१ इतिहास ११:१-४७

  • सर्व इस्राएली लोक दावीदचा राजा म्हणून अभिषेक करतात (१-३)

  • दावीद सीयोनवर कब्जा करतो (४-९)

  • दावीदचे शूर योद्धे (१०-४७)

११  काही काळाने, सर्व इस्राएली लोक हेब्रोनमध्ये+ दावीदकडे आले आणि म्हणाले: “हे बघ! तुझ्याशी आमचं रक्‍ताचं नातं आहे.+ २  पूर्वी जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा युद्धाच्या मोहिमांमध्ये तूच इस्राएलचं नेतृत्व करायचास.+ आणि तुझा देव यहोवा तुला म्हणाला होता: ‘तू माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ आणि माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होशील.’”+ ३  अशा प्रकारे इस्राएलचे सर्व वडीलजन हेब्रोनमध्ये दावीद राजाकडे आले, आणि त्याने हेब्रोनमध्ये यहोवापुढे त्यांच्यासोबत एक करार केला. मग यहोवाने शमुवेलद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे+ त्यांनी संपूर्ण इस्राएलचा राजा म्हणून दावीदचा अभिषेक केला.+ ४  पुढे दावीद आणि सर्व इस्राएली लोक यरुशलेमला, म्हणजे यबूसला+ जायला निघाले. तिथे यबूसी लोक+ राहायचे. ५  यबूसी लोकांनी दावीदला असा टोमणा मारला: “तू आमच्या इथे पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाहीस!”+ पण दावीदने सीयोनचा+ किल्ला काबीज केला; आज त्याला दावीदपूर+ असं म्हटलं जातं. ६  दावीद म्हणाला: “जो कोणी सगळ्यात आधी यबूसी लोकांवर हल्ला करेल, तो सैन्याचा प्रमुख होईल.” तेव्हा सरूवाचा मुलगा यवाब+ याने सर्वात आधी हल्ला केला आणि तो सेनापती बनला. ७  नंतर दावीद त्या किल्ल्यातच राहू लागला, म्हणून त्या किल्ल्याला दावीदपूर असं नाव पडलं. ८  मग दावीद ते शहर बांधू लागला; म्हणजे टेकडीवर* आणि त्या टेकडीच्या चारही बाजूंना इमारती आणि शहराच्या भिंती बांधू लागला. आणि यवाबने बाकीचं शहर पुन्हा वसवलं. ९  अशा प्रकारे, दावीद अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला.+ आणि सैन्यांचा देव यहोवा त्याच्या पाठीशी होता. १०  दावीदच्या शूर योद्ध्यांच्या प्रमुखांची नावं पुढे दिली आहेत. यहोवाने इस्राएलविषयी सांगितलं होतं त्याप्रमाणे दावीदला राजा बनवण्यासाठी,+ त्यांनी सर्व इस्राएली लोकांसोबत मिळून त्याच्या राज्यपदाला पाठिंबा दिला होता. ११  दावीदच्या शूर योद्ध्यांची नावं अशी: पहिला, हखमोनचा वंशज याशबाम;+ तो तिघांचा प्रमुख होता.+ एकदा त्याने भाला चालवून ३०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं.+ १२  दुसरा, एलाजार;+ तो दोदोचा मुलगा आणि अहोहीचा+ वंशज होता. एलाजार हा दावीदच्या तीन शूर योद्ध्यांपैकी एक होता. १३  पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करायला पस-दम्मीम+ इथे जमले होते, तेव्हा तो दावीदसोबत तिथे होता. तिथे जवाचं एक शेत होतं, आणि पलिष्ट्यांना पाहून लोकांनी तिथून पळ काढला होता. १४  पण एलाजार शेताच्या मधोमध उभा राहून पलिष्ट्यांना ठार मारत राहिला आणि त्याने शेताचं रक्षण केलं. त्या दिवशी, यहोवाने इस्राएलला मोठा विजय मिळवून दिला होता.+ १५  दावीदच्या सैन्यातल्या ३० प्रमुखांपैकी तिघं जण अदुल्लामच्या गुहेत+ दावीदकडे गेले. त्या वेळी, पलिष्टी सैनिक रेफाईमच्या खोऱ्‍यात+ छावणी देऊन राहत होते. १६  दावीद तेव्हा एका सुरक्षित ठिकाणी राहत होता; आणि पलिष्टी सैनिकांची एक चौकी बेथलेहेममध्ये होती. १७  त्या वेळी, दावीदने आपली उत्कट इच्छा व्यक्‍त करून म्हटलं: “बेथलेहेमच्या+ दरवाजाजवळ असलेल्या विहिरीतलं पाणी मला प्यायला मिळालं तर किती बरं होईल!” १८  तेव्हा ते तीन योद्धे पलिष्ट्यांच्या छावणीत घुसले, आणि बेथलेहेमच्या दरवाजाजवळ असलेल्या विहिरीतलं पाणी काढून त्यांनी ते दावीदला आणून दिलं. पण दावीदने ते पाणी प्यायला नकार दिला आणि यहोवासमोर त्याने ते जमिनीवर ओतून दिलं. १९  तो म्हणाला: “असं करायचा मी विचारसुद्धा करू शकत नाही! माझ्या देवाच्या नजरेत असं करणं चुकीचं ठरेल! ज्या माणसांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचं रक्‍त मी कसं पिणार?+ कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे पाणी आणलंय.” म्हणून तो ते पाणी प्यायला नाही. दावीदच्या तीन शूर योद्ध्यांनी असे महान पराक्रम केले. २०  यवाबचा+ भाऊ अबीशय+ हा इतर तीन जणांवर प्रमुख होता. त्याने आपला भाला चालवून ३०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं. त्या पहिल्या तीन शूर योद्ध्यांसारखंच याचंही मोठं नाव होतं.+ २१  तिघांमध्ये तो दुसऱ्‍या दोघांपेक्षा जास्त नावाजलेला होता आणि त्यांचा प्रमुख होता. पण तो पहिल्या तिघांच्या बरोबरीला पोहोचला नाही. २२  यहोयादाचा मुलगा बनाया+ हा एक धाडसी पुरुष होता.* कब्सेल+ या ठिकाणी त्याने मोठमोठे पराक्रम केले. त्याने मवाबी अरीएलच्या दोन मुलांना ठार मारलं. तसंच, एकदा बर्फ पडत असताना त्याने कोरड्या हौदात उतरून एका सिंहाला मारून टाकलं.+ २३  त्याने इजिप्तच्या एका धिप्पाड माणसालाही मारून टाकलं. त्या माणसाची उंची पाच हात* इतकी असून,+ त्याच्याकडे हातमागाच्या दांड्यासारखा एक भाला होता.+ पण बनाया फक्‍त एक काठी घेऊन त्याच्यावर धावून गेला. आणि त्याने त्या माणसाच्या हातून भाला हिसकावून त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारलं.+ २४  यहोयादाचा मुलगा बनाया याने असे मोठमोठे पराक्रम केले. आणि त्या तिघा शूर योद्ध्यांसारखंच याचंही नाव मोठं होतं. २५  बनाया हा तीस शूरवीरांपेक्षाही जास्त नावाजलेला होता. पण त्या तिघांच्या बरोबरीला तो पोहोचला नाही.+ असं असलं, तरी दावीदने त्याला आपल्या अंगरक्षकांवर नेमलं. २६  सैन्यातल्या शूर योद्ध्यांची नावं ही: यवाबचा भाऊ असाएल,+ बेथलेहेममधल्या दोदोचा मुलगा एलहानान,+ २७  शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी, २८  इक्केश तकोईचा मुलगा ईरा,+ अबियेजेर+ अनाथोथी, २९  सिब्बखय+ हूशाथी, ईलाय अहोही, ३०  महरय+ नटोफाथी, बानाह नटोफाथीचा मुलगा हेलेद,+ ३१  बन्यामिनी लोकांच्या+ गिबा इथल्या रीबयचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी, ३२  गाशच्या+ ओढ्यांजवळचा हूरय, बेथ-अराबा इथला अबीएल, ३३  अजमावेथ बहुरीमी, अलीहबा शालबोनी, ३४  गिजोनच्या हाशेमची मुलं, हरारी शागे याचा मुलगा योनाथान, ३५  हरारी साखार याचा मुलगा अहीयाम, ऊरचा मुलगा अलीफल, ३६  हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, ३७  हेसरो कर्मेली, एजबयचा मुलगा नारय, ३८  नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा मुलगा मिभार, ३९  सेलक अम्मोनी, सरूवाचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ४०  ईरा इथ्री, गारेब इथ्री, ४१  उरीया+ हित्ती, अहलयचा मुलगा जाबाद, ४२  रऊबेनी शीजाचा मुलगा अदीना; तो रऊबेनी लोकांचा प्रमुख असून त्याच्यासोबत ३० जण होते; ४३  माकाचा मुलगा हानान, योशाफाट मिथनी, ४४  उज्जीया अष्टरोथी, होथाम अरोएरी याची मुलं शामा आणि ईयेल, ४५  शिम्रीचा मुलगा यदीएल आणि त्याचा भाऊ योहा तीसी, ४६  अलीएल महवी, एलनामची मुलं यरीबय व योशव्याह, इथ्मा मवाबी, ४७  अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.

तळटीपा

किंवा “मिल्लोवर.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.
शब्दशः “एका धाडसी माणसाचा मुलगा.”
तो २.२३ मी. (७.३ फूट) उंच होता. अति. ख१४ पाहा.