१ राजे ७:१-५१

  • शलमोनचा राजमहाल आणि इतर इमारती (१-१२)

  • शलमोनला कुशल कारागीर हीरामची मदत (१३-४७)

    • तांब्याचे दोन स्तंभ (१५-२२)

    • ओतीव गंगाळ-सागर (२३-२६)

    • दहा गाड्या आणि तांब्याची गंगाळं (२७-३९)

  • सोन्याच्या वस्तू बनवण्याचं काम संपतं (४८-५१)

 शलमोनला स्वतःचा राजमहाल बांधून पूर्ण करायला+ १३ वर्षं लागली.+ २  त्याने लबानोन-वनगृह+ नावाची एक इमारतही बांधली. तिची लांबी १०० हात,* रुंदी ५० हात आणि उंची ३० हात होती. ती देवदार लाकडाने बनवलेल्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; आणि त्या खांबांवर देवदार लाकडाच्या तुळया*+ होत्या. ३  तुळयांनी बनलेल्या या साच्यावर त्याने देवदार लाकडाचे तक्‍ते* टाकून इमारत उभी केली; त्यांची एकूण संख्या ४५, म्हणजे प्रत्येक रांगेत १५* होती. ४  या इमारतीला तीन मजले व चौकटी असलेल्या खिडक्यांच्या तीन रांगा होत्या; या सगळ्या खिडक्या समोरासमोर होत्या. ५  इमारतीची सर्व प्रवेशद्वारं आणि त्यांच्या चौकटी चौरस* होत्या. तसंच, तिन्ही मजल्यांवर समोरासमोर असलेल्या खिडक्यांच्या चौकटीही चौरस होत्या. ६  त्याने एक स्तंभ-गृहसुद्धा बनवलं. त्याची लांबी ५० हात आणि रुंदी ३० हात होती. त्याच्यासमोर छत असलेला खांबांचा एक वऱ्‍हांडाही होता. ७  याशिवाय, त्याने राजासन-गृह+ म्हणजे न्याय-गृहसुद्धा+ बांधलं; तिथून तो न्यायनिवाडा करायचा. त्या गृहाला जमिनीपासून छतापर्यंत देवदाराच्या लाकडाचे तक्‍ते बसवण्यात आले होते. ८  शलमोनने राजासन-गृहाच्या मागच्या बाजूला, दुसऱ्‍या अंगणात+ एक राजमहाल बांधला; तिथे तो राहणार होता. राजासन-गृह ज्या पद्धतीने बांधण्यात आलं, त्याच पद्धतीने हा राजमहालही बांधण्यात आला. शलमोनने आपल्या बायकोसाठी,+ म्हणजे फारोच्या मुलीसाठीही असाच महाल बांधला. ९  या सगळ्या इमारती घडवलेल्या आणि महागड्या दगडांनी+ बांधण्यात आल्या होत्या. हे दगड मोजमाप घेऊन सर्व बाजूंनी करवतींनी व्यवस्थित कापलेले होते. इमारतींच्या पायापासून ते भिंतीच्या टोकापर्यंत आणि अगदी बाहेरच्या मोठ्या अंगणापर्यंत+ असेच दगड वापरण्यात आले होते. १०  इमारतींचा पाया मोठमोठ्या आणि महागड्या दगडांनी घालण्यात आला होता; काही दगडांचं माप आठ हात, तर काही दगडांचं माप दहा हात होतं. ११  त्यांवर मापानुसार घडवलेले महागडे दगड आणि देवदाराची लाकडंही होती. १२  मोठ्या अंगणाच्या सभोवती असलेली भिंत घडवलेल्या दगडांच्या तीन थरांनी आणि देवदाराच्या तुळयांच्या एका रांगेने बांधलेली होती. ती भिंत यहोवाच्या मंदिरातल्या आतल्या अंगणाच्या+ आणि घराच्या द्वारमंडपाच्या+ भिंतीसारखी होती. १३  शलमोन राजाने सोर इथून हीरामला+ बोलावून घेतलं. १४  तो नफताली वंशातल्या एका विधवेचा मुलगा होता. त्याचे वडील सोरचे राहणारे असून तांब्याची कामं करणारे होते.+ हीरामकडे तांब्याची* सर्व प्रकारची कामं करण्यासाठी लागणारं खास कौशल्य, ज्ञान+ आणि अनुभव होता. तो शलमोन राजाकडे आला आणि त्याने त्याची सर्व कामं करून दिली. १५  त्याने तांब्याचे दोन ओतीव* स्तंभ तयार केले.+ प्रत्येक स्तंभ १८ हात उंच होता, आणि त्याचा घेर मोजायला १२ हात लांबीची दोरी लागायची.