१ राजे १५:१-३४

  • यहूदाचा राजा अबीयाम (१-८)

  • यहूदाचा राजा आसा (९-२४)

  • इस्राएलचा राजा नादाब (२५-३२)

  • इस्राएलचा राजा बाशा (३३, ३४)

१५  नबाटचा मुलगा, म्हणजे राजा यराबाम+ याच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी अबीयाम यहूदाचा राजा बनला.+ २  त्याने यरुशलेमवर तीन वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव माका+ असून ती अबीशालोमची नात होती. ३  आपल्या वडिलांनी जी पापं केली होती, तशीच पापं अबीयामसुद्धा करत राहिला. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याचं मन त्याचा देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.* ४  पण दावीदमुळे,+ त्याचा देव यहोवा याने यरुशलेममध्ये त्याला एक वंशाचा दिवा दिला;+ देवाने त्याच्यानंतर त्याच्या मुलाला राजा म्हणून नेमलं आणि यरुशलेमचं अस्तित्व टिकवून ठेवलं. ५  कारण, दावीदने यहोवाच्या नजरेत जे योग्य होतं तेच केलं. उरीया हित्तीच्या बाबतीत त्याने जे केलं,+ ती एक गोष्ट सोडून त्याने आयुष्यभर देवाच्या आज्ञांचं पालन केलं; त्यांपासून तो कधीही भरकटला नाही. ६  रहबाम जिवंत होता तोपर्यंत रहबाममध्ये आणि यराबाममध्ये युद्ध होत राहिलं.+ ७  अबीयामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ अबीयाम आणि यराबाम यांच्यामध्येही युद्ध होत राहिलं.+ ८  मग अबीयामचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आसा+ हा राजा बनला.+ ९  इस्राएलचा राजा यराबाम याच्या शासनकाळाच्या २० व्या वर्षी आसा यहूदावर राज्य करू लागला. १०  त्याने यरुशलेममध्ये ४१ वर्षं राज्य केलं. त्याच्या आजीचं नाव माका+ असून ती अबीशालोमची नात होती. ११  आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे आसानेही यहोवाच्या नजरेत जे योग्य तेच केलं.+ १२  मंदिरात पुरुष-वेश्‍येची कामं करणाऱ्‍या माणसांना त्याने देशातून हाकलून दिलं,+ आणि त्याच्या वाडवडिलांनी बनवलेल्या घृणास्पद मूर्तीही* त्याने काढून टाकल्या.+ १३  त्याने आपली आजी माका+ हिलासुद्धा राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण तिने पूजेच्या खांबाची* उपासना करण्यासाठी एक अश्‍लील मूर्ती बनवली होती. तिने बनवलेली ही मूर्ती आसाने फोडून किद्रोन खोऱ्‍यात+ जाळून टाकली.+ १४  उच्च स्थानं* मात्र काढून टाकण्यात आली नव्हती.+ पण असं असलं, तरी आसाने आयुष्यभर पूर्ण मनाने* यहोवाची सेवा केली. १५  तसंच, त्याने आणि त्याच्या वडिलांनी पवित्र केलेल्या वस्तू, म्हणजे सोनं, चांदी आणि वेगवेगळी भांडी या सर्व वस्तू त्याने यहोवाच्या मंदिरात आणल्या.+ १६  आसा आणि इस्राएलचा राजा बाशा+ यांच्यात सतत युद्ध होत राहिलं. १७  इस्राएलचा राजा बाशा याने यहूदावर हल्ला केला, आणि यहूदाचा राजा आसा याच्या प्रदेशात लोकांचं येणं-जाणं होऊ नये+ म्हणून तो रामा+ शहर बांधू लागला.* १८  तेव्हा, आसाने यहोवाच्या मंदिरातल्या आणि राजमहालातल्या भांडारांत उरलेलं सगळं सोनं व चांदी घेतलं. आणि ते आपल्या सेवकांच्या हातून दिमिष्कमध्ये राहणारा सीरियाचा राजा बेन-हदाद याच्याकडे पाठवलं;+ बेन-हदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा व हेज्योनचा नातू होता. आसाने त्याला असा संदेश पाठवला: १९  “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यामध्ये जसा एक करार होता, तसाच एक करार आपण आपसात करू या. मी तुला सोनं आणि चांदी भेट म्हणून पाठवतोय. तर आता, इस्राएलचा राजा बाशा याच्याशी तू जो करार केलाय तो मोडून टाक, म्हणजे तो माझा पिच्छा सोडेल.” २०  बेन-हदादने