१ इतिहास १२:१-४०

  • दावीदच्या राज्यपदाला पाठिंबा देणारे (१-४०)

१२  कीशचा मुलगा शौल याच्यामुळे+ दावीद सिक्लागला+ पळून गेला होता. त्या वेळी त्याच्याकडे जे लोक आले त्यांची नावं पुढे दिली आहेत; ते शूर योद्ध्यांपैकी असून त्यांनी त्याला लढाईत मदत केली.+ २  त्यांच्याकडे धनुष्यं होती; ते आपल्या उजव्या व डाव्या अशा दोन्ही हातांनी+ गोफण चालवू शकत होते+ आणि बाण मारू शकत होते. ते बन्यामीन वंशातले+ असून शौलच्या भाऊबंदांतले होते. ३  त्यांची नावं अशी: त्यांचा प्रमुख अहीएजर, त्याच्यानंतर योवाश; हे दोघं गिबातल्या+ शमाची मुलं होती. याशिवाय, यजिएल आणि पेलेट ही अजमावेथची+ मुलं, बराखा, येहू अनाथोथी, ४  आणि इश्‍माया गिबोनी;+ इश्‍माया हा तीस शूर योद्ध्यांपैकी एक+ असून त्यांचा प्रमुख होता. तसंच, यिर्मया, यहजिएल, योहानान, योजाबाद गदेराथी, ५  एलूजय, यरीमोथ, बाल्याह, शमरयाह, शपत्याह हारीफी. ६  आणि कोरह वंशातले+ एलकाना, इश्‍शीया, अजरेल, योएजेर व याशबाम. ७  तसंच, गदोरमधल्या यरोहामची मुलं योएला आणि जबद्याह. ८  दावीद ओसाड रानातल्या सुरक्षित ठिकाणी राहत असताना,+ गाद वंशातलेही काही लोक त्याच्याकडे आले. ते शूर योद्धे होते, लढाईसाठी प्रशिक्षित केलेले सैनिक होते. ते हातांत मोठी ढाल आणि भाला घेऊन नेहमी तयार असायचे. त्यांचं तोंड सिंहासारखं असून ते डोंगरावरच्या सांबरासारखे* चपळ होते. ९  त्यांची नावं अशी: पहिला एजेर; हा त्यांचा प्रमुख होता. दुसरा ओबद्या, तिसरा अलीयाब, १०  चौथा मिश्‍मन्‍ना, पाचवा यिर्मया, ११  सहावा अत्तय, सातवा अलीएल, १२  आठवा योहानान, नववा एलजाबाद, १३  दहावा यिर्मया आणि अकरावा मखबन्‍नय. १४  हे सर्व गाद+ वंशातले असून सैन्याचे प्रमुख होते. त्यांच्यातला दुर्बळ १०० सैनिकांच्या तोडीचा, तर शक्‍तिशाली १,००० सैनिकांच्या तोडीचा होता.+ १५  पहिल्या महिन्यात यार्देन नदी जेव्हा तुडुंब भरून वाहत होती, तेव्हा ज्या लोकांनी ती पार केली आणि खोऱ्‍यात राहणाऱ्‍या लोकांना पूर्वेकडे आणि पश्‍चिमेकडे पळवून लावलं, ते हेच आहेत. १६  दावीद सुरक्षित ठिकाणी असताना बन्यामीन आणि यहूदा वंशातलेही काही जण त्याच्याकडे आले.+ १७  तेव्हा दावीद बाहेर येऊन त्यांना म्हणाला: “तुम्ही चांगल्या हेतूने मला मदत करायला आला असाल, तर तुम्ही माझे मित्र आहात. पण माझी काहीही चूक नसताना जर तुम्ही माझा विश्‍वासघात केला आणि मला माझ्या शत्रूंच्या हाती दिलं, तर आपल्या पूर्वजांचा देव ते पाहून न्याय करो.”+ १८  तेव्हा, तीस जणांचा प्रमुख असलेला अमासय+ याच्यावर देवाची पवित्र शक्‍ती* आली. आणि तो म्हणाला: “हे दावीद! आम्ही तुझे आहोत. हे इशायच्या मुला! आम्ही तुझ्या बाजूने आहोत.+ शांती असो, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्‍यांनाही शांती असो! कारण तुझा देव तुला मदत करतोय.”+ तेव्हा दावीदने त्यांना आपल्यात सामील केलं आणि आपल्या सैन्यांच्या तुकड्यांवर प्रमुख म्हणून नेमलं. १९  मनश्‍शे वंशातलेही काही जण शौलला सोडून दावीदला येऊन मिळाले. दावीद त्या वेळी पलिष्टी लोकांसोबत शौलविरुद्ध लढायला गेला होता. पण त्याने पलिष्टी लोकांची मदत केली नाही; कारण पलिष्ट्यांच्या प्रमुखांनी+ आपसात सल्लामसलत करून त्याला परत पाठवून दिलं. ते म्हणाले: “दावीद कदाचित आपल्याला सोडून त्याचा प्रभू शौल याच्याकडे जाईल, आणि आपल्याला आपला जीव गमवावा लागेल.”