१ इतिहास २१:१-३०

  • दावीद लोकांची संख्या मोजून पाप करतो (१-६)

  • यहोवाकडून मिळालेली शिक्षा (७-१७)

  • दावीद वेदी बांधतो (१८-३०)

२१  मग सैतान* इस्राएलविरुद्ध उठला आणि त्याने दावीदला इस्राएली लोकांची संख्या मोजायला प्रवृत्त केलं.+ २  तेव्हा, दावीद यवाबला+ आणि लोकांच्या प्रमुखांना म्हणाला: “जा आणि दानपासून+ बैर-शेबापर्यंत सगळ्या इस्राएली लोकांची संख्या मोजा, आणि मला येऊन सांगा; म्हणजे ते किती आहेत हे मला कळेल.” ३  पण यवाब म्हणाला: “यहोवा त्याच्या लोकांची संख्या १०० पटींनी वाढवो! माझे प्रभू, माझे राजे, ते सर्व लोक तुमचेच सेवक आहेत ना? मग माझ्या प्रभूला ही गोष्ट का करावीशी वाटते? आणि असं करून माझ्या प्रभूने इस्राएलवर दोष आणण्याचं कारण का बनावं?” ४  पण राजाच्या म्हणण्यापुढे यवाबचं काहीही चाललं नाही. म्हणून मग यवाब तिथून निघाला आणि संपूर्ण इस्राएलचा दौरा करून परत यरुशलेमला आला.+ ५  मग यवाबने नोंदणी केलेल्या लोकांची संख्या दावीदला सांगितली. इस्राएलमध्ये तलवार चालवणाऱ्‍या माणसांची संख्या ११,००,००० होती; तर यहूदामध्ये तलवार चालवणाऱ्‍या माणसांची संख्या ४,७०,००० इतकी होती.+ ६  पण या लोकांमध्ये लेवी आणि बन्यामीन वंशातल्या लोकांची नोंदणी करण्यात आली नव्हती.+ कारण यवाबला राजाचं म्हणणं अजिबात आवडलं नव्हतं.*+ ७  दावीदने जे केलं त्यामुळे खऱ्‍या देवाला फार वाईट वाटलं आणि त्याने इस्राएलला शिक्षा केली. ८  दावीद मग खऱ्‍या देवाला म्हणाला: “मी हे काम करून खूप मोठं पाप केलंय.+ कृपा करून आपल्या या सेवकाचा अपराध माफ कर;+ मी खरंच, खूप मूर्खपणे वागलोय.”+ ९  तेव्हा यहोवा दावीदच्या दृष्टान्त पाहणाऱ्‍याला, म्हणजे गाद+ संदेष्ट्याला म्हणाला: १०  “दावीदकडे जा आणि त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “मी तुझ्यासमोर तीन पर्याय ठेवतो. त्यातला एक निवड. म्हणजे त्याप्रमाणे मी तुझ्या बाबतीत करीन.”’” ११  म्हणून गाद संदेष्टा दावीदकडे गेला आणि त्याला म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘या पर्यायांपैकी एक निवड: १२  तुझ्या देशात सात वर्षं दुष्काळ पडावा?+ की तीन महिने शत्रूंनी तुझ्यावर तलवार चालवावी आणि तुझा पराभव होत राहावा?+ किंवा मग तीन दिवस यहोवाची तलवार चालावी, म्हणजे देशात रोगाची साथ पसरावी;+ आणि यहोवाच्या स्वर्गदूताने इस्राएलच्या सगळ्या प्रदेशाचा नाश करावा?’+ तर आता विचार कर आणि ज्याने मला पाठवलंय त्याला मी काय उत्तर देऊ ते सांग.” १३  त्यावर दावीद गाद संदेष्ट्याला म्हणाला: “मी मोठ्या संकटात सापडलोय. यहोवा अतिशय दयाळू आहे,+ म्हणून मी त्याच्या हातात पडलेलं बरं. पण मला माणसाच्या हाती पडू देऊ नको.”+ १४  तेव्हा यहोवाने इस्राएलवर रोगाची साथ पाठवली,+ आणि ७०,००० लोक मेले.+ १५  मग, खऱ्‍या देवाने एका स्वर्गदूताला यरुशलेमचा नाश करण्यासाठी पाठवलं. पण तो नाश करणार इतक्यात, यहोवाने ते पाहिलं आणि आपण आणलेल्या संकटाबद्दल त्याला फार वाईट वाटलं.*+ म्हणून नाश करणाऱ्‍या त्या स्वर्गदूताला तो म्हणाला: “आता पुरे!