१ राजे २२:१-५३

  • यहोशाफाटची अहाबशी हातमिळवणी (१-१२)

  • मीखायाने केलेली पराभवाची भविष्यवाणी (१३-२८)

    • अहाबला फसवण्यासाठी स्वर्गदूत पुढे येतो (२१, २२)

  • रामोथ-गिलाद इथे अहाबचा मृत्यू (२९-४०)

  • यहोशाफाट यहूदावर राज्य करतो (४१-५०)

  • इस्राएलचा राजा अहज्या (५१-५३)

२२  सीरिया आणि इस्राएल यांच्यामध्ये तीन वर्षं कोणतंही युद्ध झालं नाही. २  मग तिसऱ्‍या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट+ हा इस्राएलच्या राजाकडे गेला.+ ३  तेव्हा इस्राएलचा राजा आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्हाला तर माहीतच आहे की रामोथ-गिलाद+ हे आपलं आहे. तरीसुद्धा आपण सीरियाच्या राजाकडून ते परत घ्यायला का कचरतोय?” ४  मग तो यहोशाफाटला म्हणाला: “तू माझ्यासोबत रामोथ-गिलादमध्ये लढाई करायला येशील का?” त्यावर यहोशाफाट इस्राएलच्या राजाला म्हणाला: “हो मी येईन. माझे लोक आणि माझे घोडे घेऊन मी तुझ्यासोबत येईन.”+ ५  पण यहोशाफाट इस्राएलच्या राजाला म्हणाला: “कृपा करून, याबद्दल आधी यहोवाचा सल्ला घे.”+ ६  म्हणून मग इस्राएलच्या राजाने जवळपास ४०० संदेष्ट्यांना बोलावून विचारलं: “मी रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” ते म्हणाले: “हो जा. कारण यहोवा ते शहर राजाला नक्की मिळवून देईल.” ७  मग यहोशाफाट म्हणाला: “इथे कोणी यहोवाचा संदेष्टा नाही का? आपण त्याच्याकडूनही देवाचा सल्ला घेऊ.”+ ८  त्यावर इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “इथे आणखी एक माणूस आहे; इम्लाचा मुलगा मीखाया. आपण त्याच्याकडूनही यहोवाचा सल्ला घेऊ शकतो,+ पण मला तो अजिबात आवडत नाही.+ कारण माझ्या बाबतीत तो कधीच चांगला संदेश देत नाही, नेहमी वाईटच देतो.”+ पण यहोशाफाट म्हणाला: “राजाने असं बोलू नये.” ९  मग इस्राएलच्या राजाने दरबारातल्या एका अधिकाऱ्‍याला बोलावून म्हटलं: “पटकन जा आणि इम्लाच्या मुलाला, मीखायाला घेऊन ये.”+ १०  त्या वेळी इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट, शाही पोशाख घालून शोमरोनच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या खळ्याजवळ* आपल्या राजासनांवर बसले होते. आणि सगळे संदेष्टे त्यांच्यापुढे भविष्यवाणी करत होते.+ ११  मग कनाना याचा मुलगा सिद्‌कीया याने आपल्यासाठी लोखंडाची शिंगं बनवली, आणि तो म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘सीरियाच्या लोकांचा नाश होईपर्यंत तुम्ही या शिंगांनी त्यांना ढकलत राहाल.’”* १२  बाकीचे सगळे संदेष्टेही असंच म्हणत होते: “जा, रामोथ-गिलादवर हल्ला कर. यहोवा ते राजाला नक्की मिळवून देईल; तू यशस्वी होशील.” १३  इकडे, मीखायाला बोलवायला गेलेला दूत त्याला म्हणाला: “पाहा! सगळे संदेष्टे राजाबद्दल चांगल्या गोष्टी बोलत आहेत. तर आता कृपा करून तुमचंही बोलणं त्यांच्यासारखं चांगलंच असू द्या.”+ १४  पण मीखाया म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची शपथ, यहोवा मला जे सांगेल तेच मी बोलीन.” १५  मग मीखाया राजाकडे आला आणि राजाने त्याला विचारलं: “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” तो लगेच म्हणाला: “हो जा, यहोवा ते राजाला मिळवून देईल; तू यशस्वी होशील.” १६  त्यावर राजा त्याला म्हणाला: “मी किती वेळा तुला शपथ घालून सांगू, की यहोवाच्या नावाने फक्‍त खरं तेच बोल?” १७  तेव्हा तो म्हणाला: “मला सगळे इस्राएली लोक, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे डोंगरांवर इकडे-तिकडे पसरलेले दिसत आहेत.