१ इतिहास १५:१-२९

  • लेवी कराराची पेटी यरुशलेमला नेतात (१-२९)

    • मीखल दावीदला तुच्छ लेखते (२९)

१५  दावीद आपल्यासाठी दावीदपुरात आणखी काही महाल बांधत राहिला. तसंच, त्याने खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीसाठीही जागा तयार केली आणि तिच्यासाठी एक तंबू उभारला.+ २  मग दावीद म्हणाला: “लेव्यांशिवाय दुसरं कोणीही खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी उचलून नेणार नाही. कारण यहोवाने त्यांनाच यहोवाच्या कराराची पेटी उचलून न्यायला आणि नेहमी त्याची सेवा करायला निवडलंय.”+ ३  त्यानंतर दावीदने, आपण तयार केलेल्या जागी यहोवाच्या कराराची पेटी आणून ठेवण्यासाठी सगळ्या इस्राएली लोकांना यरुशलेममध्ये एकत्र जमवलं.+ ४  दावीदने अहरोनच्या+ आणि लेव्यांच्या ज्या वंशजांना+ एकत्र जमवलं, ते हे: ५  कहाथच्या वंशजांमधला प्रमुख उरीयेल आणि त्याचे १२० भाऊबंद; ६  मरारीच्या वंशजांमधला प्रमुख असाया+ आणि त्याचे २२० भाऊबंद; ७  गेर्षोमच्या वंशजांमधला प्रमुख योएल+ आणि त्याचे १३० भाऊबंद; ८  एलसाफानच्या+ वंशजांमधला प्रमुख शमाया आणि त्याचे २०० भाऊबंद; ९  हेब्रोनच्या वंशजांमधला प्रमुख अलीएल आणि त्याचे ८० भाऊबंद; १०  तसंच, उज्जियेलच्या वंशजांमधला+ प्रमुख अम्मीनादाब आणि त्याचे ११२ भाऊबंद. ११  मग दावीदने सादोक+ व अब्याथार+ याजकांना, तसंच लेवी वंशातले उरीयेल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अम्मीनादाब यांना आपल्याकडे बोलावलं, १२  आणि तो त्यांना म्हणाला: “तुम्ही सगळे लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख आहात. तर आता तुम्ही आणि तुमचे भाऊबंद स्वतःला शुद्ध करा. आणि जाऊन इस्राएलचा देव यहोवा याच्या कराराची पेटी मी तयार केलेल्या जागी घेऊन या. १३  मागच्या वेळी तुम्ही ती उचलून आणली नाही.+ तसंच, ती आणण्याची योग्य पद्धत काय आहे हेही आपण माहीत करून घेतलं नाही.+ आणि त्यामुळेच आपला देव यहोवा याचा क्रोध आपल्यावर भडकला होता.”+ १४  म्हणून मग याजकांनी आणि लेव्यांनी इस्राएलचा देव यहोवा याच्या कराराची पेटी आणण्यासाठी स्वतःला शुद्ध केलं. १५  मग, यहोवाने मोशेद्वारे सांगितलं होतं त्याप्रमाणे लेव्यांनी खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी तिला लावलेल्या दांड्यांच्या आधारे आपल्या खांद्यांवर उचलून घेतली.+ १६  दावीदने मग लेव्यांच्या प्रमुखांना सांगितलं, की त्यांनी गायक असलेल्या आपल्या भाऊबंदांना तंतुवाद्यं, वीणा+ व झांजा+ ही संगीत वाद्यं वाजवून मोठ्या आनंदाने गीत गाण्यासाठी नेमावं. १७  म्हणून लेव्यांनी यांना नेमलं: योएलचा मुलगा हेमान,+ त्याच्या भाऊबंदांपैकी बरेख्याचा मुलगा आसाफ+ आणि मरारी घराण्यातल्या त्यांच्या भाऊबंदांपैकी कुशायाचा मुलगा एथान.+ १८  त्यांच्यासोबत दुसऱ्‍या गटात+ त्यांचे हे भाऊबंदही होते: जखऱ्‍या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्‍नी, अलीयाब, बनाया, मासेया, मतिथ्य, अलीफलेह आणि मिकनेया; तसंच, द्वारपाल असलेले ओबेद-अदोम आणि ईयेल हेसुद्धा होते. १९  हेमान,+ आसाफ+ आणि एथान या गायकांना तांब्याच्या झांजा वाजवायला नेमलं होतं;+ २०  आणि जखऱ्‍या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्‍नी, अलीयाब, मासेया आणि बनाया यांना अलामोथ*+ या सुरावर तंतुवाद्यं वाजवायला नेमलं होतं; २१  तसंच मतिथ्य,+ अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या यांना शमीनीथ*+ सुरावर वीणा* वाजवायला आणि निर्देशन करायला नेमलं होतं. २२  लेव्यांचा प्रमुख कनन्या+ याने कराराची पेटी उचलून नेण्याच्या कामावर देखरेख केली, कारण तो त्या कामात कुशल होता. २३  बरेख्या आणि एलकाना यांना कराराच्या पेटीचं रक्षण करण्यासाठी नेमलं होतं. २४  तसंच, ओबेद-अदोम व यहीया यांनाही कराराच्या पेटीचं रक्षण करायला नेमलं होतं. आणि शबन्याह, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्‍या, बनाया आणि अलियेजर या सर्व याजकांनी खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीसमोर मोठ्याने कर्णे वाजवले.+ २५  मग दावीद, तसंच इस्राएलचे वडीलजन आणि हजारांवर असलेले प्रमुख, हे सर्व ओबेद-अदोमच्या+ घरातून यहोवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी मोठ्या आनंदाने तिकडे गेले.+ २६  यहोवाच्या कराराची पेटी उचलून न्यायला खऱ्‍या देवाने लेव्यांना मदत केली, म्हणून त्यांनी सात गोऱ्ह्यांचं* आणि सात एडक्यांचं बलिदान दिलं.+ २७  त्या वेळी, दावीदने चांगल्या प्रतीच्या कापडाचा एक बिनबाह्‍यांचा झगा घातला होता. कराराची पेटी उचलून नेणारे सर्व लेवी, गायक आणि पेटी उचलणाऱ्‍या गायकांवर देखरेख करणारा कनन्या या सर्वांनीही असेच बिनबाह्‍यांचे झगे घातले होते. शिवाय, दावीदने मलमलीचं एफोदही* घातलं होतं.+ २८  सर्व इस्राएली लोक शिंग फुंकत; कर्णे+ व झांजा, तसंच तंतुवाद्यं व वीणा मोठ्याने वाजवत+ आणि आनंदाने जयघोष करत+ यहोवाच्या कराराची पेटी घेऊन येत होते. २९  पण यहोवाच्या कराराची पेटी दावीदपुरात+ येत असताना शौलच्या मुलीने, मीखलने+ खिडकीतून खाली पाहिलं. तेव्हा दावीद जल्लोष करत नाचत-बागडत असल्याचा तिला दिसला. आणि ती मनातल्या मनात त्याला तुच्छ लेखू लागली.+

तळटीपा

किंवा “सात तरण्या बैलांचं.”