१ राजे ४:१-३४

  • शलमोनचं प्रशासन (१-१९)

  • शलमोनच्या शासनकाळात भरभराट (२०-२८)

    • द्राक्षवेलाखाली आणि अंजिराच्या झाडाखाली सुरक्षित (२५)

  • शलमोनची बुद्धी आणि नीतिवचनं (२९-३४)

 शलमोन राजा संपूर्ण इस्राएलवर राज्य करायचा.+ २  त्याच्या राज्यातले उच्च अधिकारी हे होते: सादोकचा+ मुलगा अजऱ्‍या हा याजक होता; ३  शिशाची मुलं अलिहोरेफ आणि अहीया हे सचिव होते;+ अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ हा इतिहास-लेखक होता; ४  यहोयादाचा मुलगा बनाया+ हा सेनापती होता; सादोक आणि अब्याथार+ हे याजक होते; ५  नाथानचा+ मुलगा अजऱ्‍या हा प्रांताधिकाऱ्‍यांचा प्रमुख होता; नाथानचा मुलगा जाबूद हा याजक आणि राजाचा मित्र+ होता; ६  अहीशार हा राजमहालातल्या कामांवर देखरेख करणारा होता; आणि अब्दाचा मुलगा अदोनीराम+ हा सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍यांवर अधिकारी होता.+ ७  शलमोनने संपूर्ण इस्राएलवर १२ प्रांताधिकारी नेमले होते. ते राजाला आणि त्याच्या घराण्याला अन्‍नसामग्री पुरवायचे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्‍यावर, वर्षातला एक महिना अन्‍नसामग्री पुरवायची जबाबदारी होती.+ ८  ते प्रांताधिकारी हे होते: एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर हूरचा मुलगा होता; ९  माकस, शालबीम,+ बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर देकरचा मुलगा होता; १०  अरुबोथ प्रदेशावर हेसेदचा मुलगा होता (सोखो आणि हेफेरचा संपूर्ण प्रदेश त्याच्या अधिकाराखाली यायचा); ११  दोरच्या संपूर्ण उतारांच्या प्रदेशावर अबीनादाबचा मुलगा होता (शलमोनची मुलगी टाफाथ ही त्याची बायको होती); १२  तानख, मगिद्दो+ आणि बेथ-शानच्या+ संपूर्ण प्रदेशांवर अहीलूदचा मुलगा बाना होता; तसंच, तो बेथ-शानपासून आबेल-महोलापर्यंत आणि तिथून यकमामपर्यंतच्या+ संपूर्ण प्रदेशावरही होता (बेथ-शानचा प्रदेश इज्रेलच्या खाली व सारतानच्या शेजारी होता); १३  रामोथ-गिलाद+ प्रदेशावर गेबेरचा मुलगा होता (त्याच्या अधिकाराखाली मनश्‍शेचा मुलगा याईर+ याची गिलाद+ प्रदेशातली खेडी होती; तसंच, बाशानमध्ये+ असलेला अर्गोबचा+ प्रदेशही होता. या प्रदेशात, मजबूत भिंती आणि तांब्याचे अडसर असलेली ६० मोठी शहरं होती); १४  महनाइम+ प्रदेशावर इद्दोचा मुलगा अहीनादाब होता; १५  नफतालीच्या प्रदेशावर अहीमास होता (शलमोनची आणखी एक मुलगी बासमथ ही त्याची बायको होती); १६  आशेर आणि बालोथ प्रदेशांवर हूशयचा मुलगा बाना होता; १७  इस्साखारच्या प्रदेशावर पारूहाचा मुलगा यहोशाफाट होता; १८  बन्यामीनच्या+ प्रदेशावर एलाचा मुलगा शिमी+ होता; १९  गिलादच्या+ प्रदेशावर उरीचा मुलगा गेबेर होता (पूर्वी हा प्रदेश अमोऱ्‍यांचा राजा सीहोन+ आणि बाशानचा राजा ओग+ यांच्या अधिकाराखाली होता). या सगळ्या प्रांताधिकाऱ्‍यांवर एक प्रमुख अधिकारीही होता. २०  यहूदा आणि इस्राएलमधल्या लोकांची संख्या समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी अगणित होती.