+ यहोवा म्हणतो: ‘यांना कोणीही मालक नाही. तेव्हा प्रत्येकाला शांतीने आपापल्या घरी परत जाऊ द्या.’” १८  मग इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी तुला म्हणालो होतो ना, ‘हा माझ्याबद्दल चांगला संदेश देणार नाही, वाईटच देईल’?”+ १९  मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+ २०  यहोवाने मग विचारलं, ‘अहाबने रामोथ-गिलादला जावं आणि तिथे त्याचा मृत्यू व्हावा, म्हणून त्याला कोण फसवेल?’ तेव्हा कोणी असं सुचवलं, तर कोणी तसं. २१  मग एक स्वर्गदूत पुढे आला+ आणि यहोवासमोर उभा राहिला. तो म्हणाला, ‘मी त्याला फसवीन.’ तेव्हा यहोवाने त्याला विचारलं, ‘तू हे कसं करशील?’ २२  त्यावर तो स्वर्गदूत म्हणाला: ‘मी जाईन आणि त्याच्या सर्व संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावीन.’+ तेव्हा देव त्याला म्हणाला: ‘तू त्याला फसवशील; तू नक्की यशस्वी होशील. जा आणि तसंच कर.’ २३  म्हणूनच यहोवाने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावलंय.+ पण खरंतर तुझ्यावर संकट येईल अशी घोषणा यहोवाने केली आहे.”+ २४  तेव्हा कनानाचा मुलगा सिद्‌कीया मीखायाच्या जवळ आला आणि त्याला थोबाडीत मारून म्हणाला: “यहोवाची पवित्र शक्‍ती* मला सोडून तुझ्याशी कधीपासून बोलायला लागली?”+ २५  मीखायाने उत्तर दिलं: “ज्या दिवशी तू आतल्या खोलीत लपायला पळशील त्या दिवशी तुला हे कळेल.” २६  तेव्हा इस्राएलचा राजा म्हणाला: “मीखायाला धरा आणि त्याला शहराचा प्रमुख आमोन व राजाचा मुलगा योवाश यांच्या हवाली करा. २७  त्यांना सांगा, की ‘राजाचा असा हुकूम आहे: “या माणसाला तुरुंगात टाका+ आणि मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला फक्‍त भाकरीच्या तुकड्यावर आणि घोटभर पाण्यावर ठेवा.”’” २८  पण मीखाया म्हणाला: “तू सुखरूप परत आलास, तर असं समज की यहोवा माझ्याशी बोललाच नाही.”+ तो पुढे म्हणाला: “लोकांनो, तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा.” २९  यानंतर इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ-गिलादवर हल्ला करायला गेले.+ ३०  तेव्हा इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी वेष बदलून लढाईत जाईन, पण तू मात्र तुझा शाही पोशाख घाल.” मग इस्राएलचा राजा आपला वेश बदलून+ लढाईत गेला. ३१  इकडे, सीरियाच्या राजाने आपल्या रथदलाच्या ३२ अधिकाऱ्‍यांना असा आदेश दिला होता:+ “कोणत्याही छोट्या-मोठ्या सैनिकाशी किंवा अधिकाऱ्‍याशी लढू नका; फक्‍त इस्राएलच्या राजाशी लढा.” ३२  मग यहोशाफाटला पाहताच रथदलाचे अधिकारी आपसात म्हणाले: “हाच इस्राएलचा राजा असावा.” म्हणून मग ते त्याच्याशी लढायला गेले; तेव्हा यहोशाफाट मदतीसाठी ओरडू लागला. ३३  पण तो इस्राएलचा राजा नाही हे समजताच रथदलाच्या अधिकाऱ्‍यांनी त्याचा पाठलाग करायचं सोडून दिलं. ३४  मग एका माणसाने सहजच एक बाण सोडला आणि तो इस्राएलच्या राजाला जाऊन लागला; चिलखताचे दोन भाग जिथे जोडले होते, तिथे जाऊन तो बाण रुतला. मग राजा रथ चालवणाऱ्‍या माणसाला म्हणाला: “रथ वळव आणि मला या लढाईतून बाहेर ने, कारण मी फार जखमी झालोय.”+ ३५  त्या दिवशी दिवसभर लढाई चालली. आणि राजाला सीरियाच्या लोकांच्या दिशेने रथात आधार देऊन उभं करावं लागलं. रथामध्ये राजाच्या जखमेतून रक्‍त वाहत राहिलं आणि संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.