+ २०  दावीद सिक्लाग+ इथे गेला, तेव्हा मनश्‍शे वंशातले जे लोक त्याच्याकडे आले, ते हे: अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू आणि सिलथय; हे सगळे मनश्‍शे वंशातले हजार-हजार जणांवरचे प्रमुख होते.+ २१  त्यांनी दावीदला लुटारूंच्या टोळीविरुद्ध लढायला मदत केली. कारण ते सर्व शूर व धाडसी पुरुष होते;+ ते दावीदच्या सैन्याचे प्रमुख बनले. २२  दावीदला मदत करायला दिवसेंदिवस लोक त्याच्याकडे येत राहिले.+ शेवटी त्याचं सैन्य देवाच्या सैन्याइतकं मोठं झालं.+ २३  यहोवाच्या आज्ञेप्रमाणे शौलचं राज्यपद दावीदच्या हाती द्यायला,+ लढाईसाठी तयार असलेले जे योद्धे दावीदकडे हेब्रोनमध्ये आले+ त्यांची संख्या ही आहे: २४  यहूदा वंशातले ६,८०० पुरुष; ते मोठ्या ढाली आणि भाले घेऊन लढाईसाठी तयार होते. २५  शिमोन वंशातले ७,१०० पुरुष; ते शूर आणि धाडसी योद्धे होते. २६  लेवी वंशातले ४,६०० पुरुष; २७  यहोयादा+ हा अहरोनच्या वंशजांचा प्रमुख होता,+ आणि त्याच्यासोबत ३,७०० माणसं होती. २८  त्यांच्यामध्ये सादोकही+ होता; तो तरुण असून शूर आणि धाडसी होता. त्याच्यासोबत त्याच्या घराण्यातले २२ प्रमुखही आले. २९  बन्यामीन वंशातले, म्हणजे शौलच्या भाऊबंदांतले+ ३,००० पुरुष; यांच्यातले बरेच जण आधी शौल आणि त्याच्या घराण्याशी एकनिष्ठ* होते. ३०  एफ्राईमच्या वंशातले २०,८०० पुरुष; हे शूर व धाडसी असून आपापल्या घराण्यांमधले नावाजलेले पुरुष होते. ३१  मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातले १८,००० पुरुष; त्यांनी जाऊन दावीदला राजा बनवावं म्हणून त्यांना निवडण्यात आलं होतं. ३२  इस्साखार वंशातले २०० प्रमुख पुरुष; इस्राएलने कोणत्या वेळी काय करणं योग्य राहील, याची त्यांना चांगली समज होती. त्यांचे सगळे भाऊ त्यांच्या अधिकाराखाली होते. ३३  जबुलून वंशातले ५०,००० पुरुष; ते सैन्यरचना करून लढाई करण्यासाठी प्रशिक्षित होते. त्यांच्याकडे सर्व प्रकारची शस्त्रं होती. ते सगळे दावीदला येऊन मिळाले आणि ते त्याला पूर्ण मनाने एकनिष्ठ होते. ३४  नफताली वंशातले १,००० प्रमुख आणि त्यांच्यासोबत मोठ्या ढाली आणि भाले असलेले ३७,००० सैनिक. ३५  दान वंशातले, सैन्यरचना करून लढणारे २८,६०० पुरुष. ३६  आशेर वंशातले ४०,००० पुरुष; ते सैन्यरचना करून लढाई करण्यासाठी प्रशिक्षित होते. ३७  यार्देनच्या पलीकडे+ असलेले रऊबेन व गाद वंशातले आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातले १,२०,००० पुरुष; त्यांच्याकडे सर्व प्रकारची युद्धाची शस्त्रं होती. ३८  हे सर्व पुरुष शूर योद्धे होते, आणि सैन्यरचना करून युद्ध करू शकत होते. दावीदला संपूर्ण इस्राएलचा राजा बनवण्याचा ठाम निश्‍चय करून ते सगळे हेब्रोनला आले होते. आणि इतर सर्व इस्राएली लोकही दावीदला राजा बनवण्यासाठी एक झाले.*+ ३९  त्या सर्वांनी तीन दिवस दावीदसोबत राहून खाणं-पिणं केलं. कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी या सगळ्याची तयारी केली होती. ४०  याशिवाय, जवळ असलेले त्यांचे भाऊबंद आणि त्यांच्यापासून दूर असलेले, म्हणजे इस्साखार, जबुलून आणि नफताली या वंशातले त्यांचे भाऊबंदसुद्धा, त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू आणत होते. त्यांनी सगळ्या वस्तू गाढवांवर, उंटांवर, खेचरांवर आणि गुराढोरांवर लादून आणल्या. त्यांनी पीठ, अंजिरांच्या व मनुकांच्या ढेपा, द्राक्षारस, तेल; तसंच, गुरंढोरं आणि मेंढरं हे सगळं फार मोठ्या प्रमाणात आणलं. कारण इस्राएलमध्ये मोठा आनंदोत्सव होता.

तळटीपा

एक प्रकारचं हरीण.
किंवा “विश्‍वासू.”
शब्दशः “त्यांचं हृदय एक झालं.”