१ राजे ५:१-१८

  • हीराम राजा बांधकामासाठी लागणारं साहित्य पुरवतो (१-१२)

  • शलमोन सक्‍तीची मजुरी करायला माणसं नेमतो (१३-१८)

 सोरचा+ राजा हीराम याला जेव्हा समजलं, की शलमोनला त्याच्या वडिलांच्या जागी राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आलं आहे, तेव्हा त्याने शलमोनकडे आपले सेवक पाठवले. कारण, दावीदसोबत हीरामचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.*+ २  म्हणून मग शलमोनने हीरामला असा निरोप पाठवला:+ ३  “तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या वडिलांना, दावीदला त्यांचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मंदिर बांधता आलं नाही. कारण यहोवाने त्यांच्या सगळ्या शत्रूंना त्यांच्या पायाखाली देईपर्यंत, त्यांना आजूबाजूच्या सर्व शत्रूंशी लढाई करावी लागली.+ ४  पण आता माझा देव यहोवा याने मला चारही बाजूंनी शांती दिली आहे;+ कोणी विरोध करणारा नाही आणि काही संकटही नाही.+ ५  म्हणून यहोवाने माझ्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे, मला माझा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मंदिर बांधायची इच्छा आहे. त्याने माझ्या वडिलांना, दावीदला असं वचन दिलं होतं: ‘तुझ्या ज्या मुलाला मी तुझ्या जागी राजासनावर बसवीन, तोच माझ्या नावाच्या गौरवासाठी एक घर बांधेल.’+ ६  तर आता तुमच्या लोकांना माझ्यासाठी लबानोनचे देवदार वृक्ष कापण्याची आज्ञा द्या.+ माझे सेवक तुमच्या सेवकांबरोबर काम करतील आणि तुम्ही ठरवाल ती मजुरी मी तुमच्या सेवकांना देईन. कारण तुम्हाला माहीत आहे, की आमच्यापैकी कोणामध्येही सीदोनी लोकांसारखं झाड कापण्याचं कौशल्य नाही.”+ ७  हीरामने शलमोनचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला: “आज यहोवाची स्तुती होवो! कारण त्याने या मोठ्या* प्रजेवर राज्य करायला दावीदला एक बुद्धिमान मुलगा दिला आहे!”+ ८  म्हणून हीरामने शलमोनला असं कळवलं: “तू पाठवलेला संदेश मी ऐकलाय. तुझ्या इच्छेप्रमाणे देवदाराची आणि गंधसरूची लाकडं+ पुरवण्यासाठी तुला जी काही मदत हवी असेल ती मी करीन. ९  माझे सेवक लबानोनवरून समुद्रापर्यंत लाकडाचे ओंडके घेऊन येतील. मग त्यांचे तराफे* बनवून तू सांगशील त्या ठिकाणी ते समुद्रमार्गाने मी पोहोचते करीन. तिथे ते तराफे सुटे केल्यावर तू ते घेऊन जाऊ शकतोस. मग याच्या बदल्यात मी सांगीन ती अन्‍नसाम्रगी तू माझ्या घराण्यासाठी पुरव.”+ १०  हीरामने मग शलमोनला हवी तेवढी देवदाराची आणि गंधसरूची लाकडं पुरवली. ११  आणि शलमोनने अन्‍नसामग्री म्हणून हीरामला त्याच्या घराण्यासाठी २०,००० कोर* मापं गहू आणि २० कोर मापं उच्च प्रतीचं जैतुनाचं तेल* दिलं. शलमोन दरवर्षी इतकी अन्‍नसामग्री हीरामला द्यायचा.+ १२  यहोवाने शलमोनला वचन दिलं होतं त्याप्रमाणे त्याने त्याला बुद्धी दिली.+ हीराम आणि शलमोन यांच्यामध्ये शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी एकमेकांसोबत मैत्रीचा करार केला. १३  शलमोनने संपूर्ण इस्राएलमधून ३०,००० माणसांना सक्‍तीची मजुरी करायला नेमलं.+ १४  तो दहा-दहा हजार माणसांना दर महिन्याला आळीपाळीने लबानोनला पाठवायचा. ते एक महिना तिथे जाऊन काम करायचे आणि दोन महिने आपल्या घरी राहायचे. सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍या या लोकांवर अदोनीराम हा अधिकारी होता.+ १५  शलमोनकडे ओझी वाहणारे ७०,००० मजूर आणि डोंगरांवर दगड फोडणारे+ ८०,००० मजूर होते.+ १६  याशिवाय, शलमोनचे ३,३०० प्रमुख अधिकारी,+ मुकादम म्हणून कामगारांवर देखरेख करण्याचं काम करायचे. १७  मंदिराचा पाया,+ घडवलेल्या दगडांनी+ घालण्यासाठी कामगारांनी राजाच्या आज्ञेवरून खाणीतून मोठमोठे आणि महागडे दगड+ काढून आणले. १८  मग शलमोनच्या आणि हीरामच्या कामगारांनी, तसंच गिबली+ लोकांनी ते दगड कापण्याचं काम केलं. शिवाय, मंदिर बांधण्यासाठी त्यांनी लाकूड आणि दगड तयार केले.

तळटीपा

किंवा “दावीदवर हीरामचं नेहमीच प्रेम होतं.”
किंवा “अगणित.”
लाकडं एकमेकांना जोडून पाण्यातून जाण्यासाठी तयार केलेलं एक साधन.
एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “जैतून कुटून काढलेलं तेल.”