थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र १:१-१०
१ पौल, सिल्वान*+ आणि तीमथ्य+ यांच्याकडून, देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्यासोबत ऐक्यात असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला:
तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
२ आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हा सर्वांचा उल्लेख करून नेहमी देवाचे आभार मानतो.+
३ कारण तुम्ही विश्वासूपणे जे कार्य केलं आणि प्रेमळपणे जे परिश्रम घेतले; तसंच, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या तुमच्या आशेमुळे तुम्ही जो धीर धरला,+ त्याची आम्ही सतत आपला देव आणि पिता याच्यासमोर आठवण करतो.
४ देवाला प्रिय असलेल्या आमच्या बांधवांनो, त्याने तुम्हाला निवडलं आहे हे आम्हाला माहीत आहे.
५ कारण आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश हा तुम्हाला फक्त शब्दांनीच देण्यात आला नाही, तर सामर्थ्याने आणि पवित्र शक्तीने* आणि पूर्ण खातरीने देण्यात आला. आणि तुमच्यामध्ये असताना आम्ही तुमच्यासाठी कशा प्रकारे काम केलं, हे तर तुम्हाला माहीतच आहे.
६ तुम्ही आमचं आणि प्रभूचं अनुकरण करणारे झाला,+ कारण बऱ्याच संकटांत असतानाही+ तुम्ही पवित्र शक्तीद्वारे मिळणाऱ्या आनंदाने वचन स्वीकारलं
७ आणि असं केल्यामुळे तुम्ही मासेदोनिया आणि अखया इथे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी उदाहरण बनला.
८ खरंतर, तुमच्यामुळे संपूर्ण मासेदोनिया आणि अखयात लोकांना यहोवाचं* वचन ऐकायला मिळालं. पण त्यासोबतच तुमच्या विश्वासाबद्दल सर्व ठिकाणी चर्चा होत आहे,+ आणि यामुळे आम्ही काही वेगळं सांगायची गरज नाही.
९ कारण तिथले लोक स्वतःच हे सांगतात, की कशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटलो आणि कशा प्रकारे तुम्ही आपल्या मूर्तींना सोडून देवाकडे वळला.+ हे यासाठी, की तुम्ही एका जिवंत आणि खऱ्या देवाची सेवा करावी;
१० आणि त्याचा मुलगा, येशू, ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवलं आणि जो येणाऱ्या क्रोधापासून आपल्याला वाचवेल,+ तो स्वर्गातून यायची वाट पाहावी.+