करिंथकर यांना पहिलं पत्र १४:१-४०
१४ एकमेकांसोबत प्रेमाने वागायचा होताहोईल तितका प्रयत्न करा. पण, त्याच वेळी देवाकडची दानं आणि खासकरून भविष्यवाणी करायचं दान मिळवायचा प्रयत्न करत राहा.*+
२ कारण इतर भाषेत बोलणारा माणसांशी नाही, तर देवाशी बोलतो. तो देवाच्या पवित्र शक्तीच्या* मदतीने पवित्र रहस्यं+ सांगत असला, तरी कोणालाही ती समजत नाहीत.+
३ पण, भविष्यवाणी करणारा आपल्या बोलण्याने इतरांना प्रोत्साहन, मदत आणि सांत्वन देतो.
४ इतर भाषेत बोलणारा स्वतःचाच विश्वास मजबूत करतो, तर भविष्यवाणी करणारा संपूर्ण मंडळीचा विश्वास मजबूत करतो.
५ खरं पाहिलं, तर तुमच्यापैकी सर्वांनीच इतर भाषा बोलाव्यात अशी माझी इच्छा आहे;+ तरी तुम्ही भविष्यवाणी केली तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतं.+ कारण इतर भाषेत बोलणारा, मंडळीचा विश्वास मजबूत व्हावा म्हणून भाषांतर करत नसेल, तर भविष्यवाणी करणारा त्याच्याहून श्रेष्ठ आहे.
६ आता बांधवांनो, मी जर तुमच्याकडे येऊन इतर भाषांमध्ये बोलू लागलो, पण देवाने प्रकट केलेल्या गोष्टी,+ ज्ञान,+ भविष्यवाणी किंवा शिक्षण यांबद्दल बोललो नाही, तर त्याचा काय फायदा?
७ बासरी किंवा वीणा* यांसारख्या वाद्यांचंच उदाहरण घ्या. प्रत्येक स्वर स्पष्टपणे निघाल्याशिवाय, बासरीवर किंवा वीणेवर काय वाजवलं जात आहे, हे कोणाला कसं कळेल?
८ युद्धाचा इशारा देण्यासाठी कर्णा वाजवणाऱ्याने जर तो नीट वाजवला नाही, तर युद्धासाठी कोण तयार होईल?
९ त्याचप्रमाणे, जर तुम्ही सहज समजेल अशा भाषेत बोलला नाहीत, तर तुम्ही काय म्हणत आहात हे कोणाला कसं कळेल? उलट, ते वाऱ्याशी बोलण्यासारखं ठरेल.
१० तसं पाहिलं तर जगात बऱ्याच भाषा आहेत, पण त्यांपैकी एकही अर्थहीन नाही.
११ कारण मी जे बोलत आहे त्याचा अर्थच मला समजत नसेल, तर ज्याच्याशी मी बोलत आहे, त्याच्यासाठी मी एखाद्या विदेश्यासारखा असेन आणि माझ्याशी बोलणाराही माझ्यासाठी विदेश्यासारखा असेल.
१२ तर मग, पवित्र शक्तीची दानं मिळवण्यासाठी उत्सुक असलेले तुम्हीसुद्धा, मोठ्या प्रमाणात अशी दानं मिळवायचा प्रयत्न करा. त्यामुळे मंडळीचा विश्वास मजबूत होईल.+
१३ म्हणून, इतर भाषेत बोलणाऱ्याने आपण जे सांगत आहोत त्याचं भाषांतर करता यावं, म्हणून प्रार्थना करावी.+
१४ कारण, जेव्हा मी इतर भाषेत प्रार्थना करतो, तेव्हा पवित्र शक्तीचं दान मिळाल्यामुळे मी ती प्रार्थना करत असतो, पण मला त्याचा अर्थ समजत नाही.
१५ तर मग, काय करावं? मी पवित्र शक्तीच्या दानामुळे प्रार्थना करीन, पण त्यासोबतच मला समजेल अशा रितीने ती करीन. तसंच, मी पवित्र शक्तीच्या दानामुळे स्तुतिगीतं गाईन, पण ती मला समजतील अशा रितीने गाईन.
१६ नाहीतर, फक्त पवित्र शक्तीच्या दानामुळे तू उपकारस्तुती केली, तर तुमच्यामध्ये असलेला सामान्य माणूस तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेला “आमेन” कसा म्हणेल? कारण प्रार्थनेत तू काय म्हणतोस हे त्याला समजत नाही.
१७ तू खूप चांगल्या प्रकारे उपकारस्तुती करत असशील, पण त्यामुळे दुसऱ्याला प्रोत्साहन मिळत नाही.
१८ मी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त भाषा बोलू शकतो, याबद्दल मी देवाचे आभार मानतो.