*+ १६  या स्तंभांच्या वर ठेवण्यासाठी त्याने तांब्याचे दोन ओतीव कळस तयार केले. प्रत्येक कळस पाच हात उंचीचा होता. १७  स्तंभांवर असलेले कळस हे गुंफलेल्या साखळ्यांच्या नक्षीदार जाळीने सजवलेले होते;+ दोन्ही कळसांना सात-सात साखळ्या होत्या. १८  स्तंभांवर असलेल्या कळसाभोवतीची जाळी त्याने डाळिंबाच्या दोन रांगांनी सजवली होती; त्याने दोन्ही स्तंभ असेच सजवले. १९  मंदिराच्या द्वारमंडपासमोर असलेल्या स्तंभांच्या कळसांचा वरचा भाग भुईकमळाच्या* आकाराचा असून तो चार हात उंचीचा होता. २०  स्तंभांवर असलेले कळस हे जाळीला लागून असलेल्या गोलाकार भागावर होते; आणि प्रत्येक कळसाच्या सभोवती २०० डाळिंबांच्या रांगा होत्या.+ २१  त्याने हे दोन्ही स्तंभ मंदिराच्या* द्वारमंडपासमोर उभे केले.+ त्याने उजवीकडे* एक स्तंभ उभा केला, आणि त्याला याखीन* असं नाव दिलं. त्यानंतर त्याने डावीकडे* दुसरा स्तंभ उभा केला, आणि त्याला बवाज* असं नाव दिलं.+ २२  स्तंभांचा वरचा भाग भुईकमळाच्या आकाराचा होता. अशा प्रकारे स्तंभ बनवण्याचं काम संपलं. २३  मग त्याने धातूचा एक मोठा ओतीव गंगाळ-सागर* तयार केला.+ तो गोलाकार असून त्याचा व्यास १० हात आणि त्याची उंची ५ हात होती. त्याचा घेर मोजायला ३० हात लांब दोरी लागायची.*+ २४  गंगाळाच्या काठाच्या खालच्या घेरावर सर्व बाजूंनी खरबुजाच्या आकृत्यांच्या+ दोन रांगा होत्या. एकेका हाताच्या अंतरात दहा-दहा खरबुजांची सजावट केलेली होती. गंगाळाचं ओतीव काम करतानाच त्या रांगा गंगाळासोबत अखंड तयार करण्यात आल्या होत्या. २५  तो गंगाळ-सागर १२ बैलांवर+ ठेवण्यात आला होता. त्यांपैकी तीन बैलांची तोंडं उत्तरेकडे, तीन बैलांची पश्‍चिमेकडे, तीन बैलांची दक्षिणेकडे आणि तीन बैलांची तोंडं पूर्वेकडे होती. त्या बैलांचे मागचे भाग आतल्या बाजूला होते, आणि त्यांच्या पाठींवर गंगाळ-सागर आधारलेला होता. २६  त्या गंगाळाची जाडी चार बोटं* होती. त्याचा काठ एखाद्या प्याल्याच्या काठासारखा, उमललेल्या भुईकमळासारखा होता. त्यात २,००० बथ* पाणी मावायचं. २७  मग त्याने हाताने ढकलता येतील अशा तांब्याच्या दहा गाड्या*+ तयार केल्या. प्रत्येक गाडी चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होती. २८  या गाड्यांची रचना अशी होती: गाड्यांच्या बाजूंना पत्रे असून ते उभ्या-आडव्या पट्ट्यांच्या मधे होते. २९  उभ्या-आडव्या पट्ट्यांच्या मधे असलेल्या पत्र्यांवर सिंह,+ बैल आणि करूब+ यांच्या आकृत्या कोरल्या होत्या. अशीच रचना उभ्या-आडव्या पट्ट्यांवरही होती. सिंह व बैल यांच्या आकृत्यांच्या वर आणि खाली लोंबत्या माळा कोरलेल्या होत्या. ३०  प्रत्येक गाडीला तांब्याची चार चाकं असून त्यांचे आस* तांब्याचेच होते. आणि चाकांना आधार देण्यासाठी गाडीच्या चारही कोपऱ्‍यांवर दांडे होते. हेच दांडे वर गंगाळालाही आधार देत होते. हे दांडेसुद्धा ओतीव असून त्यांच्या बाजूंवर लोंबत्या माळा कोरलेल्या होत्या. ३१  गंगाळाचं तोंड गाडीच्या वरच्या भागाच्या आत बसवलं होतं. गाडीचा हा वरचा भाग गोलाकार होता. या भागाच्या खालच्या कडापासून गंगाळाच्या तळापर्यंतचं अंतर एक हात होतं. अशा