स्तोत्रं ७८:१-७२
आसाफचं गीत.+ मस्कील.*
७८ माझ्या लोकांनो, माझा उपदेश* ऐका;माझ्या तोंडून निघणाऱ्या शब्दांकडे लक्ष द्या.
२ मी आपलं तोंड उघडून नीतिवचन बोलीन.
मी पूर्वीच्या काळातली कोडी सांगीन.+
३ ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या आहेत आणि ज्या आम्हाला माहीत आहेत,ज्या आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितल्या,+
४ त्या आम्ही आपल्या मुलांपासून लपवणार नाही.
येणाऱ्या पिढ्यांना आम्ही त्यांबद्दल सांगू.+
यहोवाची स्तुतिपात्र कार्यं आणि त्याचं सामर्थ्य+आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी+ यांबद्दल आम्ही त्यांना सांगू.
५ त्याने याकोबला एक स्मरण-सूचना* दिलीआणि इस्राएलमध्ये एक नियम घालून दिला;त्याने आमच्या वाडवडिलांना अशी आज्ञा दिली,की त्यांनी या गोष्टी आपल्या मुलाबाळांना सांगाव्यात.+
६ म्हणजे पुढच्या पिढीला,पुढे जन्माला येणाऱ्या मुलांना त्या कळतील+आणि मग ते लोकसुद्धा आपल्या मुलाबाळांना त्यांबद्दल सांगतील.+
७ यामुळे ते देवावर भरवसा ठेवतीलआणि देवाची कार्यं विसरून जाणार नाहीत.+
उलट, ते त्याच्या आज्ञांचं पालन करतील.+
८ मग ते आपल्या वाडवडिलांसारखे होणार नाहीत,कारण ती तर एक हट्टी आणि बंडखोर पिढी होती.+
अस्थिर* मनाच्या लोकांची+आणि देवाला विश्वासू नसलेल्या लोकांची ती पिढी होती.
९ एफ्राईमचे लोक धनुष्य घेऊन सज्ज होते,पण लढाईच्या दिवशी त्यांनी माघार घेतली.
१० त्यांनी देवाचा करार मोडला+आणि ते त्याच्या नियमाप्रमाणे चालायला तयार झाले नाहीत.+
११ त्याने आपल्यासाठी काय काय केलंय, हे त्यांनी आठवणीत ठेवलं नाही;+त्याने त्यांच्यासमोर केलेली अद्भुत कार्यं ते विसरून गेले.+
१२ त्याने इजिप्तच्या देशात, सोअनच्या प्रदेशात+त्यांच्या वाडवडिलांच्या देखत आश्चर्यकारक गोष्टी केल्या.+
१३ त्यांना पलीकडे जाता यावं म्हणून त्याने समुद्राला दुभागलं,त्याने पाण्याला भिंतीसारखं* उभं केलं.+
१४ त्याने दिवसा ढगाच्या साहाय्यानेआणि रात्रभर अग्नीच्या प्रकाशाने त्यांना मार्ग दाखवला.+
१५ त्याने ओसाड रानात खडक फोडले,त्याने महासागरांच्या पाण्याप्रमाणे त्यांना भरपूर पाणी प्यायला दिलं.+
१६ त्याने खडकातून झरे वाहायला लावलेआणि नद्यांप्रमाणे पाणी वाहायला लावलं.+
१७ पण तरीही ते ओसाड रानात सर्वोच्च देवाविरुद्ध बंड करून,त्याच्याविरुद्ध पाप करत राहिले.+
१८ त्यांना हव्या असलेल्या अन्नाची* मागणी करून,त्यांनी आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली.*+
१९ ते देवाच्या विरोधात बोललेआणि म्हणाले: “देव ओसाड रानात आपल्याला अन्न देऊ शकतो का?”+
२० पाहा! त्याने खडकाला मारलंतेव्हा पाणी वाहू लागलं आणि झरे उफाळून आले.+
तरीसुद्धा ते म्हणाले: “तो आपल्याला भाकरही देऊ शकेल का,किंवा आपल्या लोकांना मांस देऊ शकेल का?”+
२१ यहोवाने त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला संताप आला;+याकोबविरुद्ध अग्नी+ पेटलाआणि इस्राएलविरुद्ध त्याचा क्रोध भडकला.+
२२ कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही;+देव आपल्याला वाचवू शकतो, असा भरवसा त्यांनी बाळगला नाही.
२३ म्हणून त्याने आकाशातल्या मेघांना आज्ञा दिलीआणि आकाशाची दारं उघडली.
