१ इतिहास २९:१-३०

  • मंदिराच्या बांधकामासाठी दिलेलं दान (१-९)

  • दावीदची प्रार्थना (१०-१९)

  • लोक आनंद साजरा करतात; शलमोनचं राज्यपद (२०-२५)

  • दावीदचा मृत्यू (२६-३०)

२९  मग दावीद राजा संपूर्ण मंडळीला म्हणाला: “देवाने माझ्या ज्या मुलाला, शलमोनला निवडलंय,+ तो वयाने लहान आहे व त्याला अनुभवसुद्धा नाही.+ आणि मंदिर बांधायचं काम खरंतर खूप मोठं आहे. कारण हे मंदिर कोणा माणसासाठी नाही, तर यहोवा देवासाठी असणार आहे.+ २  माझ्या देवाच्या मंदिरासाठी तयारी करण्यात मी कोणतीही कसर सोडलेली नाही. सोन्याच्या कामासाठी सोनं, चांदीच्या कामासाठी चांदी, तांब्याच्या कामासाठी तांबं, लोखंडाच्या कामासाठी लोखंड+ आणि लाकडाच्या कामासाठी लाकूड+ अशा सगळ्या गोष्टींची मी तयारी केली आहे. तसंच गोमेद रत्नं, बांधकामाच्या चुन्याने बसवायची इतर रत्नं, सजावटीचे छोटे रंगीबेरंगी दगड, सर्व प्रकारचे मौल्यवान दगड आणि मोठ्या प्रमाणात अलाबास्त्र* दगड या सर्वांचीही मी तयारी केली आहे. ३  पवित्र मंदिरासाठी केलेल्या या सर्व तयारीशिवाय, माझ्या देवाच्या मंदिराबद्दल मला प्रेम असल्यामुळे,+ मी माझ्या स्वतःच्या खजिन्यातूनही+ सोनं आणि चांदी देवाच्या मंदिरासाठी देतोय. ४  मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी मी ओफीरचं ३,००० तालान्त* सोनं+ आणि ७,००० तालान्त शुद्ध चांदी देतोय. ५  हे सगळं मी सोन्याच्या व चांदीच्या वस्तू बनवण्यासाठी आणि कारागिरांकडून सर्व प्रकारच्या वस्तू बनवून घेण्यासाठी देतोय. तर आता तुमच्यापैकी कोण स्वखुशीने यहोवासाठी भेट घेऊन यायला तयार आहे?”+ ६  तेव्हा इस्राएलच्या घराण्यांचे प्रमुख, वंशांचे प्रमुख, हजारांवर व शंभरांवर असलेले अधिकारी+ आणि राजाचा कारभार पाहणारे अधिकारी+ हे सगळे स्वखुशीने पुढे आले. ७  आणि खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी १०,००० दारिक,* ५,००० तालान्त सोनं, १०,००० तालान्त चांदी, १८,००० तालान्त तांबं आणि १,००,००० तालान्त लोखंड दिलं. ८  तसंच, ज्या कोणाकडे मौल्यवान दगड होते, त्यांनी ते यहोवाच्या मंदिरातल्या भांडारात जमा करण्यासाठी यहीएल+ गेर्षोनी+ याच्याकडे दिले. ९  या सर्व गोष्टी स्वेच्छेने दान करण्यात लोकांना खूप आनंद झाला. कारण त्यांनी ते पूर्ण मनाने यहोवाला दिलं होतं;+ आणि दावीद राजालाही अतिशय आनंद झाला. १०  मग दावीदने संपूर्ण मंडळीसमोर यहोवाची स्तुती केली. दावीद म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा यहोवा, आमच्या पित्या! तुझी सदासर्वकाळ* स्तुती होवो. ११  हे यहोवा! महानता,+ सामर्थ्य,+ वैभव, ऐश्‍वर्य आणि सन्मान* हे सर्व तुझं आहे.+ कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेलं सगळं काही तुझंच आहे.+ हे यहोवा! राज्यही तुझंच आहे+ आणि तूच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस. १२  धन व गौरव तुझ्याकडून आहेत.+ तू सर्व गोष्टींवर राज्य करतोस.+ तुझ्या हातात शक्‍ती+ आणि सामर्थ्य आहे.+ तुझा हात सर्व लोकांना महान बनवू शकतो+ आणि त्यांना बळही देऊ शकतो.+ १३  म्हणून हे आमच्या देवा, आम्ही तुझ्या सुंदर नावाचा महिमा करतो. १४  तुला स्वखुशीने दान देणारा मी कोण? आणि माझे लोक तरी काय? कारण, आम्हाला सगळं काही तुझ्याकडूनच मिळालंय. आणि जे काही आम्ही तुला दिलंय, ते तूच आम्हाला दिलं आहेस. १५  आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही तुझ्यासमोर विदेशी आणि परके आहोत.