करिंथकर यांना पहिलं पत्र १५:१-५८
१५ आता बांधवांनो, जो आनंदाचा संदेश मी तुम्हाला घोषित केला,+ जो तुम्ही स्वीकारला आणि ज्याच्या बाजूने तुम्ही ठाम भूमिका घेतली, त्याची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे.
२ मी घोषित केलेल्या आनंदाच्या संदेशाला जर तुम्ही पक्कं धरून ठेवलं, तर त्याद्वारे तुमचं तारण होईल;* नाहीतर, तुमचं विश्वास ठेवणं व्यर्थ ठरेल.
३ कारण, ज्या गोष्टी मला समजल्या, त्यांपैकी मी तुम्हाला शिकवलेली मुख्य गोष्ट ही, की शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला+
४ आणि त्याला पुरण्यात आलं;+ आणि शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे,+ तिसऱ्या दिवशी+ त्याला उठवण्यात आलं.+
५ तो केफाला*+ आणि मग १२ प्रेषितांना दिसला.+
६ त्यानंतर, तो एकाच वेळी पाचशेहून जास्त बांधवांना दिसला.+ त्यांच्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे, तर बहुतेक जण अजूनही आपल्यात आहेत.
७ नंतर, तो याकोबला+ आणि मग सगळ्या प्रेषितांना दिसला.+
८ पण सर्वात शेवटी, अकाली जन्मलेल्यासारखा जो मी, त्या मलासुद्धा तो दिसला.+
९ कारण, प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे. इतकंच काय, तर प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.+
१० पण आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे. आणि त्याने मला दाखवलेली अपार कृपा मुळीच व्यर्थ ठरली नाही. कारण मी इतर सगळ्या प्रेषितांपेक्षा जास्त मेहनत केली; अर्थात, ती मी स्वतःच्या बळावर केली असं नाही, तर माझ्यावर असलेल्या देवाच्या अपार कृपेमुळे केली.
११ तर मग, मी असो किंवा इतर प्रेषित असोत, आम्ही याच प्रकारे प्रचार करतो आणि तुम्हीही याच प्रकारे विश्वास ठेवला.
१२ आता, जर ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला अशी घोषणा केली जात आहे,+ तर मग, मेलेल्यांचं पुनरुत्थान* होणार नाही, असं तुमच्यापैकी काही जण कसं म्हणतात?
१३ जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही.
१४ पण, जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर नक्कीच आपलं प्रचार करणं व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वाससुद्धा व्यर्थ आहे.
१५ तसंच, आपण देवाबद्दल खोटी साक्ष देणारे ठरलो आहोत.+ कारण, देवाने ख्रिस्ताला उठवलं असं बोलून आपण देवाच्या विरोधात साक्ष दिली आहे;+ जर मेलेले लोक खरोखर उठवले जाणार नसतील, तर याचा अर्थ देवाने ख्रिस्तालाही उठवलं नाही.
१६ कारण जर मेलेले उठवले जाणार नाहीत, तर मग ख्रिस्तही उठवला गेला नाही.
१७ आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर तुमच्या विश्वासाला काहीच अर्थ नाही; तुम्ही अजूनही तुमच्या पापांतच आहात.+
१८ तसंच, जे ख्रिस्ती लोक मरण पावले त्यांचासुद्धा कायमचा नाश झाला आहे.+
१९ जर आपण फक्त याच जीवनासाठी ख्रिस्तावर आशा ठेवली असेल, तर आपली सगळ्यांपेक्षा जास्त दयनीय स्थिती आहे.
२० पण, आता ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे; तो मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.+
२१ कारण मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे,+ त्यामुळे पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे होतं.+
२२ कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत,+ त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.+
२३ पण प्रत्येकाला त्याच्या योग्य क्रमाप्रमाणे: ख्रिस्त, जो पहिलं फळ आहे.+ त्यानंतर, जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या उपस्थितीदरम्यान उठवले जातील.+
२४ मग, अंत होईल. त्या वेळी, सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा केल्यावर तो आपल्या देवाला आणि पित्याला राज्य सोपवून देईल.+
२५ कारण देव सर्व शत्रूंना ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवेपर्यंत ख्रिस्ताने राजा म्हणून राज्य केलं पाहिजे.+
२६ आणि शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल.+
२७ कारण देवाने, “सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून त्याच्या पायांखाली ठेवल्या आहेत.”+ ‘सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून,’+ असं जे तो म्हणतो त्यावरून स्पष्टच आहे, की ज्याने सर्व गोष्टी मुलाच्या अधीन केल्या, तो स्वतः त्याच्या अधीन नाही.+
२८ पण सगळ्या गोष्टी मुलाच्या अधीन केल्या जातील, तेव्हा ज्याने सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन केल्या, त्याला मुलगाही अधीन होईल.+ हे यासाठी, की देवाने सगळ्यांसाठी सर्वकाही व्हावं.+
२९ मग, मृत्यूसाठी बाप्तिस्मा घेणाऱ्यांचं काय?+ जर मेलेल्यांचं पुनरुत्थानच होणार नसेल, तर ते मृत्यूसाठी बाप्तिस्मा तरी का घेतात?
३० आणि आपणसुद्धा नेहमी* आपला जीव धोक्यात का घालतो?+
३१ बांधवांनो, मी तर दररोज मृत्यूचा सामना करतो. आपला प्रभू ख्रिस्त येशू याच्यामध्ये मला तुमच्याबद्दल असलेल्या अभिमानावरून, मी हे खातरीने सांगतो.