२४ त्याने त्यांच्यासाठी मान्नाचा वर्षाव केला;त्याने त्यांना स्वर्गातलं धान्य दिलं.+
२५ माणसांनी स्वर्गदूतांचं*+ अन्न खाल्लं;ते खाऊन तृप्त होतील इतकं अन्न त्याने त्यांना दिलं.+
२६ त्याने आकाशात पूर्वेकडचा वारा;आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा वाहायला लावला.+
२७ मग त्याने धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा वर्षाव केला,त्याने समुद्रकिनारी असलेल्या वाळूच्या कणांसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला.
२८ त्याने आपल्या छावणीच्या मधोमध;आपल्या तंबूंच्या अवतीभवती त्यांना पाडलं.
२९ तेव्हा त्यांनी ते अधाश्यासारखं खाल्लं.
त्यांना जे हवं होतं, ते देवाने त्यांना दिलं.+
३० पण त्यांना आणखी हाव सुटली;तेव्हा, अन्न अजून त्यांच्या तोंडातच असताना,
३१ देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला.+
त्याने त्यांच्यातल्या सर्वात शक्तिशाली पुरुषांना ठार मारलं.+
त्याने इस्राएलच्या तरुणांना खाली पाडलं.
३२ तरीसुद्धा, ते आणखी जास्त पाप करत राहिले+आणि त्याच्या अद्भुत कार्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.+
३३ म्हणून, त्याने त्यांचे दिवस श्वासाप्रमाणे संपवले.+
त्याने त्यांची वर्षं, अचानक आलेल्या संकटांनी संपवून टाकली.
३४ पण जितक्या वेळा तो त्यांना ठार मारायचा, तितक्या वेळा ते त्याचा शोध घ्यायचे;+ते परत फिरून देवाला शोधायचे.
३५ देव आपला खडक आहे+आणि सर्वोच्च देव आपला सोडवणारा* आहे,+ हे त्यांना आठवायचं.
३६ पण त्यांनी आपल्या तोंडाने त्याची फसवणूक करायचा प्रयत्न केलाआणि ते आपल्या जिभेने त्याच्याशी खोटं बोलले.
३७ त्याची सेवा करण्यासाठी त्यांचं मन स्थिर नव्हतं.+
त्याच्या कराराशी ते विश्वासू राहिले नाहीत.+
३८ पण तो दयाळू होता;+त्याने त्यांच्या अपराधाची क्षमा केली* आणि त्यांचा नाश केला नाही.+
त्याने बऱ्याचदा आपला राग आवरला;+आपला सगळा संताप त्याने व्यक्त केला नाही.
३९ कारण ते केवळ मानव आहेत;+एकदा वाहून गेल्यावर परत न येणाऱ्या वाऱ्यासारखे ते आहेत, हे त्याने लक्षात ठेवलं.
४० त्यांनी ओसाड रानात कित्येकदा त्याच्याविरुद्ध बंड केलं+
आणि वाळवंटात त्याचं मन दुखावलं!+
४१ त्यांनी पुन्हा पुन्हा देवाची परीक्षा पाहिली+आणि इस्राएलच्या पवित्र देवाला त्यांनी दुःख दिलं.
४२ त्याचं सामर्थ्य* त्यांनी आठवणीत ठेवलं नाही,त्याने शत्रूपासून त्यांना वाचवलं*+ तो दिवस ते विसरले.
४३ त्याने इजिप्तमध्ये आपली चिन्हं दाखवली+आणि सोअनच्या प्रदेशात आपले चमत्कार दाखवले.
४४ त्याने नाईलच्या कालव्यांतल्या पाण्याचं रक्त केलं+त्यामुळे लोक आपल्या पाटांतलं पाणी पिऊ शकले नाहीत.
४५ त्याने त्यांना खाऊन टाकण्यासाठी गोमाश्यांचे थवे;+त्यांचा नाश करण्यासाठी बेडूक पाठवले.+
४६ त्याने त्यांची पिकं अधाशी टोळांना दिली;त्यांच्या कष्टाचं फळ त्याने टोळांच्या झुंडींना दिलं.+
४७ त्याने गारपिटीने+ त्यांच्या द्राक्षमळ्यांची नासधूस केलीआणि गारा पाडून त्यांची उंबराची झाडं नष्ट केली.
४८ त्याने त्यांच्या ओझी वाहणाऱ्या प्राण्यांना गारांच्याआणि त्यांच्या गुराढोरांना विजांच्या* हवाली केलं.+
४९ त्याने आपल्या क्रोधाच्या अग्नीने,संताप, रोष आणि विपत्ती यांनी त्यांना पीडित केलं.
त्यांच्यावर संकटं आणण्यासाठी त्याने स्वर्गदूतांच्या दलांना पाठवलं.
५० त्याने आपल्या रागाला मोकळी वाट करून दिली.
त्याने त्यांना मृत्यूपासून वाचवलं नाहीआणि भयंकर रोगाने त्यांना मारलं.
५१ शेवटी, त्याने इजिप्तच्या सर्व प्रथमपुत्रांना ठार मारलं;+हामच्या तंबूंत जन्मलेल्या त्यांच्या पुरुषत्वाच्या पहिल्या फळांना त्याने मारून टाकलं.
