हाग्गय १:१-१५

  • मंदिर न बांधल्यामुळे ताडन (१-११)

    • “सुंदर घरांमध्ये राहण्याची ही वेळ आहे का?” ()

    • “आपल्या वागण्याकडे लक्ष द्या” ()

    • भरपूर पेरणी पण फार थोडं पीक ()

  • लोक यहोवाचं ऐकतात (१२-१५)

 दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, यहूदाचा राज्यपाल, म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा मुलगा, म्हणजे महायाजक यहोशवा यांना संदेष्टा हाग्गय*+ याच्याकडून यहोवाचा* हा संदेश मिळाला: २  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“यहोवाचं मंदिर बांधण्याची* वेळ अजून आली नाही,”+ असं हे लोक म्हणतात.’” ३  मग हाग्गय+ संदेष्ट्याला पुन्हा यहोवाकडून हा संदेश मिळाला: ४  “तुम्ही आपापल्या सुंदर घरांमध्ये राहण्याची ही वेळ आहे का? पाहा, तिथे माझं मंदिर ओसाड पडलं आहे.+ ५  म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘आपल्या वागण्याकडे लक्ष द्या. ६  तुम्ही भरपूर पेरणी करता, पण तुम्हाला फार थोडं पीक मिळतं.+ तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. आणि मजुरी करणारा आपली मजुरी, भोकं पडलेल्या बटव्यात टाकतो.’” ७  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘आपल्या वागण्याकडे लक्ष द्या.’ ८  यहोवा म्हणतो, ‘उठा, डोंगरावर जाऊन लाकडं आणा+ आणि माझं मंदिर बांधा,+ म्हणजे त्यामुळे मी संतुष्ट होईन आणि माझा गौरव होईल.’”+ ९  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘तुम्ही भरपूर पिकाची अपेक्षा करायचा, पण तुम्हाला फार थोडं मिळायचं, आणि जेव्हा तुम्ही ते घरी आणायचा, तेव्हा मी ते उडवून लावायचो.+ कशामुळे? कारण इकडे माझं मंदिर ओसाड पडलं आहे, आणि तुम्ही मात्र आपापल्या घरासाठी धावपळ करत आहात.+ १०  म्हणून आकाशाने दव आणि पृथ्वीने पीक देणं बंद केलं. ११  मी तुमची जमीन आणि डोंगर कोरडे पाडले. त्यामुळे अन्‍नधान्य, द्राक्षारस, तेल आणि जमिनीच्या उत्पन्‍नाचा दुष्काळ पडला. तुमच्यासोबतच तुमच्या गुराढोरांचेही हाल होत आहेत आणि तुमची सगळी मेहनत वाया जात आहे.’” १२  तेव्हा, शल्तीएलचा+ मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा+ मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा, तसंच बाकीचे सर्व लोक, यांनी आपला देव यहोवा याचं ऐकलं आणि संदेष्टा हाग्गय याने दिलेल्या संदेशाकडे लक्ष दिलं. कारण त्यांचा देव यहोवा यानेच हाग्गयला पाठवलं होतं. आणि लोक यहोवाचं भय मानू लागले. १३  मग यहोवाचा संदेष्टा हाग्गय याने यहोवाकडून मिळालेल्या आज्ञेप्रमाणे, लोकांना हा संदेश दिला: “यहोवा म्हणतो, ‘मी तुमच्यासोबत आहे.’”+ १४  मग यहोवाने यहूदाचा राज्यपाल+ म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि यहोसादाकचा मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा,+ तसंच बाकीचे सर्व लोक यांच्या मनाला प्रेरणा दिली.+ तेव्हा त्या सर्वांनी येऊन आपला देव, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली.+ १५  दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी,+ सहाव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी हे घडलं.

तळटीपा

म्हणजे, सणाच्या दिवशी जन्मलेला.
किंवा “पुन्हा बांधण्याची.”