योहान याचं पहिलं पत्र ५:१-२१
५ येशू हा ख्रिस्त आहे यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण देवापासून जन्मलेला आहे.+ आणि जो जन्म देणाऱ्यावर प्रेम करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यांवरही प्रेम करतो.
२ जेव्हा आपण देवावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपल्याला समजतं, की देवाच्या मुलांवर आपलं प्रेम आहे.+
३ कारण देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करावं+ आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.+
४ जो कोणी* देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो.+ आणि ज्याद्वारे आपण जगावर विजय मिळवला आहे, तो म्हणजे आपला विश्वास.+
५ जगावर विजय कोण मिळवू शकतो?+ तोच नाही का, जो येशू हा देवाचा मुलगा आहे असा विश्वास बाळगतो?+
६ जो पाण्याद्वारे आणि रक्ताद्वारे आला तो हाच आहे, म्हणजे येशू ख्रिस्त; तो फक्त पाण्यासोबत नाही,+ तर पाण्यासोबत आणि रक्तासोबत आला.+ आणि पवित्र शक्ती* याबद्दल साक्ष देत आहे,+ कारण पवित्र शक्ती सत्य प्रकट करते.*
७ साक्ष देणाऱ्या तीन गोष्टी आहेत:
८ पवित्र शक्ती,+ पाणी+ आणि रक्त;+ आणि या तिन्ही गोष्टींची साक्ष सारखीच आहे.
९ जर आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, तर तिच्या तुलनेत देवाची साक्ष कितीतरी महान आहे. कारण देव स्वतः आपल्या मुलाबद्दल साक्ष देतो.
१० जो देवाच्या मुलावर विश्वास ठेवतो तो देवाने दिलेली साक्ष मनापासून स्वीकारतो. पण, जो देवावर विश्वास ठेवत नाही, त्याने त्याला खोटं ठरवलं आहे,+ कारण देवाने आपल्या मुलाबद्दल दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
११ आणि देवाने दिलेली साक्ष हीच आहे, की त्याने आपल्याला सर्वकाळाचं जीवन दिलं+ आणि हे जीवन त्याच्या मुलामध्ये आहे.+
१२ जो मुलाला स्वीकारतो, त्याच्याजवळ हे जीवन आहे; पण, जो देवाच्या मुलाला स्वीकारत नाही, त्याच्याजवळ हे जीवन नाही.+
१३ मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहितो, की तुमच्याजवळ सर्वकाळाचं जीवन आहे, हे तुम्हाला कळावं.+ कारण तुम्ही देवाच्या मुलाच्या नावावर विश्वास ठेवता.+
१४ आणि देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे,*+ की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.+
१५ आणि आपण काहीही मागितलं तरी तो आपलं ऐकतो, हे जर आपल्याला माहीत आहे, तर आपण जे मागितलं ते आपल्याला मिळेल हेही आपल्याला माहीत आहे, कारण आपण त्याच्याजवळ ते मागितलं आहे.+
१६ ज्याची शिक्षा मरण नाही, असं पाप करताना जर कोणी आपल्या भावाला पाहिलं, तर तो देवाकडे विनंती करेल आणि देव त्याला जीवन देईल.+ हो, ज्याची शिक्षा मरण नाही असं पाप करणाऱ्याला तो ते देईल. पण, असंही एक पाप आहे, ज्याची शिक्षा मरण आहे.+ आणि अशा पापाबद्दल विनंती करायला मी त्याला सांगत नाही.
१७ खरंतर, सर्व प्रकारची अनीती पापच आहे.+ पण, तरीसुद्धा असं एक पाप आहे, ज्याची शिक्षा मरण नाही.
१८ आपल्याला माहीत आहे, की देवापासून जन्मलेला कोणीही पाप करत राहत नाही. तर जो देवापासून जन्मला तो* त्याचं रक्षण करतो आणि त्यामुळे सैतान* त्याला हातही लावू शकत नाही.+
१९ आपण देवापासून आहोत हे आपल्याला माहीत आहे, पण सगळं जग सैतानाच्या* नियंत्रणात आहे.+
२० आपल्याला माहीत आहे, की देवाचा मुलगा आला आहे+ आणि जो खरा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून त्याने आपल्याला बुद्धी* दिली आहे. आणि जो खरा आहे त्याच्यासोबत, त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपण ऐक्यात आहोत.+ हाच खरा देव आणि सर्वकाळाचं जीवन आहे.+
२१ मुलांनो, मूर्तींपासून दूर राहा.+
तळटीपा
^ शब्दशः “जे काही.”
^ शब्दशः “सत्य आहे.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य आहे.”
^ म्हणजे, येशू ख्रिस्त, देवाचा मुलगा.
^ शब्दशः “तो दुष्ट.”
^ शब्दशः “त्या दुष्टाच्या.”
^ शब्दशः “समजशक्ती; समजण्याची कुवत.”