१ राजे २०:१-४३

  • सीरियाचे लोक अहाबशी युद्ध करतात (१-१२)

  • अहाब सीरियाच्या लोकांना हरवतो (१३-३४)

  • अहाबविरुद्ध भविष्यवाणी (३५-४३)

२०  सीरियाचा+ राजा बेन-हदाद+ याने आपलं सगळं सैन्य एकत्र जमवलं. याशिवाय, त्याने इतर ३२ राजे आणि त्यांचे घोडे व रथ सोबत घेतले. आणि शोमरोनविरुद्ध+ लढाई करण्यासाठी त्याने त्या शहराला वेढा घातला.+ २  मग त्याने आपल्या दूतांच्या हातून इस्राएलचा राजा अहाब+ याला शहरात असा निरोप पाठवला: “बेन-हदाद असं म्हणतो, की ३  ‘तुझं सोनं-चांदी आणि तुझ्या सगळ्यात सुंदर बायका व देखणी मुलं माझी आहेत.’” ४  त्यावर इस्राएलचा राजा त्याला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, तुम्ही म्हणता तसं मी आणि माझं सर्वकाही तुमचंच आहे.”+ ५  नंतर ते दूत परत अहाब राजाकडे आले आणि म्हणाले: “बेन-हदाद असं म्हणतो: ‘मी तुला असा निरोप पाठवला होता, की “तू तुझं सोनं-चांदी आणि तुझ्या बायका-मुलं माझ्या हवाली कर.” ६  आता उद्या याच वेळी माझे सेवक तुझ्याकडे येतील आणि तुझ्या महालाची आणि तुझ्या अधिकाऱ्‍यांच्या घरांची झडती घेतील. आणि तुझ्या सगळ्या मौल्यवान गोष्टी ते लुटून नेतील.’” ७  तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातल्या सगळ्या वडीलजनांना बोलावून घेतलं आणि तो त्यांना म्हणाला: “पाहा! हा माणूस आपल्यावर कसं संकट आणायचा प्रयत्न करतोय! त्याने माझ्या बायका-मुलं आणि माझं सोनं-चांदी मागितलं, आणि मी त्याला नाही म्हणालो नाही.” ८  तेव्हा सर्व वडीलजन आणि सर्व लोक त्याला म्हणाले: “त्याचं ऐकू नका, त्याची मागणीही मान्य करू नका.” ९  म्हणून मग अहाब राजा बेन-हदादच्या दूतांना म्हणाला: “जा आणि राजाला, माझ्या प्रभूला असं सांगा: ‘तुमच्या या सेवकाकडे तुम्ही आधी जी मागणी केली होती, ती मी मान्य करीन. पण आता तुम्ही जी मागणी करत आहात ती मी पूर्ण करू शकणार नाही.’” तेव्हा ते दूत गेले आणि त्यांनी बेन-हदादला हा निरोप कळवला. १०  बेन-हदादने मग त्याला असा संदेश पाठवला: “मी शोमरोनचा असा नाश करीन, की माझ्या अफाट सैन्यातल्या प्रत्येकाला द्यायला तिथे मूठभर धूळसुद्धा उरणार नाही! आणि मी जर तसं केलं नाही, तर माझे देव मला कठोरातली कठोर शिक्षा करोत!” ११  त्यावर इस्राएलच्या राजाने त्याला असं उत्तर दिलं: “त्याला जाऊन सांगा, ‘युद्ध सुरू होण्याआधीच तू युद्ध जिंकलास अशी बढाई मारू नकोस.’”+ १२  बेन-हदादला हा संदेश मिळाला त्या वेळी तो आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये दारू पीत बसले होते. संदेश ऐकताच, बेन-हदाद आपल्या सेवकांना म्हणाला: “हल्ला करायला तयार व्हा!” तेव्हा ते सगळे शहरावर हल्ला करायला तयार झाले. १३  इकडे, एक संदेष्टा इस्राएलचा राजा अहाब+ याच्याकडे आला आणि म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘तू हे अफाट सैन्य पाहत आहेस ना? आज मी ते तुझ्या हाती देईन. मग तुला कळून येईल की मी यहोवा आहे.’”+ १४  त्यावर अहाबने विचारलं: “कोणाच्या हातून?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला: “‘तुझ्या राज्यपालांच्या सहायकांच्या हातून,’ असं यहोवा म्हणतो.” मग त्याने विचारलं: “युद्ध कोण सुरू करेल?” त्यावर तो म्हणाला: “तू.” १५  अहाबने मग राज्यपालांच्या सहायकांची संख्या मोजली; त्यांची संख्या २३२ इतकी होती. त्यानंतर, त्याने सर्व इस्राएली सैनिकांची संख्या मोजली; त्यांची संख्या ७,००० इतकी होती. १६  ते सगळे हल्ला करायला दुपारच्या वेळी बाहेर पडले. त्या वेळी बेन-हदाद आणि त्याला मदत करायला आलेले ३२ राजे तंबूंमध्ये