१ राजे ३:१-२८

  • शलमोन फारोच्या मुलीशी लग्न करतो (१-३)

  • यहोवा शलमोनला स्वप्नात दर्शन देतो (४-१५)

    • शलमोन देवाकडे बुद्धी मागतो (७-९)

  • शलमोन दोन आयांचा न्याय करतो (१६-२८)

 शलमोनने इजिप्तचा* राजा फारो याच्या मुलीशी लग्न करून+ त्याच्याशी सोयरीक केली. फारोच्या मुलीशी लग्न करून त्याने तिला दावीदपुरात+ आणलं. आणि आपलं घर,+ यहोवाचं घर+ आणि यरुशलेम शहराची भिंत बांधायचं काम पूर्ण होईपर्यंत,+ त्याने तिला तिथेच दावीदपुरात ठेवलं. २  पण लोक आताही उच्च स्थानांवर* बलिदानं अर्पण करत होते.+ कारण, यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी अजूनपर्यंत मंदिर* बांधण्यात आलं नव्हतं.+ ३  शलमोन आपल्या वडिलांच्या, दावीदच्या सांगण्याप्रमाणे देवाच्या कायद्यांचं पालन करत राहिला. अशा प्रकारे तो यहोवावर प्रेम करत राहिला. शलमोन उच्च स्थानांवर अग्नीत जाळून बलिदानंही अर्पण करायचा.+ ४  शलमोन राजा गिबोनमध्ये बलिदान अर्पण करायला गेला. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं* उच्च स्थान होतं.+ तिथे वेदीवर त्याने १,००० होमार्पणं वाहिली.+ ५  शलमोन गिबोनमध्ये असताना यहोवाने त्याला रात्री स्वप्नात दर्शन दिलं. देव त्याला म्हणाला: “तुला जे काही हवंय ते माग, मी तुला ते देईन.”+ ६  त्यावर शलमोन म्हणाला: “तुझा सेवक, म्हणजे माझे वडील दावीद हे तुझ्यासमोर विश्‍वासाने, नीतीने आणि खऱ्‍या मनाने चालले, तेव्हा तू त्यांच्यावर अपार प्रेम* केलंस. आणि त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक मुलगा देऊन तू आजही त्यांच्यावर अपार प्रेम* करतोस.+ ७  आता हे माझ्या देवा यहोवा, तू मला, तुझ्या या सेवकाला माझ्या वडिलांच्या, दावीदच्या जागी राजा बनवलंस. पण मी तर अजून लहान* आहे आणि मला काही अनुभवसुद्धा नाही.+ ८  तुझा हा सेवक, तुझ्या निवडलेल्या लोकांवर राज्य करतोय.+ आणि या लोकांची संख्या इतकी मोठी आहे, की ती कोणालाही मोजता येणार नाही. ९  म्हणून तुझ्या या लोकांचा न्याय करण्यासाठी, बऱ्‍यावाइटातला फरक ओळखण्यासाठी+ आपल्या या सेवकाला आज्ञाधारक मन दे.+ नाहीतर, या असंख्य* लोकांचा न्याय करणं कोणाला शक्य आहे?” १०  शलमोनने ही गोष्ट मागितली म्हणून यहोवाला आनंद झाला.+ ११  मग देव त्याला म्हणाला: “तू स्वतःसाठी दीर्घायुष्य, धनसंपत्ती किंवा आपल्या शत्रूंचा जीव मागितला नाहीस, तर न्यायनिवाडा करण्यासाठी समजशक्‍ती मागितलीस.+ १२  म्हणून मी तुझी विनंती मान्य करीन.+ मी तुला सुज्ञ आणि समंजस मन देईन.+ म्हणजे जसा पूर्वी तुझ्यासारखा कोणी नव्हता, तसा यापुढेही कोणी तुझ्यासारखा होणार नाही.+ १३  याशिवाय तू जे मागितलं नाहीस, तेही मी तुला देईन.+ मी तुला इतकी धनसंपत्ती आणि मानसन्मान देईन,+ की तुझ्या संपूर्ण जीवनकाळात तुझ्यासारखा कोणताही राजा नसेल.+ १४  आणि तुझे वडील दावीद यांच्यासारखंच जर तू माझ्या नियमांचं आणि आज्ञांचं पालन केलंस आणि माझ्या मार्गांवर चालत राहिलास,+ तर मी तुला दीर्घायुष्यही देईन.”