१ राजे १२:१-३३
१२ रहबाम शखेम+ इथे गेला, कारण सर्व इस्राएली लोक त्याला राजा बनवायला+ तिथे जमले होते.
२ ही गोष्ट नबाटचा मुलगा यराबाम याला समजली. (तो शलमोन राजाच्या भीतीमुळे इजिप्तला पळून गेला होता आणि अजूनही तिथेच राहत होता.)+
३ तेव्हा लोकांनी त्याला बोलावून घेतलं. मग यराबाम आणि इस्राएलची सर्व मंडळी रहबामकडे येऊन म्हणाली:
४ “तुझ्या वडिलांनी आमच्यावर फार जड जू* लादलंय.+ त्यांनी आम्हाला कामाच्या ओझ्याखाली भरडून काढलंय. पण तू जर आमच्या कामाचा भार कमी केलास आणि हे जड जू हलकं केलंस तर आम्ही तुझी सेवा करू.”
५ त्यावर तो त्यांना म्हणाला: “आता तुम्ही जा, आणि तीन दिवसांनी परत या.” म्हणून ते लोक निघून गेले.+
६ मग रहबाम राजाने वडीलधाऱ्यांशी* सल्लामसलत केली; या वडीलधाऱ्या माणसांनी त्याचा पिता शलमोन याची सेवा केली होती. रहबामने त्यांना विचारलं: “तुम्हाला काय वाटतं, या लोकांना मी काय उत्तर द्यावं?”
७ ते त्याला म्हणाले: “आज जर तू या लोकांची विनंती मान्य करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलंस आणि त्यांचा सेवक बनलास, तर ते आयुष्यभर तुझे सेवक होऊन राहतील.”
८ पण वडीलधाऱ्यांनी दिलेला हा सल्ला त्याने धुडकावून लावला. आणि ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला होता त्या आपल्या तरुण सेवकांशी त्याने सल्लामसलत केली.+
९ त्याने त्यांना विचारलं: “जे लोक मला म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू हलकं कर,’ त्या लोकांना आपण काय उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतं?”
१० तेव्हा, त्याच्यासोबत लहानाचे मोठे झालेले तरुण त्याला म्हणाले: “जे लोक तुला असं म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू फार जड आहे, ते हलकं कर,’ त्यांना तू असं सांग: ‘माझ्या हाताची करंगळी माझ्या वडिलांच्या कमरेपेक्षा जाड होईल.
११ माझ्या वडिलांनी तुमच्यावर जड जू लादलं; पण मी ते आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.’”
१२ मग, “तिसऱ्या दिवशी परत या”+ असं जे रहबामने सांगितलं होतं, त्याप्रमाणे यराबाम आणि सर्व लोक तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आले.
१३ पण राजा त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला; वडीलधाऱ्या माणसांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्याने केलं नाही.
१४ याउलट, तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो लोकांना म्हणाला: “माझ्या वडिलांनी तुमच्यावर जड जू लादलं; पण मी ते आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.”
१५ अशा प्रकारे राजाने लोकांचं म्हणणं ऐकलं नाही. यहोवाने शिलोतल्या अहीयाद्वारे नबाटचा मुलगा यराबाम याला जे सांगितलं होतं,+ ते पूर्ण व्हावं म्हणून यहोवानेच हे सगळं घडवून आणलं होतं.+
१६ राजा आपलं म्हणणं ऐकत नाही हे सर्व इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते त्याला म्हणाले: “दावीदशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. इशायच्या मुलाच्या वारशात आम्हाला काहीच हिस्सा नाही. हे इस्राएलच्या लोकांनो! चला आपापल्या देवांकडे! हे दावीद! आता तुझं घराणं तूच सांभाळ!” असं बोलून सर्व इस्राएली लोक आपापल्या घरी निघून गेले.+
१७ पण रहबाम यहूदाच्या शहरांमध्ये राहणाऱ्या इस्राएली लोकांवर राज्य करत राहिला.+