+ ते सगळे खाऊन-पिऊन आनंदी जीवन जगत होते.+ २१  शलमोनने नदीपासून*+ ते पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत सर्व राज्यांवर शासन केलं. शलमोन जिवंत होता तोपर्यंत या सर्व राज्यांनी त्याला नजराणे पाठवले आणि त्याची सेवा केली.+ २२  शलमोनच्या राजमहालात प्रत्येक दिवसाला लागणारी अन्‍नसामग्री इतकी होती: ३० कोर* मापं चांगलं पीठ, ६० कोर मापं पीठ; २३  १० धष्टपुष्ट गाय-बैल, कुरणांत चरणारे २० गाय-बैल, १०० मेंढरं; तसंच काही हरणं, सांबरं, भेकरं* आणि पोसलेले पक्षी. २४  नदीच्या+ या बाजूच्या* सर्व प्रदेशांवर, म्हणजे तिफसाहपासून गाझापर्यंतच्या+ सर्व प्रदेशांवर आणि तिथल्या राजांवर शलमोनचा अधिकार होता. आणि त्याच्या संपूर्ण राज्यात व आसपासच्या सगळ्या प्रदेशांत शांती होती.+ २५  शलमोनच्या संपूर्ण शासनकाळात, दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधले सगळे लोक आपापल्या द्राक्षवेलाखाली आणि अंजिराच्या झाडाखाली सुरक्षित व निर्भयपणे राहत होते. २६  शलमोनकडे त्याच्या रथांच्या घोड्यांसाठी ४,०००* तबेले होते; त्याच्याकडे १२,००० घोडेसुद्धा* होते.+ २७  शलमोन राजाचे प्रांताधिकारी त्याच्यासाठी आणि त्याच्या मेजावर जेवणाऱ्‍या सर्वांसाठी अन्‍नसामग्री पुरवायचे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्‍यावर त्याला नेमून दिलेल्या महिन्यात अन्‍नसामग्री पुरवायची आणि कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी होती.+ २८  प्रत्येक जण त्याला नेमून दिल्याप्रमाणे घोड्यांसाठी, तसंच रथ ओढणाऱ्‍या घोड्यांसाठी जव आणि गवताच्या पेंढ्या हव्या त्या ठिकाणी पुरवायचा. २९  देवाने शलमोनला अमर्याद बुद्धी आणि समजशक्‍ती दिली; त्याने त्याला समुद्रकिनाऱ्‍यावर पसरलेल्या वाळूइतकी अमाप सुज्ञता दिली.*+ ३०  शलमोनची बुद्धी पूर्वेकडच्या सर्व लोकांपेक्षा आणि इजिप्तच्या सर्व ज्ञानापेक्षा अफाट होती.+ ३१  इतर कोणत्याही माणसापेक्षा तो जास्त बुद्धिमान होता; तो एथान+ एज्राही आणि माहोलची मुलं हेमान,+ कल्कोल+ व दर्दा यांच्यापेक्षाही बुद्धिमान होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.+ ३२  त्याने ३,००० नीतिवचनं रचली,*+ आणि त्याची १,००५ गीतंही+ होती. ३३  तो लबानोनच्या देवदार वृक्षांपासून ते भिंतीवर उगवणाऱ्‍या एजोबच्या*+ रोपट्यांपर्यंत सर्व वनस्पतींबद्दल बोलायचा; प्राणी,+ पक्षी,+ सरपटणारे प्राणी,+ कीटक आणि मासे यांबद्दलही तो बोलायचा. ३४  शलमोनच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक त्याच्याकडे यायचे; तसंच, पृथ्वीवरच्या ज्या राजांनी त्याच्या बुद्धीबद्दल ऐकलं, तेसुद्धा त्याच्याकडे यायचे.+

तळटीपा

म्हणजे, फरात नदी.
एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.
हरणाची एक जात.
म्हणजे, फरात नदीच्या पश्‍चिमेकडे.
ही संख्या काही हस्तलिखितांमध्ये आणि समांतर अहवालांमध्ये आढळते. तर इतर काही हस्तलिखितांमध्ये ४०,००० संख्या आढळते.
किंवा “घोडेस्वारसुद्धा.”
किंवा “सुज्ञ मन दिलं.” शब्दशः “विशाल मन.”
किंवा “म्हटली.”