दारू पिऊन धुंद झाले होते. १७  लढाई करण्यासाठी सगळ्यात आधी राज्यपालांचे सहायक बाहेर आले. तेव्हा काय घडत आहे हे पाहण्यासाठी बेन-हदादने लगेच आपल्या दूतांना पाठवलं. दूतांनी परत येऊन त्याला अशी खबर दिली: “शोमरोनातून माणसं बाहेर आली आहेत.” १८  त्यावर बेन-हदाद म्हणाला: “ते जर शांती-सलोखा करायला बाहेर आले असतील, तर त्यांना जिवंत पकडा; आणि ते जर लढाई करायला बाहेर आले असतील, तरी त्यांना जिवंतच पकडा.” १९  पण राज्यपालांचे सहायक आणि त्यांच्यामागे सर्व सैनिक जेव्हा शहराबाहेर पडले, २०  तेव्हा त्यांच्यातल्या प्रत्येकाने आपल्या शत्रूंना ठार मारलं. मग सीरियाच्या सैनिकांनी पळ काढला+ आणि इस्राएली सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. पण सीरियाचा राजा बेन-हदाद घोड्यावर स्वार होऊन काही घोडेस्वारांसोबत तिथून निसटला. २१  नंतर इस्राएलचा राजाही बाहेर पडला. त्याने घोड्यांवर व रथांवर स्वार असलेल्या लोकांना ठार मारून सीरियाच्या सैनिकांवर मोठा विजय मिळवला.* २२  नंतर तो संदेष्टा+ पुन्हा इस्राएलच्या राजाकडे आला आणि म्हणाला: “पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला* सीरियाचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करायला येईल.+ म्हणून जा आणि आपलं सैन्य मजबूत कर आणि तू काय करणार आहेस याचा चांगला विचार कर.”+ २३  सीरियाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले: “त्यांचा देव हा पर्वतांवरचा देव आहे, म्हणूनच ते आपल्याला हरवू शकले. पण आपण जर मैदानावर त्यांच्याशी लढलो, तर आपण नक्कीच त्यांना हरवू. २४  शिवाय असंही करा: सगळ्या राजांना त्यांच्या पदावरून काढून टाका+ आणि त्यांच्या जागी राज्यपालांना नेमा. २५  आणि तुम्ही जितकं सैन्य गमावलं तितकंच सैन्य परत जमा करा; म्हणजे तुम्ही जितके घोडे आणि रथ गमावले तितकेच परत जमा करा. त्यानंतर आपण मैदानावर त्यांच्याशी लढाई करू, म्हणजे मग नक्कीच आपला विजय होईल.” तेव्हा बेन-हदाद राजाने त्यांचा सल्ला ऐकला आणि त्याप्रमाणे केलं. २६  मग वर्षाच्या सुरुवातीला* बेन-हदादने सीरियाचं सैन्य जमवलं आणि तो इस्राएलशी लढाई करायला अफेक+ इथे गेला. २७  इकडे, इस्राएली लोकांनीसुद्धा आपलं सैन्य जमवून त्यांना सर्व आवश्‍यक गोष्टी पुरवल्या, आणि ते शत्रूचा सामना करण्यासाठी निघाले. त्यांनी जाऊन सीरियाच्या सैन्यासमोर छावणी दिली. सीरियाचे सैनिक इतके जास्त होते, की सगळा प्रदेश त्यांनी भरून गेला होता.+ त्यांच्यासमोर इस्राएली सैनिक, बकऱ्‍यांच्या दोन छोट्या कळपांसारखे अगदी लहान वाटत होते. २८  मग खऱ्‍या देवाचा माणूस इस्राएलच्या राजाकडे आला आणि म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, की ‘सीरियाच्या लोकांनी असं म्हटलंय: “यहोवा मैदानांवरचा देव नाही, तर पर्वतांवरचा देव आहे.” म्हणून मी हे सर्व अफाट सैन्य तुझ्या हाती देईन.+ म्हणजे तुला नक्की कळून येईल, की मी यहोवा आहे.’”+ २९  ते सात दिवस एकमेकांसमोर छावणी देऊन होते. मग सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली सैनिकांनी एका दिवसात सीरियाच्या १,००,००० पायदळ सैनिकांना ठार मारलं. ३०  बाकीचे सैनिक अफेक+ शहरात पळून गेले. पण उरलेल्या २७,००० सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादसुद्धा शहरात पळून गेला आणि एका घरात आतल्या खोलीत जाऊन लपला. ३१  मग बेन-हदादचे सेवक त्याला म्हणाले: “आम्ही असं ऐकलंय, की इस्राएलच्या घराण्यातले राजे फार दयाळू* आहेत. म्हणून आम्हाला परवानगी द्या, म्हणजे आम्ही कमरेला गोणपाट गुंडाळून आणि डोक्याला दोर बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ. कदाचित तो तुम्हाला जिवंत सोडेल.”