+ कारण, पृथ्वीवर आमचं जीवन सावलीसारखं आहे+ आणि आम्हाला कोणतीही आशा नाही. १६  हे यहोवा आमच्या देवा! तुझ्या पवित्र नावाच्या गौरवासाठी मंदिर बांधायला आम्ही ही जी धनसंपत्ती जमवली आहे, ती सगळी तुझ्याकडूनच आहे आणि ती सगळी तुझीच आहे. १७  हे माझ्या देवा, मला हे चांगलं माहीत आहे, की तू मन ओळखणारा* आहेस+ आणि तुला एकनिष्ठता* प्रिय आहे.+ मी या सर्व गोष्टी तुला प्रामाणिक मनाने आणि स्वेच्छेने दिल्या आहेत. आणि इथे असलेले तुझे लोकसुद्धा तुला स्वखुशीने दान देत आहेत, हे पाहून मला खूप आनंद होतोय. १८  हे यहोवा! अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या देवा, आमच्या पूर्वजांच्या देवा! तुझ्या लोकांनी दाखवलेली ही उदार मनोवृत्ती कायम टिकवून ठेवायला आणि पूर्ण मनाने तुझी सेवा करायला त्यांना मदत कर.+ १९  आणि माझ्या मुलाला, शलमोनलाही तुझ्या आज्ञांचं,+ स्मरण-सूचनांचं* आणि कायद्यांचं पूर्ण* मनाने पालन करायला मदत कर.+ त्याला या सगळ्या गोष्टी करायला आणि जे मंदिर बांधण्यासाठी मी तयारी केली आहे, ते बांधायला मदत कर.”+ २०  दावीद मग संपूर्ण मंडळीला म्हणाला: “तुमचा देव यहोवा याची स्तुती करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांच्या देवाची, यहोवाची स्तुती केली आणि यहोवाला व राजाला दंडवत घातला. २१  ते दुसऱ्‍या दिवसापर्यंत यहोवाला बलिदानं आणि होमार्पणं देत राहिले.+ त्यांनी यहोवासाठी १,००० बैल, १,००० एडके, १,००० नर कोकरं आणि त्यांच्यासोबतची पेयार्पणं दिली.+ त्यांनी सगळ्या इस्राएलसाठी खूप मोठ्या प्रमाणात बलिदानं अर्पण केली.+ २२  मग त्यांनी यहोवासमोर खाणंपिणं केलं आणि आनंद साजरा केला.+ तसंच, त्यांनी दावीदचा मुलगा शलमोन याला दुसऱ्‍यांदा राजा बनवलं, आणि यहोवासमोर पुढारी म्हणून त्याचा अभिषेक केला.+ शिवाय त्यांनी याजक म्हणून सादोकचा अभिषेक केला.+ २३  त्यानंतर शलमोन आपले वडील दावीद यांच्या जागी राजा बनला आणि यहोवाच्या राजासनावर बसला.+ तो यशस्वी झाला आणि सगळे इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहायचे. २४  तसंच सर्व अधिकारी,+ शूर योद्धे+ आणि दावीद राजाची सगळी मुलंही+ शलमोन राजाच्या अधीन झाली. २५  यहोवाने सर्व इस्राएली लोकांच्या नजरेत शलमोनला अतिशय महान केलं. आणि इस्राएलमध्ये होऊन गेलेल्या सगळ्या राजांपेक्षा जास्त शाही वैभव त्याला दिलं.+ २६  अशा प्रकारे इशायचा मुलगा दावीद याने संपूर्ण इस्राएलवर राज्य केलं. २७  त्याने इस्राएलवर ४० वर्षं राज्य केलं; त्याने हेब्रोनमधून ७ वर्षं,+ तर यरुशलेममधून ३३ वर्षं राज्य केलं.+ २८  दावीदला दीर्घायुष्य, बरीच धनसंपत्ती व मानसन्मान मिळाला, आणि तो म्हातारा होऊन सुखाने मरण पावला.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा शलमोन राजा बनला.+ २९  दावीद राजाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा सगळा इतिहास शमुवेल द्रष्टा,* नाथान+ संदेष्टा आणि दृष्टान्त पाहणारा गाद+ यांच्या लिखाणांत लिहिलेला आहे. ३०  याशिवाय, या लिखाणांत त्याचं राज्य, त्याचे पराक्रम; तसंच त्याच्या जीवनकाळात त्याच्यावर, इस्राएलवर आणि आजूबाजूच्या राज्यांवर जे बरेवाईट प्रसंग आले त्यांबद्दलही लिहिण्यात आलं आहे.

तळटीपा

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
हे सोन्याचं एक पर्शियन नाणं होतं. अति. ख१४ पाहा.
किंवा “अनंतकाळापासून अनंतकाळापर्यंत.”
किंवा “महिमा.”
किंवा “पारखणारा.”
किंवा “सात्विकता.”
किंवा “पूर्णपणे समर्पित.”