१९ असं असलं तरी, एखाद्या मंडळीत इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या बुद्धीला समजतील असे पाच शब्द बोलणं मी पसंत करीन. म्हणजे मला त्यांतून इतरांना काही शिकवता येईल.*+
२० बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत लहान मुलांसारखं होऊ नका,+ तर वाईट गोष्टींच्या बाबतीत लहान मुलांसारखं व्हा;+ आणि समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हा.+
२१ नियमशास्त्रात असं लिहिलं आहे: “ ‘मी या लोकांशी विदेश्यांच्या भाषांत आणि परक्यांच्या बोलींत जरी बोललो, तरी ते माझं ऐकणार नाहीत,’ असं यहोवा* म्हणतो.”+
२२ त्यामुळे इतर भाषा, विश्वासात असलेल्यांसाठी नाही, तर विश्वासात नसलेल्यांसाठी एक चिन्ह आहेत.+ पण, भविष्यवाणी मात्र विश्वासात नसलेल्यांसाठी नाही, तर विश्वासात असलेल्यांसाठी आहे.
२३ त्यामुळे, संपूर्ण मंडळी एका ठिकाणी एकत्र जमली आणि सगळे इतर भाषा बोलू लागले, तर तिथे येणारे सामान्य लोक किंवा विश्वासात नसलेले लोक, तुम्हाला वेडे म्हणणार नाहीत का?
२४ पण तुम्ही सगळे भविष्यवाणी करत असताना, एखादा विश्वासात नसलेला किंवा सामान्य माणूस तिथे आला, तर तुमच्या सर्वांच्या बोलण्यामुळे तो स्वतःचं बारकाईने परीक्षण करायला आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला प्रवृत्त होईल.
२५ मग, त्याच्या मनातल्या गुप्त गोष्टींची त्याला जाणीव होईल आणि तो दंडवत घालून देवाची उपासना करेल आणि म्हणेल: “देव खरंच तुमच्यामध्ये आहे.”+
२६ तर मग बांधवांनो, आपण काय करावं? तुम्ही एकत्र येता तेव्हा कोणाला एखादं स्तोत्र गायचं असतं, कोणाला शिक्षण द्यायचं असतं, कोणाला देवाने प्रकट केलेल्या गोष्टी सांगायच्या असतात, कोणाला इतर भाषेत बोलायचं असतं, तर आणखी कोणाला भाषांतर करायचं असतं.+ पण, सर्व गोष्टी एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी होऊ द्या.
२७ कोणाला इतर भाषेत बोलायचं असेल, तर असे दोघं किंवा जास्तीत जास्त तिघं असावेत; आणि त्यांनी एकेक करून बोलावं आणि कोणीतरी त्यांच्या बोलण्याचं भाषांतर करावं.+
२८ पण भाषांतर करणारा कोणी नसेल, तर त्यांनी मंडळीत शांत राहावं आणि मनातल्या मनात देवाशी बोलावं.
२९ भविष्यवाणी करणाऱ्यांपैकी+ दोघा किंवा तिघांनी बोलावं आणि बाकीच्यांनी त्याचा अर्थ शोधून काढावा.
३० पण तिथे बसलेले असताना एखाद्याला देवाने काही प्रकट केलं, तर जो बोलत आहे त्याने शांत राहावं.
३१ कारण, एकेक करून तुम्ही सर्व जण भविष्यवाणी करू शकता. म्हणजे सगळेच शिकतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल.+
३२ संदेष्ट्यांना पवित्र शक्तीचं जे दान मिळालं आहे, त्यावर त्यांनी नियंत्रण ठेवावं.
३३ कारण देव अव्यवस्थेचा नाही, तर शांतीचा देव आहे.+
पवित्र जनांच्या सगळ्या मंडळ्यांमध्ये जशी रीत आहे त्याप्रमाणे,
३४ स्त्रियांनी मंडळ्यांमध्ये शांत राहावं. कारण त्यांना बोलायची परवानगी नाही.+ उलट त्यांनी अधीनता दाखवावी.+ नियमशास्त्रातसुद्धा असंच म्हटलं आहे.
३५ त्यांना काही प्रश्न असतील, तर त्याबद्दल त्यांनी आपल्या नवऱ्याला घरी विचारावं, कारण स्त्रीने मंडळीत बोलणं हे लज्जास्पद आहे.
३६ देवाचं वचन तुमच्यापासून आलं आहे का? किंवा ते फक्त तुम्हालाच देण्यात आलं आहे का?
३७ जर कोणाला वाटत असेल, की आपण संदेष्टे आहोत किंवा आपल्याला पवित्र शक्तीचं दान मिळालं आहे, तर ज्या गोष्टी मी तुम्हाला लिहीत आहे त्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आहेत हे त्याने मान्य करावं.
३८ पण जर कोणी ही गोष्ट नाकारली, तर त्यालाही नाकारलं जाईल.*
३९ तर माझ्या बांधवांनो, भविष्यवाणी करायचा प्रयत्न करत राहा.+ त्याच वेळी, इतर भाषा बोलायचीही मनाई करू नका.+
४० पण, सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थितपणे* होऊ द्या.+
तळटीपा
^ किंवा “आवेशाने प्रयत्न करत राहा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “तोंडी शिकवता येईल.”
^ किंवा कदाचित, “जर कोणी अज्ञानी असेल, तर तो अज्ञानी राहील.”
^ किंवा “शिस्तीत.”