१ राजे ६:१-३८

  • शलमोन मंदिर बांधतो (१-३८)

    • आतली खोली (१९-२२)

    • करूब (२३-२८)

    • कोरीव काम, दरवाजे, आतलं अंगण (२९-३६)

    • मंदिराचं बांधकाम सुमारे सात वर्षांत पूर्ण होतं (३७, ३८)

 इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्याच्या ४८० व्या वर्षी,+ म्हणजे शलमोन इस्राएलचा राजा बनला त्याच्या चौथ्या वर्षी, जिव* महिन्यात+ (म्हणजे दुसऱ्‍या महिन्यात) त्याने यहोवासाठी मंदिर* बांधायला सुरुवात केली.+ २  शलमोन राजाने यहोवासाठी बांधलेलं मंदिर ६० हात* लांब, २० हात रुंद आणि ३० हात उंच होतं.+ ३  मंदिराच्या* द्वारमंडपाची+ लांबी* २० हात, म्हणजे मंदिराच्या रुंदीइतकीच होती. आणि मंदिरापासून पुढे मोजलं, तर त्या द्वारमंडपाची रुंदी दहा हात होती. ४  त्याने मंदिराला खिडक्या बनवल्या; त्या आतून बाहेर निमुळत्या आकाराच्या होत्या.+ ५  शिवाय, त्याने मंदिराच्या भिंतीला लागून एक इमारतही बांधली. ती मंदिराच्या भिंतींभोवती,* म्हणजे मंदिराच्या* आणि आतल्या खोलीच्या*+ भिंतीभोवती बांधली होती; त्याने सर्व बाजूंना खोल्याही बांधल्या.+ ६  इमारतीच्या सर्वात खालच्या मजल्याची रुंदी पाच हात, मधल्या मजल्याची रुंदी सहा हात आणि तिसऱ्‍या मजल्याची रुंदी सात हात होती. त्याने मंदिराची भिंत सर्व बाजूंनी अशा प्रकारे बनवली, की तुळया* ठेवण्यासाठी आधार मिळेल. त्यामुळे तुळया घुसवण्यासाठी मंदिराच्या भिंतीमध्ये खाचा पाडण्याची गरज पडली नाही.+ ७  मंदिर बांधण्यासाठी लागणारे दगड आधीच खाणीत घडवून तयार केले होते.+ त्यामुळे मंदिर बांधलं जात असताना तिथे हातोडे, कुऱ्‍हाडी किंवा कोणत्याही लोखंडी हत्यारांचा आवाज झाला नाही. ८  इमारतीच्या सगळ्यात खालच्या मजल्याचं प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिणेकडे* होतं.+ मधल्या मजल्यावर जाण्यासाठी व तिथून तिसऱ्‍या मजल्यावर जाण्यासाठी एक नागमोडी जिनाही होता. ९  अशा प्रकारे त्याने मंदिराचं बांधकाम चालू ठेवलं आणि ते पूर्ण केलं.+ त्याने देवदार लाकडाच्या तुळया आणि तक्‍ते*+ वापरून मंदिराचं छत बांधलं. १०  मंदिराभोवती बांधलेल्या इमारतीचा+ प्रत्येक मजला पाच हात उंच होता. आणि तो देवदाराच्या लाकडांनी मंदिराला जोडला होता. ११  यादरम्यान, यहोवाकडून शलमोनला असा संदेश मिळाला: १२  “तू जर माझ्या कायद्यांप्रमाणे चाललास, माझे नियम पाळलेस आणि माझ्या सर्व आज्ञांनुसार चालून त्यांचं पालन केलंस,+ तर मीही तुझ्या वडिलांना, दावीदला तुझ्याविषयी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करीन;+ खासकरून तू बांधत असलेल्या या मंदिराविषयीचं वचन मी पूर्ण करीन. १३  मी इस्राएली लोकांमध्ये राहीन,+ आणि माझ्या इस्राएली लोकांचा मी त्याग करणार नाही.”+ १४  शलमोनने मंदिर बांधण्याचं काम पूर्ण केलं. १५  त्याने मंदिराच्या आतल्या भिंती देवदाराच्या तक्त्यांनी बनवल्या; त्याने खालपासून छतापर्यंत भिंती लाकडाने मढवल्या. शिवाय त्याने मंदिराच्या जमिनीवर गंधसरूचे तक्‍ते बसवले.+ १६  मंदिराच्या मागच्या बाजूला त्याने २० हात लांबीची एक खोली बनवली; ती खोली जमिनीपासून छतापर्यंत देवदाराच्या तक्त्यांनी बनवण्यात आली होती. त्याने त्याच्यात* आतली खोली,+ म्हणजे परमपवित्र स्थान बनवलं.+ १७  त्याच्यासमोरचा मंदिराचा+ भाग* ४० हात लांब होता. १८  मंदिराच्या आत असलेल्या देवदाराच्या लाकडांवर खरबुजाच्या+ आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरण्यात आल्या होत्या.+ मंदिराच्या भिंती देवदाराच्या लाकडांनी मढवलेल्या होत्या, त्यामुळे भिंतींचे दगड दिसत नव्हते. १९  यहोवाच्या कराराची पेटी+ ठेवण्यासाठी त्याने मंदिराची आतली खोली+ तयार केली. २०  आतली खोली २० हात लांब, २० हात रुंद आणि २० हात उंच होती.+ त्याने ती खोली शुद्ध सोन्याने मढवली; आणि त्याने वेदीही+ देवदाराच्या लाकडाने मढवली. २१  शलमोनने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढवलं.