीच परतफेड करतो.+
२४ यहोवाची वाट पाहणाऱ्यांनो,+धैर्यवान व्हा! आपलं मन खंबीर करा!+
तळटीपा
^ किंवा “खाली वाकून ऐक.”
^ किंवा “विश्वासू देवा.”
^ किंवा “माझ्या जिवाला.”
^ किंवा “मोकळ्या.”
^ किंवा “माझा जीव घेण्याचा.”
^ शब्दशः “माझे काळ.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “जिभांच्या भांडणांपासून.”