१ राजे १:१-५३

  • दावीद आणि अबीशग (१-४)

  • राज्य बळकवायचा अदोनीयाचा प्रयत्न (५-१०)

  • नाथान आणि बथशेबा लगेच पाऊल उचलतात (११-२७)

  • शलमोनचा अभिषेक करायची दावीद आज्ञा देतो (२८-४०)

  • अदोनीया वेदीकडे पळतो (४१-५३)

 दावीद राजा आता फार वृद्ध झाला होता.+ त्याच्यावर कितीही पांघरुणं घातली, तरी त्याला ऊब येत नव्हती. २  म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले: “कृपया आमच्या प्रभूसाठी, राजासाठी एक कुमारी शोधायची परवानगी आम्हाला द्या. ती राजाची काळजी घेईल आणि त्यांची सेवा करेल. ती आमच्या प्रभूच्या, राजाच्या जवळ झोपेल म्हणजे त्यांना ऊब मिळेल.” ३  मग इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात ते एका सुंदर मुलीचा शोध घेऊ लागले. तेव्हा त्यांना शूनेमची+ राहणारी अबीशग+ मिळाली आणि ते तिला राजाकडे घेऊन आले. ४  ती मुलगी अतिशय सुंदर होती. ती राजाची काळजी घेऊ लागली आणि त्याची सेवा करू लागली. पण राजाने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. ५  त्या काळात, हग्गीथचा मुलगा अदोनीया+ आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत होता. “मीच राजा होणार!” असं तो म्हणत होता. त्याने स्वतःसाठी एक रथ तयार केला; तसंच त्याने घोडेस्वार आणि आपल्यापुढे धावण्यासाठी ५० माणसंही ठेवली.+ ६  पण, “तू असं का केलंस?” असं म्हणून अदोनीयाच्या वडिलांनी त्याला कधीही टोकलं नव्हतं.* त्याचा जन्म अबशालोमनंतर झाला होता, आणि तोसुद्धा अतिशय देखणा होता. ७  अदोनीया हा सरूवाच्या मुलाशी, यवाबशी आणि अब्याथार+ याजकाशी बोलला, आणि त्यांनी त्याला मदत करायची व पाठिंबा द्यायची तयारी दाखवली.+ ८  पण सादोक+ याजक, यहोयादाचा मुलगा बनाया,+ नाथान+ संदेष्टा, शिमी,+ रेई आणि दावीदचे शूर योद्धे+ यांनी मात्र अदोनीयाला पाठिंबा दिला नाही. ९  नंतर, अदोनीयाने एन-रोगेलच्या जवळ जोहेलेथ खडकाशेजारी बलिदान अर्पण करायची व्यवस्था केली.+ त्याने तिथे मेंढरं, गुरंढोरं आणि धष्टपुष्ट जनावरं यांचं बलिदान दिलं. त्या प्रसंगी त्याने आपल्या सगळ्या भावांना, म्हणजे राजाच्या मुलांना; तसंच यहूदाच्या सर्व माणसांना, म्हणजे राजाच्या सेवकांना आमंत्रण दिलं. १०  पण त्याने नाथान संदेष्टा, बनाया आणि दावीदचे शूर योद्धे यांना मात्र आमंत्रण दिलं नाही. त्याने आपला भाऊ शलमोन यालाही आमंत्रण दिलं नाही. ११  मग नाथान+ संदेष्टा शलमोनच्या आईला,+ बथशेबाला+ म्हणाला: “हग्गीथचा मुलगा अदोनीया+ राजा बनलाय हे तू ऐकलं नाहीस का? पण आपले प्रभू दावीद यांना याबद्दल काहीच माहीत नाही. १२  आता जर तुला तुझा आणि तुझ्या मुलाचा, शलमोनचा जीव वाचवायचा असेल,+ तर मी जो सल्ला देतोय तो ऐक. १३  दावीद राजाकडे जा आणि त्याला म्हण: ‘माझे प्रभू, माझे राजे! तुमच्या या दासीला तुम्हीच शपथ घेऊन असं म्हणाला होतात ना, की “माझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन राजा बनेल आणि तोच माझ्या राजासनावर बसेल”?+ मग अदोनीया कसा काय राजा बनला?’ १४  आणि तू हे सगळं राजाशी बोलत असतानाच मी तिथे येईन आणि तू जे काही म्हणतेस ते बरोबर आहे असं राजाला सांगेन.” १५  मग बथशेबा राजाकडे त्याच्या खोलीत गेली. राजा फार वृद्ध झाला होता आणि शूनेमची राहणारी अबीशग+ त्याची सेवा करत होती. १६  मग बथशेबाने खाली वाकून राजाला नमन केलं. तेव्हा राजाने तिला विचारलं: “तुझी काय विनंती आहे?” १७  त्यावर ती म्हणाली: “माझे प्रभू, तुम्ही तुमचा देव यहोवा* याच्या नावाने शपथ घेऊन आपल्या या दासीला असं म्हटलं होतं, की ‘माझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन राजा बनेल आणि तोच माझ्या राजासनावर बसेल.’