+ आपला हात आवर.” त्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत अर्णान+ यबूसी+ याच्या खळ्याजवळ* उभा होता. १६  दावीदने वर पाहिलं, तेव्हा त्याला यहोवाचा स्वर्गदूत पृथ्वीच्या आणि आकाशाच्या मधे उभा असल्याचा दिसला; त्या स्वर्गदूताच्या हातात तलवार असून+ त्याने ती यरुशलेमकडे रोखली होती. ते पाहून दावीद आणि त्याच्यासोबतचे वडीलजन यांनी लगेच जमिनीवर पडून दंडवत घातला;+ त्या वेळी त्यांनी गोणपाटं घातली होती.+ १७  दावीद खऱ्‍या देवाला म्हणाला: “खरंतर लोकांची संख्या मोजायला मी सांगितलं होतं. पाप मी केलंय, चूक तर माझी आहे;+ पण ही मेंढरं​—यांनी काय केलंय? हे माझ्या देवा यहोवा! कृपा करून, तुझा हात माझ्यावर आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावर पडू दे. पण तुझ्या लोकांवर ही पीडा आणू नकोस.”+ १८  मग यहोवाच्या स्वर्गदूताने गाद+ संदेष्ट्याला दावीदकडे जाऊन असा निरोप द्यायला सांगितला, की त्याने वरती अर्णान यबूसीच्या खळ्याकडे जावं आणि तिथे यहोवासाठी एक वेदी बांधावी.+ १९  म्हणून गाद संदेष्ट्याने यहोवाच्या नावाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे दावीद वरती खळ्याकडे गेला. २०  इकडे, अर्णान आपल्या खळ्यात गव्हाची मळणी करत होता. त्याने वळून पाहिलं तेव्हा त्याला स्वर्गदूत दिसला. त्याला बघून अर्णानसोबत असलेली त्याची चार मुलं लपली. २१  दावीद अर्णानकडे गेला, तेव्हा त्याला पाहून अर्णान लगेच खळ्यातून बाहेर आला. मग त्याने जमिनीपर्यंत डोकं टेकवून दावीदला दंडवत घातला. २२  दावीद अर्णानला म्हणाला: “हे खळं मला विकत दे. मला यहोवासाठी इथे एक वेदी बांधायची आहे. तू माझ्याकडून या खळ्याची पूर्ण किंमत घे, म्हणजे लोकांवर ओढवलेलं संकट थांबेल.”+ २३  पण अर्णान दावीदला म्हणाला: “माझ्या प्रभूने, राजाने ते असंच घ्यावं. आणि त्यांना जसं योग्य वाटतं तसं त्यांनी करावं. होमार्पणासाठी मी तुम्हाला ही गुरं, जाळण्यासाठी मळणीच्या फळ्या+ आणि अन्‍नार्पणासाठी गहू देतोय. मी हे सगळं तुम्हाला देतोय.” २४  पण दावीद राजा त्याला म्हणाला: “नाही, मी ते तुझ्याकडून पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझं आहे ते असंच घेऊन मी यहोवाला देणार नाही. किंवा ज्या होमार्पणांसाठी मला कोणतीही किंमत चुकवावी लागणार नाही, अशी होमार्पणं मी देणार नाही.”+ २५  म्हणून दावीदने ती जागा विकत घेण्यासाठी अर्णानला ६०० शेकेल* सोनं वजन करून दिलं. २६  नंतर दावीदने तिथे यहोवासाठी एक वेदी बांधली+ आणि त्यावर होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली. मग दावीदने यहोवाचा धावा केला आणि देवाने होमार्पणाच्या वेदीवर आकाशातून अग्नी पाठवून त्याल उत्तर दिलं.+ २७  यहोवाने त्या स्वर्गदूताला आपली तलवार परत म्यानात ठेवायची आज्ञा दिली.+ २८  दावीदने पाहिलं की यहोवाने अर्णान यबूसीच्या खळ्यामध्ये आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आहे. तेव्हापासून तो तिथेच बलिदानं देऊ लागला. २९  त्या वेळी, मोशेने ओसाड रानात बनवलेला यहोवाचा उपासना मंडप आणि होमार्पणाची वेदी गिबोनमधल्या उच्च स्थानावर होती.+ ३०  पण, दावीद देवाचा सल्ला घेण्यासाठी तिथे गेला नाही. कारण त्याला यहोवाच्या स्वर्गदूताच्या तलवारीची दहशत बसली होती.

तळटीपा

किंवा कदाचित, “एक विरोधक.”
किंवा “तिरस्करणीय वाटलं होतं.”
किंवा “पस्तावा झाला.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.