+ ३२  म्हणून मग त्यांनी कमरेला गोणपाटं गुंडाळली व डोक्याला दोर बांधले आणि ते इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हणाले: “तुमचा सेवक बेन-हदाद असं म्हणतो, ‘कृपा करून माझा जीव घेऊ नकोस.’” त्यावर अहाब राजा म्हणाला: “तो अजून जिवंत आहे का? तो तर माझा भाऊ आहे.” ३३  हा शुभ-शकुन आहे असं समजून बेन-हदादच्या माणसांनी त्याच्या शब्दांवर विश्‍वास ठेवला आणि ते म्हणाले: “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ आहे.” त्यावर तो त्यांना म्हणाला: “जा आणि त्याला घेऊन या.” बेन-हदाद त्याला भेटायला आला, तेव्हा त्याने त्याला आपल्या रथात घेतलं. ३४  मग बेन-हदाद त्याला म्हणाला: “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून घेतलेली शहरं मी तुला परत देईन. आणि माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा बनवल्या होत्या,* तशा तूही दिमिष्कमध्ये बनव.” त्यावर अहाब म्हणाला: “ठीक आहे, या करारामुळे मी तुला जाऊ देईन.” तेव्हा त्याने त्याच्याशी करार केला आणि त्याला जाऊ दिलं. ३५  मग संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी*+ एकाने यहोवाच्या आज्ञेवरून आपल्या सोबत्याला म्हटलं: “कृपा करून, मला मार.” पण त्या माणसाने त्याला मारायला नकार दिला. ३६  तेव्हा तो त्याला म्हणाला: “तू यहोवाचं ऐकलं नाहीस. म्हणून जेव्हा तू इथून जाशील तेव्हा लगेच एक सिंह तुला मारून टाकेल.” मग तो तिथून निघाला आणि एका सिंहाने त्या माणसावर हल्ला करून त्याला मारून टाकलं. ३७  मग तो दुसऱ्‍या एका माणसाला भेटला आणि त्याला म्हणाला: “कृपा करून, मला मार.” तेव्हा त्या माणसाने त्याला मारलं आणि जखमी केलं. ३८  मग तो संदेष्टा रस्त्याच्या कडेला जाऊन राजाची वाट पाहत उभा राहिला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने डोळ्यांवर पट्टी बांधली होती. ३९  राजा तिथून जात असताना तो त्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुमचा हा सेवक युद्धात गेला होता. युद्ध सुरू असताना एक माणूस युद्धातून मागे आला. तो आपल्यासोबत एका कैद्याला घेऊन आला आणि मला म्हणाला: ‘याच्यावर लक्ष ठेव. हा जर पळून गेला तर याच्या बदल्यात तुझा जीव घेण्यात येईल,+ किंवा भरपाई म्हणून तुला एक तालान्त* चांदी द्यावी लागेल.’ ४०  मग तुमचा हा सेवक काही कामात गुंतलेला असताना, तो कैदी अचानक निसटून गेला.” त्यावर इस्राएलचा राजा त्याला म्हणाला: “तुला ती शिक्षा मिळालीच पाहिजे. तू स्वतःच स्वतःचा न्याय केलाय.” ४१  तेव्हा त्याने लगेच आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि इस्राएलच्या राजाने ओळखलं, की तो संदेष्ट्यांपैकी एक आहे.+ ४२  तो राजाला म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘मी तुला ज्या माणसाला मारून टाकायला सांगितलं होतं, त्या माणसाला तू तुझ्या हातून निसटून जाऊ दिलंस.+ म्हणून आता त्याच्या बदल्यात तुझा जीव घेतला जाईल,+ आणि त्याच्या लोकांच्या बदल्यात तुझ्या लोकांचा नाश केला जाईल.’”+ ४३  हे ऐकून इस्राएलच्या राजाचं तोंड उतरलं आणि तो निराश होऊन शोमरोनमध्ये+ आपल्या महालात गेला.

तळटीपा

किंवा “सैनिकांची मोठी कत्तल केली.”
म्हणजे, वसंत ऋतूत.
म्हणजे, वसंत ऋतूत.
किंवा “एकनिष्ठ प्रेम करणारे.”
किंवा “जसे रस्ते नेमले होते.”
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्‍या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.