+ १८  पण बघा, आता अदोनीया राजा होऊन बसलाय! आणि माझ्या प्रभूला, माझ्या राजाला याबद्दल काहीच माहीत नाही.+ १९  अदोनीयाने मोठ्या प्रमाणात बैलांचं, धष्टपुष्ट जनावरांचं आणि मेंढरांचं बलिदान दिलंय आणि राजाच्या सगळ्या मुलांना, अब्याथार याजकाला आणि सेनापती यवाबला आमंत्रण दिलंय;+ पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र त्याने बोलावलं नाही.+ २०  आता, माझ्या प्रभूनंतर त्यांच्या राजासनावर कोण बसेल हे राजाने सांगावं म्हणून संपूर्ण इस्राएलचे डोळे तुमच्याकडे लागले आहेत. २१  नाहीतर माझे प्रभू, माझे राजे, असं होईल की तुमच्यामागे* मला आणि माझ्या मुलाला लगेच राजद्रोही समजलं जाईल.” २२  बथशेबा राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टाही तिथे आला.+ २३  तेव्हा राजाला सांगण्यात आलं: “नाथान संदेष्टा आलाय!” नाथान आत आला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला. २४  मग तो म्हणाला: “माझ्या प्रभूने, राजाने असं म्हटलं होतं का, की ‘माझ्यानंतर अदोनीया हा राजा बनेल आणि तोच माझ्या राजासनावर बसेल’?+ २५  कारण तो आज पुष्कळशा बैलांचं, धष्टपुष्ट जनावरांचं आणि मेंढरांचं बलिदान द्यायला गेलाय.+ आणि त्याने राजाच्या सगळ्या मुलांना, सेनापतींना आणि अब्याथार याजकाला आमंत्रित केलंय.+ ते सगळे तिथे त्याच्यासोबत खातपीत आहेत. आणि अशी घोषणा करत आहेत: ‘अदोनीया राजाला दीर्घायुष्य लाभो!’ २६  पण त्याने मला, तुमच्या या सेवकाला बोलावलं नाही. शिवाय सादोक याजक, यहोयादाचा मुलगा बनाया+ आणि तुमचा सेवक शलमोन यांनाही त्याने बोलावलं नाही. २७  हे सगळं माझ्या प्रभूच्या, राजाच्या संमतीने झालंय का? माझ्या प्रभूनंतर राजासनावर कोण बसेल हे राजाने ठरवलंय का? पण राजाने, माझ्या प्रभूने, त्याबद्दल मला काहीच सांगितलं नाही.” २८  मग दावीद राजा म्हणाला: “बथशेबाला माझ्याकडे बोलवा.” तेव्हा ती आली आणि राजासमोर उभी राहिली. २९  राजा शपथ घेऊन तिला म्हणाला: “ज्याने मला माझ्या सगळ्या संकटांतून वाचवलं+ त्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ, ३०  इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने मी तुला जी शपथ वाहिली होती, की ‘माझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन राजा बनेल, आणि माझ्या जागी तोच राजासनावर बसेल!’ ती मी आज पूर्ण करीन.” ३१  तेव्हा बथशेबाने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला, आणि ती म्हणाली: “माझ्या प्रभूंना, राजा दावीद यांना दीर्घायुष्य लाभो!” ३२  त्यानंतर लगेच दावीद राजा म्हणाला: “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा+ मुलगा बनाया+ यांना माझ्याकडे बोलवा.” तेव्हा ते राजाकडे आले. ३३  राजा त्यांना म्हणाला: “माझ्या सेवकांना सोबत घ्या आणि माझ्या मुलाला, शलमोनला माझ्या खेचरावर*+ बसवून खाली गीहोनला+ घेऊन जा. ३४  तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा शलमोनला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त करतील.+ मग शिंग फुंकून अशी घोषणा करा: ‘शलमोन राजाला दीर्घायुष्य लाभो!’+ ३५  मग त्याच्यामागे चालत परत या. तो येऊन माझ्या राजासनावर बसेल आणि माझ्या जागी राजा बनेल. आणि मी इस्राएलचा आणि यहूदाचा पुढारी म्हणून त्याची नेमणूक करीन.” ३६  त्यावर यहोयादाचा मुलगा बनाया लगेच राजाला म्हणाला: “आमेन! माझ्या प्रभूचा देव, राजाचा देव यहोवा या गोष्टीला मान्यता देवो! ३७  यहोवा जसा माझ्या प्रभूसोबत, राजासोबत राहिला, तसाच तो शलमोनसोबतही राहो.