पेत्र याचं पहिलं पत्र १:१-२५
१ येशू ख्रिस्ताचा प्रेषित, पेत्र+ याच्याकडून पंत, गलतीया, कप्पदुकिया,+ आशिया आणि बिथुनिया या प्रांतांत विखुरलेल्या, तात्पुरत्या रहिवाशांना आणि निवडलेल्यांना;
२ अर्थात देव जो पिता, याने ज्यांना त्याच्या पवित्र शक्तीद्वारे* शुद्ध करून+ आपल्या पूर्वज्ञानाप्रमाणे निवडलं होतं,+ यासाठी की त्यांनी आज्ञाधारक व्हावं आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताचं रक्त शिंपडलं जावं,+ अशांना:
तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा आणि शांतीचा वर्षाव होत राहो.
३ जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे, त्याची स्तुती असो. कारण त्याच्या महान दयेप्रमाणे त्याने येशू ख्रिस्ताचं मेलेल्यांतून पुनरुत्थान* करण्याद्वारे+ एका जिवंत आशेसाठी+ आपल्याला नवीन जन्म दिला आहे.+
४ हे यासाठी, की आपल्याला एक अविनाशी आणि निष्कलंक असा वारसा मिळावा,+ जो कधीही नाहीसा होणार नाही. हा वारसा तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवला आहे.+
५ तुमच्या विश्वासामुळे देव त्याच्या सामर्थ्याद्वारे तारणासाठी तुमचं रक्षण करत आहे. हे तारण शेवटच्या काळात प्रकट केलं जाईल.
६ याच कारणामुळे तुम्ही खूप आनंदी आहात. तरीसुद्धा, थोड्या काळासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणं आवश्यक आहे.+
७ हे यासाठी, की येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी+ तुमच्या पारखलेल्या विश्वासामुळे+ तुम्हाला प्रशंसा, गौरव आणि सन्मान मिळावा. तुमचा हा विश्वास आगीत परीक्षा झाल्यावरही* नष्ट होणाऱ्या सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे.
८ तुम्ही ख्रिस्ताला कधीच पाहिलेलं नसूनही तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. आता जरी तुम्हाला तो दिसत नसला, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि खूप आनंदित आहात. तुमचा हा आनंद अद्भुत आहे आणि त्याचं वर्णन करता येणार नाही.
९ कारण तुम्हाला खातरी आहे, की तुमच्या विश्वासामुळे तुम्हाला तारणाचं प्रतिफळ मिळेल.*+
१० तुमच्यासाठी असलेल्या अपार कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली होती, त्यांनी या तारणाबद्दल कसून चौकशी केली आणि बारकाईने शोध घेतला.+
११ त्यांच्यामध्ये असलेली देवाची पवित्र शक्ती ख्रिस्ताबद्दल कोणत्या विशिष्ट काळाकडे किंवा समयाकडे संकेत करत आहे, याबद्दल ते तपासून पाहत राहिले.+ कारण, ख्रिस्ताला कोणकोणती दुःखं सहन करावी लागतील+ आणि त्यानंतर त्याचा कशा प्रकारे गौरव केला जाईल, याबद्दल पवित्र शक्तीने त्यांना आधीच साक्ष दिली होती.
१२ ते स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी सेवा करत आहेत, ही गोष्ट त्यांना प्रकट करण्यात आली होती. आणि स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र शक्तीद्वारे ज्यांनी आता तुम्हाला आनंदाचा संदेश सांगितला आहे, त्यांनी याबद्दलचंच वचन तुम्हाला घोषित केलं.+ खरंतर, या गोष्टी समजून घेण्यासाठी* स्वर्गदूतही खूप उत्सुक आहेत.
१३ म्हणून, तुम्ही उत्साहाने काम करण्यासाठी आपलं मन सज्ज करा+ आणि पूर्णपणे सावध राहा.+ येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी जी अपार कृपा तुम्हाला मिळणार आहे, तिच्यावर आशा ठेवा.
१४ आता तुम्ही देवाची आज्ञाधारक मुलं आहात. म्हणून त्याच्याबद्दलचं ज्ञान नसताना, पूर्वी तुमच्यात ज्या वाईट इच्छा होत्या त्यांप्रमाणे वागायचं सोडून द्या.
१५ याउलट, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.+
१६ कारण असं लिहिलं आहे: “तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे.”+
१७ जो भेदभाव न करता, ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करतो,+ त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारत असाल, तर मग तात्पुरते रहिवासी म्हणून या जगात राहत असताना त्याची भीती बाळगून चाला.+
१८ कारण तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून* चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोनं किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही.*+
१९ तर, एका निष्कलंक आणि निर्दोष कोकऱ्याच्या,+ म्हणजेच ख्रिस्ताच्या+ मौल्यवान रक्ताने+ तुमची सुटका करण्यात आली आहे.
२० हे खरं आहे, की देवाने आपल्या पूर्वज्ञानाप्रमाणे त्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलं होतं,+ पण तुमच्यासाठी त्याला काळाच्या शेवटी प्रकट करण्यात आलं.+
२१ त्याच्याद्वारेच तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे झाला.+ देवाने मेलेल्यांतून उठवून+ त्याचा गौरव केला.+ हे यासाठी, की तुम्ही देवावर विश्वास आणि आशा ठेवावी.
२२ तुम्ही सत्याचं पालन करण्याद्वारे स्वतःला शुद्ध केलं आहे. आणि यामुळे तुम्ही निष्कपट मनाने बंधुप्रेम दाखवता.+ म्हणून, आता एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.+
२३ कारण तुम्हाला नाश होणाऱ्या बीजाद्वारे नाही, तर अविनाशी बीजाद्वारे,*+ म्हणजेच जिवंत आणि अनंत देवाच्या वचनाद्वारे+ नवीन जन्म देण्यात आला आहे.+
२४ कारण, “सर्व मानव हे गवतासारखे आहेत आणि त्यांचं वैभव रानातल्या फुलासारखं आहे; गवत कोमेजून जातं आणि फूल गळून पडतं,
२५ पण यहोवाचं* वचन सर्वकाळ टिकतं.”+ हे “वचन” म्हणजेच तुम्हाला सांगण्यात आलेला आनंदाचा संदेश आहे.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “शुद्ध केल्यावरही.”
^ किंवा “तुमचा जीव वाचवला जाईल.”
^ शब्दशः “गोष्टींत डोकावून पाहण्यासाठी.”
^ किंवा “परंपरेनुसार.”
^ शब्दशः “तुम्हाला खंडणी देऊन सोडवण्यात आलेलं नाही.”
^ म्हणजे, प्रजोत्पादन किंवा फळ उत्पन्न करू शकणारं बीज.