योहान याचं पहिलं पत्र ४:१-२१

  • प्रेरित संदेशाची पारख करणं (१-६)

  • देवाला ओळखणं आणि त्याच्यावर प्रेम करणं (७-१२)

    • “देव प्रेम आहे” (, १६)

    • प्रेमात भीती नसते (१८)

 प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्‍वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+ २  देवापासून असलेला प्रेरित संदेश तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता: जो संदेश हे मान्य करतो, की ख्रिस्त माणूस* म्हणून आला तो देवापासून आहे.+ ३  पण, जो संदेश येशूला मान्य करत नाही तो देवापासून नाही;+ तर, जो ख्रिस्तविरोधी आहे, त्याच्यापासून हा संदेश आहे. हा संदेश येणार असल्याचं तुम्ही ऐकलं होतं+ आणि आता तो जगात आहे.+ ४  मुलांनो, तुम्ही देवापासून आहात आणि तुम्ही त्या खोट्या संदेष्ट्यांवर विजय मिळवला आहे.+ कारण जो तुमच्यासोबत ऐक्यात आहे,+ तो जगासोबत ऐक्यात असणाऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ आहे.+ ५  ते जगापासून आहेत;+ म्हणूनच ज्या गोष्टी जगापासून आहेत त्यांबद्दल ते बोलतात आणि जग त्यांचं ऐकतं.+ ६  आपण मात्र देवापासून आहोत. ज्याला देवाची ओळख झाली आहे, तो आपलं ऐकतो;+ पण जो देवापासून नाही, तो आपलं ऐकत नाही.+ यावरूनच आपण सत्याचा संदेश आणि खोटेपणाचा संदेश यांतला फरक ओळखू शकतो.+ ७  प्रिय बांधवांनो, आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या,+ कारण प्रेम देवापासून आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.+ ८  जो प्रेम करत नाही, त्याला देवाची ओळख झालेली नाही, कारण देव प्रेम आहे.*+ ९  देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं.+ हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.+ १०  आपण देवावर प्रेम केलं असं नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केलं. आणि त्याच्यासोबत आपला समेट होण्याकरता, आपल्या पापांसाठी प्रायश्‍चित्ताचं बलिदान म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवलं.+ ११  प्रिय बांधवांनो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रेम केलं, तर आपलंही एकमेकांवर प्रेम करण्याचं कर्तव्य आहे.+ १२  देवाला कधीही कोणी पाहिलेलं नाही.+ पण, आपण एकमेकांवर प्रेम करत राहिलो, तर देव आपल्यामध्ये राहतो आणि त्याचं प्रेम आपल्यामध्ये परिपूर्ण होतं.+ १३  त्याने आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती* दिली आहे, यावरून आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये ऐक्यात राहतो हे आपल्याला समजतं. १४  तसंच, पित्याने आपल्या मुलाला जगाचा तारणकर्ता म्हणून पाठवल्याचं आपण स्वतः पाहिलं आहे आणि त्याबद्दल आपण साक्ष देत आहोत.+ १५  जो कोणी येशूला, देवाचा मुलगा म्हणून मान्य करतो,+ त्याच्यासोबत देव ऐक्यात राहतो आणि तो देवासोबत ऐक्यात राहतो.+ १६  देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम आपण ओळखलं आहे आणि त्यावर आपण विश्‍वासही ठेवतो.+ देव प्रेम आहे,+ आणि जो कोणी प्रेमात टिकून राहतो तो देवासोबत आणि देव त्याच्यासोबत ऐक्यात राहतो.+ १७  अशा रितीने आपल्यामध्ये प्रेम परिपूर्ण करण्यात आलं आहे. हे यासाठी, की न्यायाच्या दिवशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य असावं;*+ कारण या जगात आपलं जीवन त्याच्या* जीवनासारखंच आहे. १८  प्रेमामध्ये भीती नसते,+ उलट परिपूर्ण प्रेम भीती घालवून देतं, कारण भीती आपल्यावर बंधन घालते. खरोखर, ज्याला भीती आहे त्याच्यामध्ये प्रेम परिपूर्ण झालेलं नाही.+ १९  आधी त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण प्रेम करतो.+ २०  जो कोणी असं म्हणतो, की “मी देवावर प्रेम करतो,” पण आपल्या भावाचा द्वेष करतो तो खोटं बोलतो.+ कारण ज्याला त्याने पाहिलं आहे त्या भावावर जर तो प्रेम करत नाही,+ तर न पाहिलेल्या देवावर तो प्रेम करूच शकत नाही.+ २१  आणि त्याने तर आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.+

तळटीपा

शब्दशः “देहात.”
म्हणजे, प्रेमाचा उगम आहे.
किंवा “आत्मविश्‍वास असावा.”
म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या.