करिंथकर यांना पहिलं पत्र ३:१-२३
३ बांधवांनो, देवासारखी विचारसरणी असलेल्या* माणसांशी+ बोलावं तसं मी तुमच्याशी बोलू शकलो नाही, तर जगाच्या विचारसरणीच्या* माणसांशी, ख्रिस्तामध्ये तान्ह्या मुलांशी+ बोलावं तसं मला तुमच्याशी बोलावं लागलं.
२ मी तुम्हाला जड अन्न दिलं नाही, तर दूध पाजलं. कारण जड अन्न पचवण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती नव्हती. खरंतर अजूनही नाही,+
३ कारण अजूनही तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी आहे.+ तुमच्यामध्ये हेवेदावे आणि भांडणतंटे आहेत, याचाच अर्थ तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी नाही का?+ आणि तुम्ही माणसांप्रमाणेच चालत नाही का?
४ कारण तुमच्यापैकी एक जण म्हणतो “मी पौलचा,” तर दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा.”+ याचा अर्थ तुम्ही सर्वसाधारण माणसांसारखंच वागत आहात की नाही?
५ शेवटी, अपुल्लो कोण आहे? आणि पौल तरी कोण आहे? प्रभूने प्रत्येकाला सोपवलेलं कार्य करणारे हे सेवक+ आहेत. त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला.
६ मी पेरलं,+ अपुल्लोने पाणी घातलं,+ पण देव वाढवत राहिला.
७ म्हणून, पेरणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे.+
८ आता, पेरणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहेत,* पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.+
९ कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचं असं शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे. तुम्ही देवाची अशी इमारत आहात, जिचं तो बांधकाम करत आहे.+
१० माझ्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेमुळे, मी बांधकाम करणाऱ्या एका कुशल कारागिराप्रमाणे पाया घातला.+ त्यावर बांधकाम मात्र दुसरा कोणीतरी करत आहे. पण आपण पायावर कसं बांधकाम करत आहोत, याकडे प्रत्येकाने सतत लक्ष दिलं पाहिजे.
११ कारण जो पाया आधीच घालण्यात आला आहे, म्हणजेच येशू ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा पाया कोणीही घालू शकत नाही.+
१२ यावर कोणी सोनं, चांदी आणि रत्नं वापरून, तर कोणी लाकूड, सुकलेलं गवत किंवा भुसा वापरून बांधकाम करतो.
१३ पण प्रत्येकाने कशा प्रकारचं काम केलं आहे हे परीक्षेच्या दिवशी उघड होईल. कारण अग्नीद्वारे हे प्रकट केलं जाईल+ आणि प्रत्येकाचं काम कसं आहे हे सिद्ध होईल.
१४ एखाद्याने पायावर केलेलं बांधकाम टिकून राहिलं, तर त्याला प्रतिफळ मिळेल.
१५ पण एखाद्याने केलेलं बांधकाम जळून गेलं, तर त्याचं नुकसान होईल. तो स्वतः तर वाचेल, पण ते आगीतून कसंबसं वाचण्यासारखं ठरेल.
१६ तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहात+ आणि देवाची पवित्र शक्ती तुमच्यामध्ये राहते, हे तुम्हाला माहीत नाही का?+
१७ जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करेल. कारण देवाचं मंदिर पवित्र आहे आणि तुम्हीच ते मंदिर आहात.+
१८ तुमच्यापैकी कोणीही स्वतःला फसवू नका. या जगाच्या व्यवस्थेत* आपण बुद्धिमान आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने मूर्ख व्हावं, म्हणजे तो बुद्धिमान होईल.
१९ कारण या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असं लिहिलं आहे: “तो बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो.”+
२० आणि असंही लिहिलं आहे: “बुद्धिमानांचे तर्क व्यर्थ आहेत हे यहोवाला* माहीत आहे.”+
२१ म्हणून कोणीही माणसांबद्दल बढाई मारू नये. कारण सर्वकाही तुमचंच आहे,
२२ पौल असो, अपुल्लो असो किंवा केफा*+ असो, किंवा हे जग, जीवन किंवा मृत्यू किंवा सध्याच्या गोष्टी किंवा भविष्यातल्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचंच आहे;
२३ आणि तुम्ही ख्रिस्ताचे,+ तर ख्रिस्त देवाचा आहे.
तळटीपा
^ किंवा “देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे विचार करणाऱ्या.”
^ शब्दशः “शारीरिक.”
^ किंवा “यांचा हेतू एकच आहे.”
^ किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
^ याला पेत्र असंही म्हणतात.