हबक्कूक २:१-२०
२ मी तर माझ्या पहाऱ्याच्या चौकीवर उभा राहीन,+आणि मी बुरुजावरून हलणार नाही.
तो माझ्याद्वारे काय बोलतो, याची मी वाट पाहत राहीन,आणि ताडन मिळाल्यावर काय उत्तर द्यावं, यावर मी विचार करत राहीन.”
२ मग यहोवाने मला उत्तर दिलं:
“हा दृष्टान्त लिहून ठेव आणि मोठ्याने वाचणाऱ्याला सहज* वाचता यावा,+म्हणून तो पाट्यांवर स्पष्टपणे कोरून ठेव.+
३ कारण हा दृष्टान्त अजूनही आपल्या नेमलेल्या वेळेची वाट पाहत आहे,तो लवकरच पूर्ण होईल, तो खोटा ठरणार नाही.
तो पूर्ण व्हायला उशीर लागला,* तरी त्याची वाट पाहत राहा!*+
कारण तो नक्कीच खरा ठरेल.
त्याला उशीर होणार नाही!
४ गर्विष्ठाकडे पाहा;तो सरळ मनाचा नाही.
पण नीतिमान आपल्या विश्वासूपणामुळे* जगेल.+
५ खरोखर, द्राक्षारस विश्वासघातकी आहे,त्यामुळे गर्विष्ठ माणूस आपलं ध्येय गाठणार नाही.
तो कबरेसारखा* भुकेला आहे;आणि मृत्यूसारखा अधाशी* आहे.
तो राष्ट्रांना एकत्र करत राहतोआणि सर्व लोकांना बंदी बनवतो.+
६ हे सर्व लोक त्याच्याविरुद्ध म्हणी वापरणार नाहीत का?
ते टोमणे मारून आणि कोडी घालून बोलणार नाहीत का?+
ते म्हणतील:
‘जे आपलं नाही, ते गोळा करणाऱ्याचाआणि जो आपलं कर्ज आणखी वाढवतो, त्याचा धिक्कार असो!
पण हे सारं कुठपर्यंत?
७ तुला कर्ज देणारे अचानक तुझ्याविरुद्ध उठणार नाहीत का?
ते उठतील आणि तुला धरून जोरजोराने हलवतील,ते तुझी संपत्ती लुटतील.+
८ तू बऱ्याच राष्ट्रांना लुटलंस,म्हणून त्यांतले उरलेले लोक तुला लुटतील,+कारण तू माणसांचं रक्त सांडलंस;तू जमिनीचा,शहरांचा आणि त्यांत राहणाऱ्यांचा नाश केलास.+
९ आपल्या घराण्यासाठी बेइमानीचं धन कमवणाऱ्याचा धिक्कार असो!
तो संकटापासून सुटण्यासाठीआपलं घरटं उंचावर बांधतो.
१० तुझ्या कटकारस्थानांमुळे तुझ्या घराण्याची बेअब्रू होते.
पुष्कळ लोकांचा नाश करून तू स्वतःविरुद्धच* पाप करतोस.+
११ भिंतीमधून दगड ओरडेल,आणि छतातला लाकडी खांबही बोलेल.
१२ रक्तपाताने शहर बांधणाऱ्याचा,आणि अनीतीने नगर वसवणाऱ्याचा धिक्कार असो!
१३ पाहा! जे शेवटी आगीत जाणार आहे त्यासाठी लोक मेहनत करतात,आणि राष्ट्रं व्यर्थ गोष्टींसाठी घाम गाळतात.+
हे सैन्यांचा देव यहोवा याच्याकडूनच नाही का?
१४ कारण जसा समुद्र पाण्याने भरला आहे,तशीच ही पृथ्वी यहोवाच्या गौरवाविषयीच्या ज्ञानाने भरून जाईल.+
१५ आपल्या सोबत्यांची नग्नता पाहण्यासाठीजो त्यांना मद्य पाजतो, त्याचा धिक्कार असो!
त्यांनी पिऊन धुंद व्हावं, म्हणून तो त्यात क्रोध आणि संताप मिसळतो.
१६ तुझा सन्मान होण्याऐवजी तुझी बेअब्रू होईल.
तुलाही मद्य पाजलं जाईल आणि तू आपली बेसुनत* स्थिती उघडी करशील.*
यहोवाच्या उजव्या हातातल्या प्याल्यातून तुलाही प्यावं लागेल,+आणि गौरवाऐवजी तुझी लाजिरवाणी अवस्था होईल.
१७ कारण लबानोनविरुद्ध केलेला हिंसाचार तुला घेरेल,आणि तू प्राण्यांना दहशत बसवून त्यांचा केलेला नाश तुझ्यावर उलटेल,कारण तू माणसांचं रक्त सांडलंस;तू जमिनीचा,शहरांचा आणि त्यांत राहणाऱ्यांचा नाश केलास.+
१८ मूर्ती बनवणाऱ्याने जी मूर्ती स्वतःच कोरली आहे,तिचा काय फायदा?
धातूची मूर्ती* बनवणाऱ्याचा तिच्यावर कितीही भरवसा असला,तरी त्या मूर्तीचा आणि त्या खोट्या शिक्षकाचा काय उपयोग?
जे बोलूही शकत नाहीत, असे निरुपयोगी देव बनवण्याचा काय फायदा?+
१९ जो लाकडाच्या तुकड्याला “ऊठ!” असं म्हणतो,किंवा मुक्या दगडाला, “जागा हो! आम्हाला शिकव!” असं म्हणतो, त्याचा धिक्कार असो!
पाहा! तो सोन्याने आणि चांदीने मढवलेला आहे,+त्यात अजिबात प्राण* नाही.+
२० पण यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे.+
सबंध पृथ्वीने त्याच्यापुढे शांत राहावं!’”+
तळटीपा
^ किंवा “न अडखळता.”
^ किंवा “उशीर लागत आहे असं वाटलं.”
^ किंवा “उत्सुकतेने वाट पाहा.”
^ किंवा कदाचित, “विश्वासामुळे.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “अतृप्त.”
^ किंवा “आपल्या जिवाविरुद्धच.”
^ किंवा “सुंता न झालेली.”
^ किंवा कदाचित, “आणि तू अडखळत चालशील.”
^ किंवा “ओतीव मूर्ती.”
^ किंवा “श्वास.”