+ ३६  मग सूर्यास्ताच्या वेळी छावणीत अशी घोषणा करण्यात आली: “प्रत्येकाने आपापल्या शहरात, आपापल्या देशात परत जावं!”+ ३७  अशा प्रकारे राजाचा मृत्यू झाला आणि त्याला शोमरोनात आणून दफन करण्यात आलं. ३८  त्यांनी शोमरोनच्या तळ्याजवळ त्याचा रथ धुतला, तेव्हा कुत्र्यांनी येऊन त्याचं रक्‍त चाटलं आणि वेश्‍यांनी तिथे अंघोळ केली;* यहोवाने सांगितलं होतं तसंच घडलं.+ ३९  अहाबविषयीची बाकीची माहिती, म्हणजे त्याने हस्तिदंतांपासून+ जो महाल बांधला, त्याने जी शहरं बांधली आणि त्याने जे काही केलं, ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ४०  अहाबचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा अहज्या+ राजा बनला. ४१  इस्राएलचा राजा अहाब याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, आसाचा मुलगा यहोशाफाट+ हा यहूदाचा राजा बनला. ४२  यहोशाफाट राजा बनला तेव्हा तो ३५ वर्षांचा होता. त्याने एकूण २५ वर्षं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अजूबा असून ती शिल्ही याची मुलगी होती. ४३  यहोशाफाट आपल्या वडिलांच्या, आसाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला;+ त्या मार्गापासून तो बहकला नाही. यहोवाच्या नजरेत जे योग्य ते त्याने केलं.+ पण उपासनेची उच्च स्थानं मात्र काढून टाकण्यात आली नव्हती. त्या उच्च स्थानांवर लोक अजूनही बलिदानं अर्पण करत होते आणि बलिदानांचं हवन करत होते.*+ ४४  यहोशाफाटने इस्राएलच्या राजासोबत शांतीचे संबंध ठेवले.+ ४५  यहोशाफाटबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने लढलेली युद्धं हे सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ४६  तसंच, त्याचे वडील आसा यांच्या काळात मंदिरात पुरुष-वेश्‍येची+ कामं करणारे जे उरले होते, त्या सर्वांना त्याने देशातून काढून टाकलं.+ ४७  त्या दिवसांत अदोममध्ये+ कोणी राजा नव्हता; त्याच्या जागी एक अधिकारी राज्य चालवायचा.+ ४८  यहोशाफाटने ओफीर इथून सोनं आणण्यासाठी तार्शीशची जहाजं* बांधली.+ पण ती जहाजं तिथे पोहोचू शकली नाहीत, कारण एस्योन-गेबेर इथे ती जहाजं फुटली.+ ४९  तेव्हा अहाबचा मुलगा अहज्या यहोशाफाटला म्हणाला: “तुझ्या सेवकांसोबत माझ्या सेवकांनाही जहाजांवर जाऊ दे.” पण यहोशाफाट यासाठी तयार झाला नाही. ५०  मग यहोशाफाटचा मृत्यू झाला*+ आणि त्याला आपला पूर्वज दावीद याच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात आपल्या पूर्वजांसोबत दफन करण्यात आलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम+ हा राजा बनला. ५१  यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या शासनकाळाच्या १७ व्या वर्षी, अहाबचा मुलगा अहज्या+ शोमरोनमध्ये इस्राएलचा राजा बनला. त्याने इस्राएलवर दोन वर्षं राज्य केलं. ५२  तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. तो आपल्या आईवडिलांच्या+ आणि इस्राएलला पाप करायला लावणाऱ्‍या नबाटच्या मुलाच्या, म्हणजे यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला.+ ५३  अहज्या आपल्या वडिलांप्रमाणेच बआल दैवताची उपासना करत राहिला,+ त्याच्या पाया पडत राहिला आणि इस्राएलचा देव यहोवा याला क्रोधित करत राहिला.+

तळटीपा

किंवा “शिंगांनी त्यांना हुंदडत राहाल.”
किंवा कदाचित, “जिथे वेश्‍या अंघोळ करायच्या, तिथे कुत्र्यांनी त्याचं रक्‍त चाटलं.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”