१ इतिहास २०:१-८

  • राब्बा शहरावर कब्जा (१-३)

  • धिप्पाड पलिष्टी माणसांना मारून टाकण्यात येतं (४-८)

२०  राजे जेव्हा युद्धाच्या मोहिमांवर जायचे त्या काळात, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला* यवाब+ आपलं सैन्य घेऊन निघाला आणि त्याने जाऊन अम्मोनी लोकांचा देश उद्ध्‌वस्त करून टाकला. त्याने राब्बा+ शहराला वेढा घातला. पण, दावीद मात्र यरुशलेममध्येच राहिला.+ यवाबने राब्बा शहरावर हल्ला केला आणि ते धुळीस मिळवलं.+ २  मग दावीदने मल्कामच्या* डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. मुकुटातल्या सोन्याचं वजन एक तालान्त* इतकं होतं. याशिवाय, त्यात मौल्यवान रत्नंही जडलेली होती. तो मुकुट दावीदच्या डोक्यावर ठेवण्यात आला. दावीदने त्या शहरातून अतिशय मोठ्या प्रमाणात लुटीचा मालही आणला.+ ३  त्याने त्या शहरातल्या लोकांना बाहेर काढलं आणि त्यांना करवतीने दगड कापण्याच्या कामाला लावलं.+ तसंच, त्याने त्यांना धारदार लोखंडी हत्यारं व कुऱ्‍हाडी वापरून मजुरीची कामं करायला लावली. दावीदने अम्मोनी लोकांच्या सर्व शहरांच्या बाबतीत असंच केलं. शेवटी, दावीद आणि त्याचे सर्व सैनिक यरुशलेमला परत आले. ४  यानंतर, गेजेर इथे इस्राएली लोकांचं पलिष्ट्यांशी युद्ध सुरू झालं. त्या वेळी हूशाथी सिब्बखय+ याने रफाई+ वंशातला सिप्पय याला मारून टाकलं. आणि पलिष्टी लोक इस्राएलच्या अधीन झाले. ५  मग, पुन्हा एकदा इस्राएली लोकांची पलिष्ट्यांशी लढाई झाली. तेव्हा, याईरचा मुलगा एलहानान याने गित्ती गल्याथच्या+ भावाला, म्हणजे लहमी याला मारून टाकलं; लहमीच्या भाल्याचा दांडा हातमागाच्या दांड्याइतका मोठा होता.+ ६  पुढे गथ+ इथे पुन्हा युद्ध झालं. तिथे एक अतिशय धिप्पाड माणूस होता.+ त्याच्या दोन्ही हातांना आणि दोन्ही पायांना सहा-सहा अशी एकूण २४ बोटं होती; तोसुद्धा रेफाई वंशातला होता.+ ७  तो इस्राएलची निंदा करत होता.+ म्हणून योनाथानने त्याला मारून टाकलं; योनाथान हा दावीदचा भाऊ शिमा+ याचा मुलगा होता. ८  रेफाई+ वंशातली ही माणसं गथची+ राहणारी होती. आणि दावीद व त्याचे सेवक यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला.

तळटीपा

म्हणजे, वसंत ऋतूत.
२शमु १२:३० ची तळटीप पाहा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.