करिंथकर यांना पहिलं पत्र ४:१-२१

  • कारभाऱ्‍यांनी विश्‍वासू असलं पाहिजे (१-५)

  • ख्रिस्ती सेवकांची नम्रता (६-१३)

    • लिहिलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका ()

    • ख्रिस्ती हे जाहीर प्रदर्शनाप्रमाणे ()

  • पौलला विश्‍वासातल्या आपल्या मुलांची काळजी (१४-२१)

 प्रत्येकाने आम्हाला ख्रिस्ताचे सेवक* आणि देवाच्या पवित्र रहस्यांचे कारभारी समजावं.+ २  आणि कारभाऱ्‍यांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी विश्‍वासू असावं. ३  तुम्ही किंवा कोणा मानवी न्यायाधीशाने* माझा न्याय केला, तर या गोष्टीला मी अगदी क्षुल्लक समजतो. खरंतर, मी स्वतःसुद्धा आपला न्याय करत नाही. ४  कारण मी काही वाईट केलं आहे असं मला तरी वाटत नाही. पण फक्‍त या कारणामुळे मी नीतिमान ठरत नाही, कारण माझा न्याय करणारा यहोवा* आहे.+ ५  म्हणून नेमलेली वेळ येईपर्यंत, म्हणजे प्रभू येईपर्यंत कशाचाही न्याय करू नका.+ तो अंधारातल्या गुप्त गोष्टी उजेडात आणेल आणि माणसाच्या हृदयातले हेतू प्रकट करेल. आणि मग ज्याला त्याला आपल्या योग्यतेप्रमाणे देवाकडून शाबासकी मिळेल.+ ६  आता बांधवांनो, मी तुमच्या भल्यासाठी स्वतःचं आणि अपुल्लोचं+ उदाहरण देऊन या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे आमच्या उदाहरणावरून तुम्ही हा नियम पाळायला शिकाल: “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.” हे यासाठी, की तुम्ही गर्वाने फुगू नये+ आणि कोणाचा पक्षपात करू नये. ७  कारण तुमच्यामध्ये विशेष असं काय आहे? खरंतर, तुमच्याजवळ असं काय आहे, जे तुम्हाला देण्यात आलेलं नाही?+ मग, जर तुम्हाला ते देण्यात आलं आहे, तर तुम्ही ते स्वतःच्या बळावर मिळवल्यासारखी बढाई का मारता? ८  तुम्ही आधीच तृप्त झाला आहात का? तुम्ही आधीच श्रीमंत झाला आहात का? आमच्याशिवायच तुम्ही राजे म्हणून राज्य करू लागला आहात का?+ मला तर मनापासून वाटतं, की तुम्ही राजे म्हणून राज्य करायला लागला असता तर बरं झालं असतं. कारण मग तुमच्यासोबत आम्हीही राजे म्हणून राज्य केलं असतं.+ ९  मला तर वाटतं, की देवाने आम्हा प्रेषितांना, मृत्युदंडासाठी पात्र ठरवलेली माणसं या नात्याने अगदी शेवटी लोकांसमोर आणलं आहे.+ कारण आम्ही जगासमोर, तसंच स्वर्गदूतांसमोर आणि माणसांसमोर जाहीर प्रदर्शनासारखे झालो आहोत.+ १०  आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख,+ तर तुम्ही ख्रिस्तामध्ये बुद्धिमान आहात. आम्ही अशक्‍त, तर तुम्ही सशक्‍त आहात. तुमचा आदर, तर आमचा अनादर केला जातो. ११  अगदी या वेळेपर्यंत, आम्ही भुकेले+ आणि तहानलेले आहोत.+ आमच्या अंगावर नीट कपडे नाहीत.* आम्हाला मारहाण होत आहे*+ आणि आम्ही बेघर आहोत. १२  आम्ही मेहनत करतो आणि आमच्या हातांनी कष्ट करतो.+ आमचा अपमान केला जातो तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो.+ आमचा छळ होतो, तेव्हा आम्ही धीराने तो सहन करतो.+ १३  आमच्यावर खोटे आरोप केले जातात, तेव्हा आम्ही सौम्यपणे उत्तर देतो.*+ आजही, आम्हाला जगात केरकचरा* आणि गाळ समजलं जातं. १४  मी या गोष्टी तुम्हाला लाजवण्यासाठी नाही, तर माझी प्रिय मुलं म्हणून तुम्हाला सल्ला देण्यासाठी लिहीत आहे. १५  कारण ख्रिस्तामध्ये तुमचे १०,००० रक्षक* असले, तरी तुमचे पुष्कळ बाप नक्कीच नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये आनंदाच्या संदेशाद्वारे मी तुमचा बाप बनलो आहे.+ १६  म्हणून मी तुम्हाला असा आग्रह करतो की तुम्ही माझं अनुकरण करा.+ १७  यासाठीच मी तीमथ्यला तुमच्याकडे पाठवत आहे. कारण प्रभूमध्ये ते माझं प्रिय आणि विश्‍वासू लेकरू आहे. ख्रिस्त येशूच्या सेवेत माझ्या काम करायच्या पद्धतींची* तो तुम्हाला आठवण करून देईल.+ याच पद्धतींबद्दल मी सर्व ठिकाणी, प्रत्येक मंडळीत शिकवत आहे. १८  मी तुमच्याकडे येणारच नाही, असं समजून काही जण गर्वाने फुगले आहेत. १९  पण यहोवाची* इच्छा असेल, तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. तेव्हा मी या गर्वाने फुगलेल्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही, तर त्यांच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे की नाही हे पाहीन. २०  कारण देवाचं राज्य हे बोलण्यातून नाही, तर देवाच्या सामर्थ्यातून दिसून येतं. २१  मी तुमच्याकडे छडी घेऊन आलेलं तुम्हाला आवडेल,+ की प्रेमाने आणि सौम्यतेने आलेलं आवडेल?

तळटीपा

किंवा “ख्रिस्ताच्या हाताखालचे.”
किंवा “न्यायालयाने.”
अति. क५ पाहा.
किंवा “ठोसे मारले जात आहेत.”
शब्दशः “आम्ही उघडेवाघडे आहोत.”
शब्दशः “विनवणी करतो.”
किंवा “टाकाऊ माल.”
किंवा “शिक्षक.”
शब्दशः “माझ्या मार्गांची.”
अति. क५ पाहा.