+ त्याने सोन्याने मढवलेल्या आतल्या खोलीसमोर+ सोन्याच्या साखळ्या लावल्या. २२  त्याने ते संपूर्ण मंदिर सोन्याने मढवलं. आतल्या खोलीजवळ असलेली संपूर्ण वेदीही त्याने सोन्याने मढवली.+ २३  त्याने आतल्या खोलीसाठी पाईन वृक्षाच्या लाकडापासून* दोन करूब+ बनवले. प्रत्येक करुबाची उंची दहा हात होती.+ २४  करुबाच्या एका पंखाची लांबी पाच हात, आणि दुसऱ्‍या पंखाची लांबी पाच हात होती; एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्‍या पंखाच्या टोकापर्यंत एकूण लांबी दहा हात होती. २५  दुसऱ्‍या करुबाच्या पंखांची एकूण लांबीही दहा हात होती. दोन्ही करूब सारख्याच आकाराचे आणि मापाचे होते. २६  दोन्ही करुबांची उंची सारखीच, म्हणजे दहा हात होती. २७  मग त्याने ते दोन्ही करूब+ मंदिराच्या आतल्या खोलीत* ठेवले. करुबांचे पंख असे पसरले होते, की एका करुबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला, आणि दुसऱ्‍या करुबाचा एक पंख दुसऱ्‍या बाजूच्या भिंतीला लागायचा. शिवाय त्यांचे बाकीचे दोन पंख खोलीच्या मधल्या बाजूला असे पसरले होते, की ते एकमेकांना लागायचे. २८  आणि त्याने ते करूब सोन्याने मढवले. २९  मंदिराच्या सगळ्या भिंतींवर, म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या खोलीच्या सगळ्या भिंतींवर त्याने करुबांच्या,+ खजुराच्या झाडांच्या+ आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरल्या.+ ३०  त्याने मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या खोलीची जमीन सोन्याने मढवली. ३१  आतल्या खोलीच्या प्रवेशासाठी त्याने पाईन लाकडाचे दोन दरवाजे, बाजूचे दोन स्तंभ आणि दाराची चौकट बनवली; एक पाचवा भाग बनवला.* ३२  पाईन लाकडाच्या त्या दोन दरवाजांवर त्याने करुबांच्या, खजुराच्या झाडांच्या आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरल्या आणि त्या सोन्याने मढवल्या; त्याने करूब आणि खजुराची झाडं सोनं ठोकून मढवली. ३३  मंदिराच्या* प्रवेशद्वारासाठीही त्याने अशाच प्रकारे पाईन लाकडाची चौकट बनवली; हा चौथा भाग होता.* ३४  त्याने गंधसरूच्या लाकडाची दोन दारं बनवली. प्रत्येक दार घडीचं असल्यामुळे ते मधोमध दुमडलं जायचं.+ ३५  त्याने त्यांवर करुबांच्या, खजुराच्या झाडांच्या आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरल्या, आणि त्या सोन्याने मढवल्या. ३६  त्याने आतल्या अंगणाची+ भिंत बांधली. ती भिंत घडवलेल्या दगडांच्या तीन थरांनी आणि देवदाराच्या तुळयांच्या एका रांगेने बांधलेली होती.+ ३७  शलमोन राजाच्या शासनाच्या चौथ्या वर्षाच्या जिव* महिन्यात, यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्यात आला;+ ३८  आणि ११ व्या वर्षाच्या बूल* महिन्यात, म्हणजे आठव्या महिन्यात त्याचं बांधकाम पूर्ण झालं. मंदिरासाठी जो नमुना आणि बारकावे देण्यात आले होते,+ अगदी त्यांप्रमाणेच ते बांधण्यात आलं. अशा प्रकारे, शलमोनला मंदिर बांधण्यासाठी सात वर्षं लागली.

तळटीपा

अति. ख८ पाहा.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
शब्दशः “‘मंदिर,’ हे पवित्र स्थानाला सूचित करतं असं दिसतं.”
किंवा “रुंदी.”
म्हणजे, परमपवित्र स्थान.
या ठिकाणी हे पवित्र स्थानाला सूचित करतं.
म्हणजे, तीन बाजूंना.
बीम; छताला आधार देणारा लाकडाचा लांब ओंडका.
शब्दशः “उजवीकडे.”
किंवा “मोठ्या फळ्या.”
म्हणजे, मंदिराच्या आत.
म्हणजे, परमपवित्र स्थानासमोरचं पवित्र स्थान.
शब्दशः “तेलाचं लाकूड,” कदाचित अलेप्पो पाईन वृक्ष.
म्हणजे, परमपवित्र स्थान.
इथे कदाचित दाराच्या चौकटीच्या रचनेविषयी किंवा दाराच्या मापाविषयी सांगितलं आहे.
या ठिकाणी हे पवित्र स्थानाला सूचित करतं.
इथे कदाचित दाराच्या चौकटीच्या रचनेविषयी किंवा दाराच्या मापाविषयी सांगितलं आहे.