+ आणि तो शलमोनचं राजासन माझ्या प्रभूच्या, दावीद राजाच्या राजासनापेक्षाही अधिक महान करो.”+ ३८  मग सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया,+ करेथी आणि पलेथी+ लोक खाली गेले; आणि त्यांनी शलमोनला दावीद राजाच्या खेचरावर+ बसवून गीहोनला+ आणलं. ३९  मग सादोक याजकाने तंबूमधून+ तेलाचं शिंग घेतलं+ आणि शलमोनचा अभिषेक केला.+ नंतर त्यांनी शिंग फुंकलं आणि सर्व लोक मोठ्याने अशी घोषणा करू लागले: “शलमोन राजाला दीर्घायुष्य लाभो!” ४०  त्यानंतर सर्व लोक बासऱ्‍या वाजवत आणि मोठा जल्लोष करत त्याच्यामागे जाऊ लागले. तो जल्लोष इतका मोठा होता, की त्या आवाजाने जमीन हादरू लागली.+ ४१  इकडे अदोनीयाचं आणि त्याने आमंत्रित केलेल्या लोकांचं खाणंपिणं संपलं;+ इतक्यात त्यांनी तो आवाज ऐकला. शिंग फुंकल्याचा आवाज ऐकताच यवाबने म्हटलं: “शहरात हा कसला गोंधळ चाललाय?” ४२  तो बोलत होता तेवढ्यात अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान+ तिथे आला. तेव्हा अदोनीया म्हणाला: “आत ये, तू भला* माणूस आहेस. तू नक्कीच काहीतरी चांगली बातमी आणली असशील.” ४३  पण योनाथान अदोनीयाला म्हणाला: “नाही! आपल्या प्रभूने, दावीद राजाने शलमोनला राजा बनवलंय. ४४  दावीद राजाने सादोक याजकाला, नाथान संदेष्ट्याला, यहोयादाच्या मुलाला म्हणजे बनायाला, तसंच करेथी आणि पलेथी लोकांना शलमोनसोबत पाठवलं. आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसवलं.+ ४५  मग सादोक याजकाने आणि नाथान संदेष्ट्याने त्याला गीहोनमध्ये राजा म्हणून अभिषिक्‍त केलं. त्यानंतर ते जल्लोष करत परत आले आणि त्यामुळे शहरात गोंधळ माजला. तुम्ही जो आवाज ऐकला तो याचाच होता. ४६  इतकंच नाही, तर शलमोन राजासनावर विराजमान झालाय. ४७  आणि हो, आणखी एक गोष्ट, राजाचे सेवक आपल्या प्रभूचं, दावीद राजाचं अभिनंदन करायला आले आहेत. ते म्हणत आहेत: ‘तुमचा देव, शलमोनचं नाव तुमच्या नावापेक्षा अधिक मोठं करो. आणि तो त्याचं राजासन तुमच्या राजासनापेक्षाही महान करो!’ तेव्हा राजाने पलंगावरूनच देवाला नमन केलं. ४८  आणि राजा असंही म्हणाला: ‘ज्याने आज माझ्या मुलाला माझ्या राजासनावर बसवलं, आणि हे पाहण्याची संधी मला दिली त्या इस्राएलच्या देवाची, यहोवाची स्तुती होवो!’” ४९  तेव्हा अदोनीयाने आमंत्रित केलेले सगळे लोक अतिशय घाबरले, आणि उठून आपापल्या मार्गाने निघून गेले. ५०  अदोनीयालासुद्धा शलमोनची फार भीती वाटली. म्हणून तो लगेच उठून गेला आणि वेदीची शिंगं घट्ट धरून राहिला.+ ५१  तेव्हा शलमोनला असं सांगण्यात आलं: “अदोनीया हा शलमोन राजाच्या भीतीमुळे वेदीची शिंगं धरून बसलाय. तो म्हणतोय: ‘शलमोन राजा आपल्या या दासाला तलवारीने मारून टाकणार नाही, अशी आधी त्याने मला शपथ द्यावी.’” ५२  त्यावर शलमोन म्हणाला: “तो एक भला माणूस असल्याचं दिसून आलं, तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण त्याच्यामध्ये जर दुष्टपणा दिसून आला,+ तर मात्र तो जिवंत राहणार नाही.” ५३  म्हणून मग शलमोन राजाने माणसं पाठवून त्याला वेदीवरून उतरवून आणलं. त्याने शलमोन राजापुढे येऊन त्याला वाकून नमन केलं. मग शलमोन त्याला म्हणाला: “आपल्या घरी जा.”

तळटीपा

किंवा “दुखावलं नव्हतं; रागावलं नव्हतं.”
शब्दशः “पूर्वजांकडे जाऊन निजल्यावर.”
किंवा “मादी खेचरावर.”
किंवा “योग्य.”