१ इतिहास १७:१-२७

  • दावीद मंदिर बांधणार नाही (१-६)

  • देवाने दावीदसोबत केलेला राज्याचा करार (७-१५)

  • दावीदने केलेली उपकारस्तुतीची प्रार्थना (१६-२७)

१७  दावीद राजा आपल्या राजमहालात* राहू लागला, त्याच्या थोड्याच काळानंतर तो नाथान+ संदेष्ट्याला म्हणाला: “इथे मी देवदार लाकडाने बनलेल्या घरात राहतोय.+ पण यहोवाच्या कराराची पेटी मात्र कापडाच्या तंबूत आहे.”+ २  त्यावर नाथान दावीदला म्हणाला: “तुझ्या मनात आहे तसं कर. कारण खरा देव तुझ्याबरोबर आहे.” ३  त्याच रात्री नाथानला देवाकडून असा संदेश मिळाला: ४  “माझा सेवक दावीद याच्याकडे जा आणि त्याला सांग, की ‘यहोवा असं म्हणतो: “तू माझ्यासाठी घर बांधणार नाहीस.+ ५  कारण मी इस्राएलला इजिप्तमधून बाहेर आणलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधी कुठल्याही घरात राहिलो नाही. तर तंबूत किंवा उपासना मंडपात राहूनच*+ मी एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जात राहिलो. ६  त्या संपूर्ण काळात मी सर्व इस्राएली लोकांसोबत ठिकठिकाणी गेलो. आणि माझ्या इस्राएली लोकांचा सांभाळ करायला मी इस्राएलच्या न्यायाधीशांना नेमलं. पण त्यांच्यापैकी कोणालाही मी कधी एका शब्दाने असं म्हटलं का, की ‘तू माझ्यासाठी देवदाराचं घर का बांधलं नाहीस?’”’ ७  तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “तू माळरानात मेंढरांच्या मागे फिरत होतास, तेव्हा मी तुला माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी तिथून काढून आणलं.+ ८  तू जिथे कुठे जाशील तिथे मी तुझ्यासोबत असेन.+ मी तुझे सर्व शत्रू तुझ्यापुढून नाहीसे करीन.+ तसंच, मी तुझं नाव पृथ्वीवरच्या महान पुरुषांसारखं मोठं करीन.+ ९  मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना तिथे स्थायिक करीन. ते तिथे राहतील आणि यापुढे कोणीही त्यांना त्रास देणार नाही; दुष्ट लोक पूर्वीप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर जुलूम करणार नाहीत.+ १०  माझ्या इस्राएली लोकांवर मी न्यायाधीश नेमले+ त्या काळापासून घडत आलं, तसं यापुढे घडणार नाही; दुष्ट लोक पुन्हा त्यांच्यावर जुलूम करणार नाहीत. आणि तुझ्या सर्व शत्रूंना मी तुझ्या अधीन करीन.+ शिवाय, मी तुला असंही सांगतो, की ‘यहोवा तुझ्यासाठी एक राजघराणं तयार करेल.’* ११  तुझ्या आयुष्याचे दिवस संपून तुझा मृत्यू होईल,* तेव्हा मी तुझ्या संततीला,* तुझ्या मुलांपैकी एकाला तुझ्यानंतर राजा बनवीन.+ आणि मी त्याचं राज्यपद स्थापन करून ते स्थिर करीन.+ १२  तोच माझ्यासाठी एक घर बांधेल+ आणि मी त्याचं राजासन स्थापन करून ते कायमचं स्थिर करीन.+ १३  मी त्याचा पिता होईन आणि तो माझा मुलगा होईल.+ मी त्याच्यावर एकनिष्ठ प्रेम करण्याचं कधीही सोडणार नाही.+ जो तुझ्याआधी होऊन गेला, त्याच्यावर जसं एकनिष्ठ प्रेम करण्याचं मी सोडून दिलं, तसं मी करणार नाही.