स्तोत्रं ८०:१-१९
संचालकासाठी सूचना. आठवणीसाठी असलेलं आसाफचं+ गीत. “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं.
८० हे इस्राएलच्या मेंढपाळा, ऐक,तू योसेफला कळपाप्रमाणे मार्ग दाखवतोस.+
तू करुबांवर* विराजमान आहेस.+
तुझं तेज चमकू दे.
२ एफ्राईम, बन्यामीन आणि मनश्शे यांच्यापुढेआपलं सामर्थ्य प्रकट कर.+
ये आणि आम्हाला वाचव.+
३ हे देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर;+तुझ्या चेहऱ्याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+
४ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, तू कधीपर्यंत आपल्या लोकांच्या प्रार्थना रागाने झिडकारशील?*+
५ त्यांचे अश्रू तू त्यांना अन्न म्हणून खायला घालतोस,तू त्यांना प्रमाणाबाहेर अश्रू प्यायला लावतोस.
६ तू आमच्या शेजारच्या राष्ट्रांना आमच्यावरून आपसात भांडू देतोस;आमचे शत्रू आमची वाटेल तशी थट्टा करतात.+
७ हे सैन्यांच्या देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर;तुझ्या चेहऱ्याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+
८ तू इजिप्तमधून एक द्राक्षवेल+ काढून आणलास.
तू राष्ट्रांना हाकलून लावलंस आणि तो द्राक्षवेल जमिनीत लावलास.+
९ तू त्याच्यासाठी जागा मोकळी केली;तेव्हा त्याने मूळ धरलं आणि तो देशभर पसरला.+
१० त्याच्या सावलीने डोंगरांनाआणि त्याच्या फांद्यांनी देवदार वृक्षांना* झाकून टाकलं.
११ त्याच्या फांद्या समुद्रापर्यंतआणि त्याचे फाटे महानदीपर्यंत* पोहोचले.+
१२ तू त्या द्राक्षमळ्याच्या भोवती असलेल्या भिंती का पाडून टाकल्यास?+
त्यामुळे ये-जा करणारे सगळे त्याची फळं तोडतात.+
१३ रानडुकरं त्याची नासधूस करतातआणि रानातले जंगली प्राणी त्याला खाऊन टाकतात.+
१४ हे सैन्यांच्या देवा, कृपा करून परत ये.
स्वर्गातून खाली पाहा!
या द्राक्षवेलाची काळजी घे.+
१५ याचा बुंधा* तूच आपल्या उजव्या हाताने लावला होतास.+
ज्या फांदीला* तू आपल्यासाठी मजबूत केलंस, तिच्याकडे लक्ष दे.+
१६ तो द्राक्षवेल जाळून,+ तोडून टाकण्यात आलाय.
तुझ्या खडसावण्याने लोकांचा नाश होतो.
१७ तुझ्या उजवीकडे असलेल्या माणसाला;तू ज्याला आपल्यासाठी मजबूत केलंस, त्या मनुष्याच्या मुलाला साहाय्य कर.+
१८ मग आम्ही तुझ्याकडे पाठ फिरवणार नाही.
आम्हाला मृत्यूपासून वाचव, म्हणजे आम्ही तुझ्या नावाने तुला हाक मारू.
१९ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर.
तुझ्या चेहऱ्याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+
तळटीपा
^ किंवा कदाचित, “मधोमध.”
^ शब्दशः “प्रार्थनांविरुद्ध जळफळशील.”
^ किंवा “देवाने लावलेल्या देवदार वृक्षांना.”
^ म्हणजे, फरात नदी.
^ किंवा “द्राक्षवेलाची मुख्य फांदी.”
^ किंवा “मुलाला.”