स्तोत्रं ३६:१-१२
यहोवाचा सेवक दावीद याचं गीत. संचालकासाठी.
३६ दुष्टाचा अपराध त्याच्या मनाशी बोलतो;देवाची भीती त्याला माहीतच नाही.+
२ तो मनातल्या मनात स्वतःची इतकी प्रशंसा करतो,की त्याला आपला अपराध दिसत नाही आणि त्याबद्दल घृणाही वाटत नाही.+
३ त्याच्या तोंडचे शब्द कपटीपणाचे आणि हानिकारक असतात;चांगलं ते करण्याची सखोल समज त्याच्याजवळ नाही.
४ तो बिछान्यावर पडल्या-पडल्या इतरांचं नुकसान करण्याचे बेत आखतो.
त्याने चुकीचा मार्ग धरलाय;तो वाईट गोष्टी नाकारत नाही.
५ हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाला भिडलंय,+तुझा विश्वासूपणा आभाळापर्यंत पोहोचलाय.
६ तुझं नीतिमत्त्व भव्य पर्वतांसारखं* आहे;+तुझे निर्णय विशाल, अथांग सागरासारखे आहेत.+
हे यहोवा, तू माणसाला आणि प्राण्यांना सांभाळतोस.*+
७ हे देवा, तुझं एकनिष्ठ प्रेम किती अनमोल आहे!+
तुझ्या पंखांच्या छायेत माणसं आश्रय घेतात.+
८ तुझ्या घरातल्या उत्कृष्ट गोष्टींनी ते तृप्त होतात;+तुझ्या सुखांच्या भरून वाहणाऱ्या नदीतून तू त्यांना पिऊ देतोस.+
९ जीवनाचा उगम तुझ्याजवळ आहे;+तुझ्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश दिसतो.+
१० तुला ओळखणाऱ्यांना तू नेहमी एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा,+सरळ मनाच्या लोकांना तुझं नीतिमत्त्व पाहू दे.+
११ मला तुडवण्याची गर्विष्ठ माणसाला संधी देऊ नकोस
मला हाकलून लावण्याची दुष्टाला परवानगी देऊ नकोस.
१२ पाहा! अपराधी तिथे पडले आहेत;तू त्यांना खाली पाडलं आहेस आणि त्यांना उठता येत नाही.+