+ १४  मी त्याला सर्वकाळासाठी माझ्या राजासनावर बसवीन आणि त्याचं शासन व राजघराणं कायम टिकून राहील.”’”+ १५  नाथानने या सगळ्या गोष्टी आणि हा संपूर्ण दृष्टान्त दावीदला सांगितला. १६  तेव्हा दावीद राजा यहोवापुढे येऊन बसला आणि म्हणाला: “हे यहोवा देवा! मी कोण आणि माझं घराणं तरी काय? पण तरीही तू माझ्यासाठी इतकं काही केलंस.+ १७  आणि हेसुद्धा कमी म्हणून की काय, हे देवा! तुझ्या या सेवकाचं घराणं भविष्यात दूरपर्यंत टिकून राहील असंही तू म्हणतोस.+ आणि हे यहोवा देवा! तू मला आणखी मानसन्मान मिळावा या लायकीचं समजतोस.* १८  मला मिळालेल्या या सन्मानाबद्दल मी आणखी काय बोलणार? कारण तुझ्या या सेवकाला, दावीदला तू चांगलं ओळखतोस.+ १९  हे यहोवा, तुझ्या या सेवकासाठी तू या सर्व महान गोष्टी केल्यास. त्या सर्व तू तुझ्या मनाप्रमाणे केल्यास. आणि असं करून तू आपली महानता प्रकट केलीस.+ २०  हे यहोवा, तुझ्यासारखा कोणीही नाही,+ आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही;+ आम्ही आजपर्यंत आमच्या कानांनी जे काही ऐकलं, त्यावरून आम्ही हे खातरीने म्हणू शकतो. २१  या संपूर्ण पृथ्वीवर तुझ्या इस्राएली लोकांसारखं दुसरं कोणतं राष्ट्र आहे?+ हे खऱ्‍या देवा, आपले लोक होण्याकरता तू जाऊन त्यांची सुटका केलीस.+ तू महान आणि अद्‌भुत कार्यं करून आपलं नाव मोठं केलंस.+ तू इजिप्तमधून ज्यांची सुटका केलीस त्या आपल्या लोकांसाठी तू राष्ट्रांना त्यांच्यापुढून घालवून दिलंस.+ २२  तू इस्राएली लोकांना कायमसाठी आपलं केलंस+ आणि हे यहोवा, तू त्यांचा देव बनलास.+ २३  आता हे यहोवा, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत आणि त्याच्या घराण्याच्या बाबतीत तू जे वचन दिलंस ते सर्वकाळ पाळ. आणि तू जसं म्हणालास तसंच होऊ दे.+ २४  तुझं नाव कायम टिकून राहो* आणि सदासर्वकाळ उंचावलं जावो.+ म्हणजे ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा हाच इस्राएलचा देव आहे,’ असं लोक म्हणतील. आणि तुझ्या या सेवकाचं, दावीदचं घराणं कायमचं तुझ्यापुढे स्थापित असो.+ २५  कारण हे देवा, तुझ्या या सेवकासाठी एक राजघराणं तयार करण्याचा* तुझा उद्देश तू मला सांगितलास. आणि म्हणून ही प्रार्थना करण्याची हिंमत तुझ्या या सेवकाला झाली. २६  आता हे यहोवा, तूच खरा देव आहेस. आणि तुझ्या या सेवकासाठी तू या चांगल्या गोष्टी करण्याचं वचन दिलं आहेस. २७  तेव्हा, तुझ्या या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यात तुला आनंद मिळो आणि ते तुझ्यासमोर कायम टिकून राहो. कारण हे यहोवा, तूच या घराण्याला आशीर्वाद दिला आहेस आणि ते कायम आशीर्वादित राहील.”

तळटीपा

किंवा “घरात.”
शब्दशः “एका तंबूतून दुसऱ्‍या तंबूत.”
किंवा “घर बांधेल.”
शब्दशः “पूर्वजांकडे जाऊन निजशील.”
शब्दशः “बीज.”
किंवा “मी उच्च पदावरचा माणूस आहे असं तू मला समजतोस.”
किंवा “कायम भरवशालायक ठरो.”
किंवा “घर बांधण्याचा.”