पेत्र याचं पहिलं पत्र ४:१-१९

  • ख्रिस्ताप्रमाणेच देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगा (१-६)

  • सर्व गोष्टींचा शेवट जवळ (७-११)

  • ख्रिस्ती म्हणून दुःख सोसणं (१२-१९)

 ख्रिस्ताने शरीरात दुःख सोसलं,+ त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यासारखीच मनोवृत्ती* ठेवायला तयार असा, कारण जो शरीरात दुःख सोसतो त्याने पाप करायचं सोडून दिलं आहे.+ २  हे यासाठी, की त्याने आपल्या उरलेल्या आयुष्यात माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही,+ तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगावं.+ ३  कारण जगाच्या लोकांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला.+ कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन* करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसंच प्रमाणाबाहेर पिणं, बेलगाम मौजमस्ती,* दारूबाजी* आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता.+ ४  पण, आता तुम्ही त्यांच्यासोबत या अनैतिकतेच्या चिखलात लोळायचं सोडून दिलं असल्यामुळे, ते गोंधळात पडले आहेत आणि त्यामुळे ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात.+ ५  पण या लोकांना, जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तयार आहे, त्याला हिशोब द्यावा लागेल.+ ६  खरंतर याच कारणामुळे आनंदाचा संदेश मेलेल्यांनाही घोषित करण्यात आला.+ हे यासाठी, की जरी सर्व माणसांप्रमाणेच त्यांचाही न्याय करण्यात आला, तरी त्यांनी देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मार्गदर्शनाप्रमाणे जगावं. ७  पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. म्हणून समंजस* असा+ आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत सतर्क* राहा.+ ८  पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा,+ कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.+ ९  कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.+ १०  आपण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त होणारी देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत.+ त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात दान मिळालं आहे, त्याप्रमाणे त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावं. ११  जर कोणी बोलत असेल, तर त्याने देवाची वचनं बोलत असल्याप्रमाणे बोलावं; जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी.+ यामुळे सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव होईल.+ गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन. १२  प्रिय बांधवांनो, तुमच्यावर येत असलेल्या अग्निपरीक्षांचं आश्‍चर्य वाटू देऊ नका.+ तुमच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडत आहे असा विचार करू नका. १३  उलट, तुम्हीसुद्धा ख्रिस्तासारखी दुःखं सहन करत आहात,+ म्हणून आनंद करा.+ यामुळे जेव्हा त्याचा गौरव प्रकट होईल, तेव्हाही तुम्ही खूप आनंदी व्हाल.+ १४  ख्रिस्ताच्या नावासाठी तुमची निंदा* होत असेल, तर तुम्ही सुखी आहात+ कारण देवाची गौरवशाली पवित्र शक्‍ती तुमच्यावर आहे. १५  पण तुमच्यापैकी कोणालाही खुनी, चोर, अपराधी किंवा इतरांच्या कारभारांत लुडबुड करणारा म्हणून दुःख भोगावं लागू नये.+ १६  पण ख्रिस्ती म्हणून जर एखाद्याला दुःख सोसावं लागलं तर त्याला याबद्दल लाज वाटायचं कारण नाही.+ उलट, त्याने या नावाने ओळखलं जात असताना देवाचा गौरव करत राहावा. १७  देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होण्याची ठरवलेली वेळ आली आहे.+ आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून होणार आहे,+ तर मग जे देवाबद्दलच्या आनंदाच्या संदेशाप्रमाणे चालत नाहीत, त्यांचं काय होईल?+ १८  “शिवाय, जर नीतिमानाचं तारण* मुश्‍कीलीने होत असेल तर मग जो अधार्मिक आणि पापी आहे, त्याचं काय होईल?”+ १९  म्हणूनच, देवाच्या इच्छेप्रमाणे दुःखं सोसणाऱ्‍यांनी स्वतःला विश्‍वासू निर्माणकर्त्याच्या हाती सोपवून द्यावं आणि चांगलं ते करत राहावं.+

तळटीपा

किंवा “त्याच्यासारखाच निर्धार; निश्‍चय.”
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “रंगेल पार्ट्या.”
किंवा “पिण्याच्या शर्यती लावणं.”
शब्दशः “निरोगी मनाचे.”
किंवा “सावध; जागे.”
किंवा “अपमान.”
किंवा “वाचवलं जाणं.”