३२ इतर माणसांप्रमाणे* जर मीसुद्धा इफिसमध्ये हिंस्र प्राण्यांशी लढलो असेन,+ तर त्याचा मला काय फायदा? जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर “चला, आपण खाऊ-पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे.”+
३३ फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.*+
३४ शुद्धीवर या आणि चांगली कामं करा; पाप करत राहू नका. कारण काहींना देवाबद्दल जराही ज्ञान नाही. तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे.
३५ पण, कोणी म्हणेल: “मेलेल्यांना कसं उठवलं जाईल? ते कोणत्या प्रकारच्या शरीराने उठतील?”+
३६ अरे मूर्ख माणसा! तू जे काही पेरतोस ते जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत जिवंत केलं जात नाही.
३७ आणि तू जे पेरतोस ते वाढलेलं रोपटं नाही, तर फक्त बी असतं; मग, ते गव्हाचं बी असेल किंवा दुसरं एखादं बी.
३८ पण, देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो त्याला वाढवतो आणि प्रत्येक बी वाढतं तेव्हा ते वेगवेगळं असतं.
३९ सगळीच शरीरं एकसारखी नसतात. माणसांचं शरीर एक प्रकारचं असतं, तर प्राण्यांचं शरीर दुसऱ्या प्रकारचं; पक्ष्यांचं शरीर एक प्रकारचं असतं, तर माशांचं शरीर दुसऱ्या प्रकारचं.
४० तसंच, जे स्वर्गात आहेत त्यांचं शरीर+ पृथ्वीवर राहणाऱ्यांपेक्षा+ वेगळं असतं; स्वर्गात असलेल्यांच्या शरीराचं तेज एक प्रकारचं, तर पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या शरीराचं तेज दुसऱ्या प्रकारचं असतं.
४१ सूर्याचं तेज एक प्रकारचं आहे, तर चंद्राचं तेज एक प्रकारचं+ आणि ताऱ्यांचं तेज आणखी वेगळ्या प्रकारचं. खरंतर, प्रत्येक ताऱ्याचं तेज दुसऱ्या ताऱ्याच्या तेजापेक्षा वेगळं असतं.
४२ मेलेल्यांच्या पुनरुत्थानाच्या बाबतीतसुद्धा हेच खरं आहे. शरीर नाशवंत स्थितीत पेरलं जातं आणि अविनाशीपणात उठवलं जातं.+
४३ ते अपमानात पेरलं जातं आणि गौरवात उठवलं जातं.+ ते अशक्तपणात पेरलं जातं आणि सामर्थ्यात उठवलं जातं.+
४४ ते हाडामांसाचं शरीर म्हणून पेरलं जातं आणि अदृश्य शरीर म्हणून उठवलं जातं. जसं हाडामांसाचं शरीर असतं, तसं अदृश्य शरीरसुद्धा असतं.
४५ म्हणून असं लिहिलं आहे: “पहिला माणूस आदाम हा जिवंत प्राणी बनला.”+ शेवटला आदाम जीवन देणारा अदृश्य प्राणी बनला.+
४६ पण, पहिलं शरीर अदृश्य नाही. पहिलं शरीर हाडामांसाचं आणि त्यानंतर अदृश्य शरीर आहे.
४७ पहिला माणूस पृथ्वीवरचा आहे आणि त्याला मातीपासून बनवण्यात आलं;+ तर दुसरा माणूस स्वर्गातून आहे.+
४८ या जगातले लोक, देवाने ज्याला मातीपासून बनवलं त्याच्यासारखे आहेत; आणि स्वर्गात असणारे, जो स्वर्गातून आला त्याच्यासारखे आहेत.+
४९ ज्याप्रमाणे आपण मातीपासून बनवलेल्याच्या स्वरूपात आहोत,+ त्याचप्रमाणे आपण स्वर्गातून आलेल्याच्या स्वरूपात असू.+
५० पण बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की मांस आणि रक्त देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही; तसंच, जे नाशवंत आहे त्याला अविनाशीपण मिळू शकत नाही.
५१ पाहा! मी तुम्हाला एक पवित्र रहस्य सांगतो: आपण सगळेच मृत्यूची झोप घेणार नाही, तर आपण सगळे बदलून जाऊ.+
५२ शेवटचा कर्णा वाजण्याच्या वेळी, एका क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आपण बदलून जाऊ. कारण कर्णा वाजेल+ आणि जे मेलेले आहेत ते अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
५३ कारण हे जे नाशवंत शरीर आहे, ते अविनाशीपण धारण करेल+ आणि हे जे मरण पावणारं शरीर आहे, ते अमरत्व धारण करेल.+
५४ पण जेव्हा हे नाशवंत शरीर, अविनाशीपण धारण करेल आणि हे मरणारं शरीर अमरत्व धारण करेल, तेव्हा शास्त्रवचनांतले हे शब्द पूर्ण होतील: “मृत्यूला कायमचं गिळून टाकण्यात आलं आहे.”+
५५ “अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी* कुठे आहे?”+
५६ मरण आणणारी नांगी* म्हणजे पाप,+ आणि पापाचं बळ* नियमशास्त्र आहे.+
५७ पण, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आपल्याला विजय देतो याबद्दल त्याचे आभार!+
५८ म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर+ आणि स्थिर राहा; आणि प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.+ कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही,+ हे तुम्हाला माहीत आहे.
तळटीपा
^ किंवा “तुम्हाला वाचवलं जाईल.”
^ याला पेत्र असंही म्हणतात.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सतत.”
^ किंवा कदाचित, “माणसाच्या दृष्टिकोनाने.”
^ किंवा “नीती बिघडते.”
^ किंवा “तुझा डंख.”
^ किंवा “आणणारा डंख.”
^ किंवा “जे पापाला बळ देतं ते.”