करिंथकर यांना पहिलं पत्र १३:१-१३
-
प्रेम—आणखी चांगला मार्ग (१-१३)
१३ जर मी माणसांच्या आणि स्वर्गदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्यात प्रेम नसलं तर मी ठणठणणाऱ्या थाळीसारखा किंवा झणझणणाऱ्या झांजेसारखा आहे.
२ आणि मला भविष्यवाणी करण्याचं, सगळी पवित्र रहस्यं समजण्याचं आणि सर्व प्रकारच्या ज्ञानाचं दान मिळालं असलं;+ तसंच, डोंगर इथून तिथे हलवण्याइतका माझा विश्वास मजबूत असला, पण माझ्यात प्रेम नसलं तर मी काहीच नाही.+
३ मी गोरगरिबांना जेवू घालण्यासाठी माझी सगळी संपत्ती दिली+ आणि मोठेपणा मिरवता यावा म्हणून मी आपलं जीवन अर्पण करायला तयार झालो, पण माझ्यात प्रेम नसलं,+ तर या सगळ्याचा मला काहीच उपयोग होणार नाही.
४ प्रेम+ सहनशील+ आणि दयाळू+ असतं. प्रेम हेवा करत नाही,+ बढाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही;+
५ प्रेम असभ्यपणे वागत नाही,+ स्वार्थ पाहत नाही,+ लगेच चिडत नाही,+ आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा* हिशोब ठेवत नाही.+
६ ते अनीतीमुळे आनंदित होत नाही,+ तर सत्यामुळे आनंदित होतं.
७ प्रेम सगळं सहन करतं,+ सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं,+ सगळ्या गोष्टींची आशा धरतं,+ सगळ्या बाबतींत धीर धरतं.+
८ प्रेम कधीही नाहीसं होत नाही. पण भविष्यवाणी करण्याचं, इतर भाषा बोलण्याचं* किंवा ज्ञान मिळण्याचं दान असेल तर ते नाहीसं होईल.
९ कारण आपल्याजवळ असलेलं ज्ञान अपूर्ण आहे+ आणि आपलं भविष्यवाणी करणं हेसुद्धा अपूर्ण आहे.
१० पण जे पूर्ण ते येईल, तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.
११ मी लहान होतो तेव्हा लहान मुलासारखा बोलायचो, लहान मुलासारखा विचार करायचो, लहान मुलासारख्या माझ्या समजुती होत्या. पण, आता मी प्रौढ झालो आहे, त्यामुळे लहानपणीच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत.
१२ कारण आता आपल्याला धातूच्या आरशात अंधूक* दिसतं, पण पुढे सगळं स्पष्ट होईल. सध्या माझं ज्ञान अपूर्ण आहे, पण त्या वेळी, देव जसा मला पूर्णपणे ओळखतो, तसंच मलाही पूर्ण* ज्ञान मिळेल.
१३ शेवटी विश्वास, आशा आणि प्रेम या तीन गोष्टी टिकून राहतील; पण, प्रेम या सगळ्यांत श्रेष्ठ आहे.+
तळटीपा
^ किंवा “हानीचा.”
^ म्हणजे, चमत्कारिक रितीने वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं दान.
^ किंवा “अस्पष्ट.”
^ किंवा “अचूक.”