हबक्कूक ३:१-१९

  • संदेष्टा प्रार्थनेत यहोवाला कार्य करण्याची विनंती करतो (१-१९)

    • देव आपल्या अभिषिक्‍त लोकांना वाचवेल (१३)

    • संकटातही यहोवामुळे आनंदी राहणं (१७, १८)

 हबक्कूक संदेष्ट्याने शोकगीत गाऊन केलेली प्रार्थना:  २  “हे यहोवा, मी तुझ्या पराक्रमांबद्दल ऐकलंय. हे यहोवा, तुझ्या कार्यांबद्दल ऐकून मी अगदी थक्क झालोय. या वर्षांदरम्यान* तशीच कार्यं पुन्हा कर! या वर्षांदरम्यान* ती सर्वांना कळू दे. संकटाच्या काळात दया दाखवायला विसरू नकोस.+  ३  देव तेमानहून आला,पवित्र देव पारान पर्वतावरून आला.+ (सेला )* त्याच्या वैभवाने आकाशाला झाकून टाकलं;+त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरून गेली.  ४  त्याचं तेज प्रकाशासारखं होतं.+ त्याच्या हातातून दोन किरणं निघत होती. त्यात त्याचं सामर्थ्य दडलेलं होतं.  ५  रोगाची साथ+ त्याच्यापुढे जात होती,आणि फणफणता ताप त्याच्यामागून येत होता.  ६  तो स्तब्ध उभा राहिला आणि त्याने पृथ्वीला हादरून सोडलं.+ त्याने एक नजर टाकताच राष्ट्रांचा थरकाप उडाला.+ सर्वकाळापासून उभे असलेले पर्वत कोसळले,आणि वर्षानुवर्षांपासून असलेल्या टेकड्या खाली वाकल्या.+ हे त्याचे पूर्वीपासूनचे मार्ग आहेत.  ७  कूशानच्या तंबूंत मला संकट दिसलं. मिद्यान देशाच्या तंबूंची कापडं फडफडू लागली.+  ८  हे यहोवा, तू नद्यांवर रागावला आहेस का? तुझा क्रोध नद्यांवर भडकला आहे का? की तू समुद्रावर संतापला आहेस?+ तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास;+तुझे रथ विजयी झाले.*+  ९  तू आपलं धनुष्य काढून तयार केलं आहेस. तुझ्या शस्त्रांना* तू शपथ घालून नेमलं आहेस.* (सेला ) तू नद्यांनी पृथ्वीला दुभंगून टाकतोस. १०  तुला पाहून पर्वत वेदनांनी तळमळले.+ वादळी पावसामुळे पाण्याचे लोट वाहत आले. पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याने गर्जना केली.+ ते वर उफाळून आलं.* ११  सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च ठिकाणी स्तब्ध झाले.+ तुझे बाण प्रकाशासारखे निघाले.+ तुझा भाला विजेसारखा चकाकला. १२  तू संतप्त होऊन पृथ्वीवरून चाललास. तू क्रोधाने राष्ट्रांना तुडवलंस. * १३  तू आपल्या लोकांना तारण्यासाठी, तुझ्या अभिषिक्‍ताला वाचवण्यासाठी निघालास. दुष्टांच्या घराच्या पुढाऱ्‍याला* तू चिरडून टाकलंस. त्यांचं घर पायापासून छतापर्यंत* उघडं पडलं. (सेला ) १४  त्याचे योद्धे मला विखरून टाकायला तुफानासारखे आले,एकांतात दुःखी माणसाला नष्ट करायला त्यांना खूप आनंद वाटला,पण तू त्याचीच शस्त्रं* त्याच्या योद्ध्यांच्या डोक्यात खुपसलीस. १५  तू आपल्या घोड्यांवरून समुद्रातून,अथांग सागराच्या उसळत्या पाण्यातून स्वारी केलीस. १६  मी ऐकलं तेव्हा माझ्या काळजाचा थरकाप उडाला;त्या आवाजाने माझे ओठ थरथर कापू लागले. माझी हाडं खिळखिळी झाली;+माझे पाय लटपटू लागले. पण तरी मी संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहीन,+कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्‍या लोकांवर तो दिवस येत आहे. १७  जरी अंजिराच्या झाडाला बहर आला नाही,आणि द्राक्षवेलींवर द्राक्षं आली नाहीत;जरी जैतुनाचं पीक बुडालं,आणि शेतांत काहीच अन्‍न उगवलं नाही;जरी मेंढवाड्यातून कळप नाहीसे झाले,आणि गोठ्यांत गुरंढोरं उरली नाहीत, १८  तरीही मी यहोवामुळे आनंदी होईन;माझं तारण करणाऱ्‍या देवामुळे मी हर्ष करीन.+ १९  सर्वोच्च प्रभू यहोवा माझी ताकद आहे;+तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करेल आणि मला उच्च स्थानांवर चालवेल.+

तळटीपा

किंवा कदाचित, “आमच्या काळात.”
किंवा कदाचित, “आमच्या काळात.”
किंवा “तुझ्या रथांनी तारण केलं.”
किंवा कदाचित, “बाणांना.”
किंवा कदाचित, “वंशांच्या शपथा सांगण्यात आल्या आहेत.”
हे कदाचित लाटांना सूचित करत असावं.
शब्दशः “झोडपलंस.”
शब्दशः “डोकं.”
शब्दशः “मान.”
शब्दशः “त्याचेच दांडे.”