५२ मग त्याने आपल्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणलंआणि मेंढरांप्रमाणे त्यांना ओसाड रानातून नेलं.+
५३ त्याने त्यांना अगदी सुखरूप नेलं,त्यांना अजिबात भीती वाटली नाही;+समुद्राने त्यांच्या शत्रूंना गडप केलं.+
५४ मग त्याने त्यांना आपल्या पवित्र देशात आणलं,+आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या या डोंगराळ प्रदेशात त्याने त्यांना आणलं.+
५५ त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना घालवून दिलं;+त्याने मोजायच्या दोरीने त्यांना वारशाची जमीन वाटून दिली.+
इस्राएलच्या वंशांना त्याने आपापल्या घरांत वसवलं.+
५६ पण ते सर्वोच्च देवाची परीक्षा पाहत राहिले* आणि त्याच्याविरुद्ध बंड करत राहिले;+त्याच्या स्मरण-सूचनांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही.+
५७ त्यांनीही पाठ फिरवली आणि ते आपल्या वाडवडिलांइतकेच विश्वासघातकी निघाले.+
सैल पडलेल्या धनुष्यासारखे ते बेभरवशाचे होते.+
५८ उच्च स्थानांवर खोट्या देवांची उपासना करून ते त्याला क्रोधित करत राहिले,+आपल्या कोरलेल्या मूर्तींनी त्यांनी त्याला ईर्ष्येला पेटवलं.*+
५९ हे सर्व पाहून देवाला संताप आला,+म्हणून त्याने इस्राएलला पूर्णपणे सोडून दिलं.
६० शेवटी त्याने शिलोच्या उपासना मंडपाचा त्याग केला,+ज्या तंबूत तो माणसांमध्ये राहिला होता, त्याचा त्याने त्याग केला.+
६१ आपल्या सामर्थ्याचं प्रतीक त्याने बंदिवासात जाऊ दिलं;आपलं वैभव त्याने शत्रूच्या हाती दिलं.+
६२ त्याने आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केलं.+
तो आपल्या वारशाच्या लोकांवर संतप्त झाला.
६३ आगीने त्याच्या तरुणांना भस्म केलं,त्याच्या कुमारींसाठी कोणीही लग्नाची गाणी म्हटली नाहीत.*
६४ त्याच्या याजकांना तलवारीने ठार मारण्यात आलं,+त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.+
६५ मग झोपेतून उठावं तसा यहोवा उठला,+द्राक्षारसाच्या नशेतून जागा होणाऱ्या योद्ध्याप्रमाणे+ तो उठला.
६६ त्याने त्याच्या शत्रूंना हाकलून लावलं;+त्याने त्यांना सर्वकाळासाठी लज्जित केलं.
६७ त्याने योसेफच्या तंबूला झिडकारलं;एफ्राईमच्या वंशाला त्याने निवडलं नाही.
६८ तर त्याने यहूदाच्या वंशाला निवडलं,+त्याला प्रिय असलेला सीयोन पर्वत त्याने निवडला.+
६९ त्याने आपलं उपासनेचं ठिकाण स्वर्गासारखं स्थिर केलं.*+
त्याने सर्वकाळासाठी स्थापित केलेल्या पृथ्वीसारखं त्याला स्थिर केलं.+
७० त्याने आपला सेवक दावीद याला निवडलं.+
त्याने त्याला मेंढवाड्यांतून घेतलं.+
७१ दूध पाजणाऱ्या मेंढ्यांची काळजी घेणाऱ्यालात्याने याकोबचा, आपल्या लोकांचा मेंढपाळ बनवलं.+
त्याने त्याला आपला वारसा असलेल्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ बनवलं.+
७२ त्याने* अगदी खऱ्या मनाने त्यांचा सांभाळ केला,+निपुण हातांनी त्याने त्यांचं मार्गदर्शन केलं.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “नियम.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तयार नसलेल्या.”
^ किंवा “बांधासारखं.”
^ किंवा “आपल्या जिवासाठी अन्नाची.”
^ किंवा “देवाला आव्हान केलं.”
^ किंवा “ताकदवानांचं.”
^ किंवा “आपल्यासाठी सूड घेणारा.”
^ शब्दशः “झाकला.”
^ शब्दशः “हात.”
^ शब्दशः “सोडवलं.”
^ किंवा कदाचित, “तापाच्या.”
^ किंवा “आव्हान करत राहिले.”
^ किंवा “क्रोधित केलं.”
^ शब्दशः “त्याच्या कुमारींची प्रशंसा करण्यात आली नाही.”
^ शब्दशः “त्याने आपलं उपासनेचं ठिकाण उंच ठिकाणांसारखं बांधलं.”
^ म्हणजे, दावीदने.