+ १५  शलमोन झोपेतून जागा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की ते एक दर्शन होतं. मग तो यरुशलेमला परत आला आणि यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे उभा राहिला. त्याने तिथे होमार्पणं आणि शांती-अर्पणं+ वाहिली आणि आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली. १६  नंतर असं झालं, की दोन वेश्‍या राजाकडे आल्या आणि त्याच्यापुढे उभ्या राहिल्या. १७  त्यातली पहिली स्त्री म्हणाली: “हे माझ्या प्रभू, ही स्त्री आणि मी, आम्ही दोघी एकाच घरात राहतो. ती घरात असताना मी एका बाळाला जन्म दिला. १८  मग तिसऱ्‍या दिवशी या स्त्रीनेसुद्धा एका बाळाला जन्म दिला. त्या वेळी, आम्ही दोघीच घरात होतो; आमच्याशिवाय दुसरं कोणीही तिथे नव्हतं. १९  रात्री या स्त्रीचा मुलगा तिच्या अंगाखाली आला आणि मेला. २०  म्हणून ती मध्यरात्री उठली. आणि आपली ही दासी गाढ झोपेत असताना, तिने माझ्या कुशीतला माझा मुलगा घेतला आणि आपल्या कुशीत झोपवला. आणि स्वतःचा मेलेला मुलगा माझ्या कुशीत ठेवला. २१  मग सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजायला उठले, तेव्हा मी पाहिलं की तो मेलाय. नंतर मी नीट निरखून पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तो मला झालेला मुलगा नाही.” २२  पण दुसरी स्त्री म्हणाली: “नाही, जिवंत मुलगा माझा आहे, मेलेला मुलगा तुझा आहे!” पण पहिली स्त्री म्हणत होती: “नाही, मेलेला मुलगा तुझा आहे, जिवंत माझा आहे!” अशा प्रकारे त्या दोघी राजापुढे भांडू लागल्या. २३  शेवटी राजा म्हणाला: “ही स्त्री म्हणते, की ‘जिवंत मुलगा माझा आहे, मेलेला मुलगा तुझा आहे!’ आणि ती स्त्री म्हणते, की ‘नाही, मेलेला मुलगा तुझा आहे, जिवंत माझा आहे!’” २४  राजा पुढे म्हणाला: “एक तलवार आणा.” म्हणून त्यांनी राजाला एक तलवार आणून दिली. २५  तेव्हा राजा म्हणाला: “या जिवंत मुलाचे दोन तुकडे करा! अर्धा एकीला द्या आणि अर्धा दुसरीला द्या!” २६  तेव्हा जिवंत मूल ज्या स्त्रीचं होतं तिच्या मनात आपल्या मुलासाठी ममता दाटून आली. ती लगेच राजापुढे गयावया करून अशी विनंती करू लागली: “हे माझ्या प्रभू! कृपा करून हे जिवंत मूल हिला देऊन टाका! पण मुलाला मात्र मारू नका!” पण दुसरी स्त्री म्हणू लागली: “तो ना माझा, ना तुझा! होऊ दे त्याचे दोन तुकडे!” २७  तेव्हा राजा म्हणाला: “मुलाला मारू नका. जिवंत मूल पहिल्या स्त्रीला द्या. कारण तीच त्याची खरी आई आहे!” २८  राजाने केलेल्या या न्यायाबद्दल संपूर्ण इस्राएलने ऐकलं, तेव्हा त्यांना राजाचा फार धाक* वाटला.+ कारण न्यायनिवाडा करण्यासाठी त्याला देवाने बुद्धी दिली आहे हे त्यांच्या लक्षात आलं.+

तळटीपा

किंवा “मिसरचा.”
शब्दशः “घर.”
शब्दशः “महान.”
किंवा “अपार एकनिष्ठ प्रेम.”
किंवा “अपार एकनिष्ठ प्रेम.”
किंवा “तरुण.”
किंवा कदाचित, “अडेल.”
शब्दशः “भीती.”