आसा राजाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने आपल्या सेनापतींना इस्राएलच्या शहरांवर हल्ला करायला पाठवलं. त्यांनी जाऊन ईयोन,+ दान,+ आबेल-बेथ-माका, तसंच सगळा किन्‍नेरोथ आणि नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला. २१  बाशाने हे ऐकलं तेव्हा त्याने लगेच रामा शहर बांधायचं* सोडून दिलं आणि तो परत तिरसा+ इथे जाऊन राहू लागला. २२  मग आसा राजाने यहूदातल्या सर्व लोकांना बोलावलं; त्याने कोणालाही सोडलं नाही. आणि रामा शहर बांधण्यासाठी बाशा जी लाकडं व जे दगड वापरत होता ते त्यांनी उचलून नेले. आणि त्यांचा उपयोग करून आसा राजाने मिस्पा+ आणि बन्यामीनच्या प्रदेशातलं गेबा+ शहर बांधलं.* २३  आसाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याची पराक्रमाची कामं, त्याने जी शहरं बांधली* आणि त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. पण तो म्हातारा झाला तेव्हा त्याच्या पायांना एक रोग जडला आणि त्यामुळे त्याला भयंकर त्रास झाला.+ २४  मग आसाचा मृत्यू झाला* आणि त्याला त्याच्या पूर्वजांच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात दफन करण्यात आलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोशाफाट+ हा राजा बनला. २५  यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, यराबामचा मुलगा नादाब+ हा राजा बनला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षं राज्य केलं. २६  त्याने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. तो आपल्या वडिलांच्या मार्गाने चालत राहिला;+ त्याच्या वडिलांनी स्वतः पाप केलं आणि इस्राएललाही पाप करायला लावलं.+ २७  इस्साखारच्या घराण्यातल्या अहीयाच्या मुलाने, म्हणजे बाशाने नादाबविरुद्ध कट रचला; आणि पलिष्ट्यांच्या गिब्बथोन+ शहरात त्याला मारून टाकलं. त्या वेळी नादाबने आणि सर्व इस्राएलने गिब्बथोनला वेढा घातला होता. २८  अशा प्रकारे, बाशाने त्याला यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी ठार मारलं आणि तो त्याच्या जागी राजा बनला. २९  राजा बनल्या-बनल्या बाशाने यराबामच्या घराण्यातल्या सगळ्यांना मारून टाकलं; त्याने एकालाही जिवंत सोडलं नाही. यहोवाने शिलोमधला आपला सेवक अहीया याच्याद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे बाशाने यराबामच्या घराण्याचा समूळ नाश केला.+ ३०  यराबामने स्वतः अनेक पापं केली होती आणि इस्राएललाही पाप करायला लावलं होतं. तसंच, त्याने इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला होता; आणि म्हणून हे सगळं घडून आलं. ३१  नादाबविषयीची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ३२  आसा आणि इस्राएलचा राजा बाशा यांच्यात सतत युद्ध होत राहिलं.+ ३३  यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा, तिरसा इथे इस्राएलचा राजा बनला आणि त्याने २४ वर्षं इस्राएलवर राज्य केलं.+ ३४  पण यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला.+ तो यराबामच्या मार्गाने चालत राहिला, आणि यराबामने इस्राएलला जे पाप करायला लावलं होतं, तेच पाप त्यानेही केलं.+

तळटीपा

किंवा “याला पूर्णपणे समर्पित नव्हतं.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
किंवा “पूर्णपणे समर्पित मनाने.”
किंवा “मजबूत करू लागला; पुन्हा बांधू लागला.”
किंवा “मजबूत करण्याचं; पुन्हा बांधण्याचं.”
किंवा “मजबूत केलं; पुन्हा बांधलं.”
किंवा “मजबूत केली; पुन्हा बांधली.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”