१८ मग रहबाम राजाने, सक्तीची मजुरी करणाऱ्या लोकांवर अधिकारी असलेल्या अदोरामला+ इस्राएली लोकांकडे पाठवलं. पण त्यांनी त्याला दगडमार करून मारून टाकलं. रहबाम राजा कसाबसा आपल्या रथावर चढून यरुशलेमला पळून गेला.+
१९ आणि आजपर्यंत इस्राएली लोक दावीदच्या राजघराण्याविरुद्ध बंड करत आहेत.+
२० यराबाम परत आला आहे हे समजताच सर्व इस्राएली लोकांनी एक सभा भरवली. मग त्यांनी त्याला तिथे बोलावलं आणि सर्व इस्राएलवर राजा बनवलं.+ फक्त यहूदाचाच वंश दावीदच्या राजघराण्याला विश्वासू राहिला.+
२१ रहबाम यरुशलेमला आला तेव्हा त्याने लगेच यहूदाच्या संपूर्ण घराण्याला आणि बन्यामीन वंशाला एकत्र केलं. शलमोनचा मुलगा रहबाम याचं राज्यपद त्याला परत मिळावं म्हणून इस्राएलच्या घराण्याविरुद्ध लढाई करण्यासाठी त्याने १,८०,००० प्रशिक्षित* योद्धे जमवले.+
२२ तेव्हा खऱ्या देवाकडून शमाया+ संदेष्ट्याला* असा संदेश मिळाला:
२३ “यहूदाचा राजा, म्हणजे शलमोनचा मुलगा रहबाम, तसंच यहूदा व बन्यामीनचं सगळं घराणं आणि बाकीचे लोक या सर्वांना असं सांग, की
२४ ‘यहोवा असं म्हणतो: “आपल्या इस्राएली भावांशी जाऊन लढू नका. प्रत्येकाने आपापल्या घरी परत जावं. कारण मीच हे घडवून आणलंय.”’”+ यहोवाचं हे म्हणणं लोकांनी ऐकलं, आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे ते आपापल्या घरी निघून गेले.
२५ मग यराबामने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ शहर पुन्हा बांधलं* आणि तो तिथे राहू लागला. त्यानंतर तो पनुएलला+ गेला आणि त्याने ते शहरही पुन्हा बांधलं.*
२६ यराबामने मग विचार केला: “राज्य परत दावीदच्या राजघराण्याला मिळण्याची शक्यता वाटते.+
२७ कारण हे लोक जर यहोवाच्या मंदिरात बलिदानं अर्पण करायला यरुशलेमला जात राहिले,+ तर त्यांची मनंही त्यांच्या प्रभूकडे, यहूदाचा राजा रहबाम याच्याकडे वळतील. आणि मग ते मला मारून टाकतील आणि यहूदाच्या राजाकडे, रहबामकडे परत जातील.”
२८ मग आपल्या सल्लागारांशी चर्चा केल्यानंतर राजाने सोन्याची दोन वासरं बनवली,+ आणि तो लोकांना म्हणाला: “हे इस्राएलच्या लोकांनो! यरुशलेमला जाण्याचं कष्ट का घेता? हे पाहा! हा तुमचा देव, यानेच तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं.”+
२९ मग त्यातलं एक वासरू त्याने बेथेल+ इथे व एक दान+ इथे ठेवलं.
३० आणि त्यामुळे लोकांनी पाप केलं;+ ते अगदी दानपर्यंत जाऊन तिथे ठेवलेल्या वासराची उपासना करू लागले.
३१ यराबामने उच्च स्थानांवर* उपासना करण्यासाठी मंदिरंही बांधली. आणि लेवी वंशापैकी नसलेल्या सामान्य लोकांमधून काहींना त्याने याजक म्हणून नेमलं.+
३२ तसंच त्याने यहूदातल्या सणासारखाच एक सण, आठव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी सुरू केला.+ आणि आपण बनवलेल्या वासरांपुढे त्याने बेथेलमध्ये+ बनवलेल्या वेदीवर बलिदानं अर्पण केली. तसंच त्याने बेथेलमध्ये बनवलेल्या उच्च स्थानांसाठी याजकही नेमले.
३३ आठव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी, बेथेलमध्ये आपण बनवलेल्या वेदीवर तो बलिदानं अर्पण करू लागला; हा महिना त्याने स्वतःच निवडला होता. त्याने इस्राएली लोकांसाठी सण सुरू केला आणि वेदीसमोर जाऊन अर्पणं वाहिली व बलिदानांचं हवन केलं.*
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “वडीलजनांशी.”
^ शब्दशः “निवडलेले.”
^ शब्दशः “खऱ्या देवाचा माणूस.”
^ किंवा “मजबूत केलं.”
^ किंवा “मजबूत केलं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळली.”