होशेय १०:१-१५

  • इस्राएल, सडका द्राक्षवेल; त्याचा नाश केला जाईल (१-१५)

१०  “इस्राएल फळं देणाऱ्‍या सडक्या* द्राक्षवेलासारखा आहे.+ त्याला जितकी जास्त फळं येतात, तितक्या जास्त वेदी तो बांधतो;+त्याची जमीन जितकं जास्त पीक देते, तितकेच सुंदर पूजेचे खांब तो उभे करतो.+  २  त्यांचं हृदय ढोंगी आहे;आता त्यांना दोषी ठरवलं जाईल. देव त्यांच्या वेदी मोडून टाकेल आणि त्यांचे खांब उद्ध्‌वस्त करेल.  ३  आता ते म्हणतील, ‘आम्हाला राजा नाही,+ कारण आम्ही यहोवाचं भय मानलं नाही. राजा आमच्यासाठी काय करू शकेल?’  ४  ते पोकळ शब्द बोलतात, खोट्या शपथा घेतात+ आणि करार करतात;त्यामुळे त्यांनी केलेला न्याय शेतात उगवणाऱ्‍या विषारी झुडपांसारखा आहे.+  ५  शोमरोनच्या रहिवाशांना बेथ-आवेनच्या वासराच्या मूर्तीसाठी भीती वाटेल.+ त्याचे लोक त्या मूर्तीसाठी रडतील,तसंच, परक्या देवांचे जे पुजारी तिच्यामुळे आणि तिच्या वैभवामुळे आनंदी व्हायचे तेही रडतील,कारण तिला त्यांच्यापासून दूर बंदिवासात नेलं जाईल.  ६  तिला अश्‍शूरला एका महान राजासाठी भेट म्हणून नेलं जाईल.+ एफ्राईमला लज्जित केलं जाईल,आणि चुकीचा सल्ला पाळल्यामुळे इस्राएलची लाजिरवाणी स्थिती होईल.+  ७  फांदी तोडून पाण्यावर टाकावी,तसा शोमरोन आणि त्याच्या राजाचा नक्कीच नाश केला जाईल.*+  ८  इस्राएलचं पाप,+ म्हणजे बेथ-आवेनची+ उच्च स्थानं नष्ट केली जातील.+ त्यांच्या वेदींवर काटेरी झुडपं उगवतील.+ लोक पर्वतांना म्हणतील, ‘आम्हाला झाकून टाका!’ आणि टेकड्यांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा!’+  ९  हे इस्राएल, गिबाच्या दिवसांपासून तू पाप केलं आहेस.+ तिथे तुझी वृत्ती बदलली नाही. गिबामध्ये दुष्ट लोकांना* युद्धाने गाठलं नाही.* १०  मला वाटेल तेव्हा मी त्यांना शिक्षा करीन. आणि त्यांचे दोन अपराध त्यांच्यावर बांधले जातील*तेव्हा राष्ट्रांना त्यांच्याविरुद्ध एकत्र केलं जाईल. ११  एफ्राईम शिकवलेली गाय* होती; तिला धान्याची मळणी करायला आवडायचं,म्हणून मी तिच्या सुंदर मानेवर ओझं लादलं नाही. आता मात्र मी एफ्राईमवर स्वाराला बसवीन.*+ यहूदा नांगरणी करेल; याकोब त्याच्यासाठी मातीची ढेकळं फोडेल. १२  स्वतःसाठी नीतीने बी पेरा आणि एकनिष्ठ प्रेमाची कापणी करा. यहोवाला शोधण्याची संधी असेपर्यंत+स्वतःसाठी सुपीक जमिनीची नांगरणी करा,+म्हणजे तो येऊन तुम्हाला नीतीचं शिक्षण देईल.+ १३  पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली,आणि अनीतीची कापणी केली.+ तुम्ही लबाडीचं फळ खाल्लं;कारण तुम्ही स्वतःच्या विचारांवरआणि आपल्या योद्ध्यांवर भरवसा ठेवला. १४  तुमच्या लोकांविरुद्ध युद्धाचा गोंधळ ऐकू येईल;ज्याप्रमाणे आर्बेलच्या घराण्याचा शल्मनने नाश केला,तेव्हा युद्धाच्या दिवशी आईला तिच्या मुलांसोबत जमिनीवर आपटून ठार मारलं गेलं,त्याप्रमाणे तटबंदी असलेली तुमची सगळी शहरं उद्ध्‌वस्त होतील.+ १५  हे बेथेल, तुझ्या भयंकर दुष्टपणामुळे तुझ्यासोबत असंच केलं जाईल.+ पहाटे इस्राएलच्या राजाचा नाश केला जाईल.”*+

तळटीपा

किंवा कदाचित, “पसरणाऱ्‍या.”
शब्दशः “गप्प केलं जाईल.”
शब्दशः “अनीतीच्या पुत्रांना.”
किंवा “पूर्णपणे नाश केला नाही.”
म्हणजे, मानेवर ठेवलेल्या जुवासारखी ते आपली शिक्षा भोगतील.
किंवा “खोगीर टाकीन.”
किंवा “कालवड.”
शब्दशः “गप्प केलं जाईल.”