प्रकारे, गाडीच्या वरच्या भागापासून गंगाळाच्या तळापर्यंत असलेल्या आधाराचं एकूण अंतर दीड हात होतं. आणि गाडीच्या या वरच्या भागावर कोरीव काम केलेलं होतं. याच्या बाजूंना असलेले पत्रे गोलाकार नसून चौकोनी होते. ३२  गाडीची चार चाकं गाडीच्या बाजूंना असलेल्या पत्र्यांच्या खाली होती. आणि चाकांना आधार देणारे दांडे गाडीला जोडलेले होते. प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती. ३३  चाकांची रचना रथांच्या चाकांसारखी होती. त्यांच्या कडा, आस, आऱ्‍या आणि चाकांचा मधला भाग हे सगळं तांब्याच्या ओतीव कामाचं होतं. ३४  प्रत्येक गाडीच्या चार कोपऱ्‍यांवर आधार देणारे दांडे होते. हे दांडेसुद्धा, गाडीचं ओतीव काम करतानाच गाडीसोबत अखंड तयार करण्यात आले होते. ३५  गाडीचा वरचा भाग हा एक गोलाकार पट्टा असून त्याची उंची अर्धा हात होती. गाडीच्या या वरच्या भागावर असलेल्या पट्ट्या आणि त्यांच्या मधे असलेले पत्रे हे सगळे गाडीचं ओतीव काम करतानाच अखंड तयार करण्यात आले होते. ३६  त्याच्या पत्र्यांवर आणि पट्ट्यांवर जिथे कुठे जागा असेल तिथे करूब, सिंह आणि खजुराची झाडं यांच्या आकृत्या कोरल्या होत्या. तसंच, सभोवती लोंबत्या माळा कोरलेल्या होत्या.+ ३७  अशा प्रकारे, हाताने ढकलता येतील अशा दहा गाड्या+ त्याने बनवल्या. सगळ्या गाड्यांचं ओतीव काम एकसारखं+ असून त्यांचं मोजमाप आणि त्यांचा आकारही सारखाच होता. ३८  त्याने तांब्याची दहा गंगाळंही बनवली.+ प्रत्येकात ४० बथ पाणी मावू शकत होतं. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता. आणि दहा गाड्यांसाठी प्रत्येकी एकेक गंगाळ होतं. ३९  त्याने पाच गाड्या मंदिराच्या उजवीकडे आणि पाच गाड्या मंदिराच्या डावीकडे ठेवल्या. आणि मोठा गंगाळ-सागर मंदिराच्या उजवीकडे, म्हणजे दक्षिणपूर्वेकडे ठेवला.+ ४०  तसंच हीरामने+ गंगाळं, फावडी+ आणि कटोरेसुद्धा+ बनवले. अशा प्रकारे, हीरामने शलमोन राजासाठी यहोवाच्या मंदिराचं सर्व काम पूर्ण केलं.+ त्याने बनवलेल्या वस्तू या: ४१  दोन स्तंभ+ आणि त्यांच्या वर असलेले कटोऱ्‍याच्या आकाराचे दोन कळस; स्तंभांच्या टोकांवर असलेल्या या कळसांना सजवण्यासाठी दोन नक्षीदार जाळ्या;+ ४२  स्तंभांवरचे कळस सजवण्याकरता असलेल्या या दोन जाळ्यांसाठी ४०० डाळिंबं+ (प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या); ४३  हाताने ढकलता येतील अशा दहा गाड्या+ आणि त्यांवरची दहा गंगाळं;+ ४४  मोठा गंगाळ-सागर+ आणि त्याच्या खाली असलेले १२ बैल; ४५  आणि राख काढायच्या बादल्या, फावडी, कटोरे आणि सर्व भांडी. शलमोन राजाच्या सांगण्यानुसार, हीरामने यहोवाच्या मंदिरासाठी बनवलेल्या या सर्व वस्तू चकाकी दिलेल्या तांब्याच्या होत्या. ४६  राजाने या सर्व वस्तू यार्देन प्रांतात, सुक्कोथ आणि सारतानच्या मधल्या प्रदेशात मातीच्या साच्यात ओतून तयार केल्या होत्या. ४७  ही सर्व भांडी खूपच जास्त असल्यामुळे शलमोनने त्यांचं वजन केलं नाही. आणि म्हणून नेमकं किती तांबं वापरण्यात आलं ते समजू शकलं नाही.+ ४८  शलमोनने यहोवाच्या मंदिरासाठी लागणाऱ्‍या या सर्व वस्तू तयार केल्या: सोन्याची वेदी;+ अर्पणाची भाकर ठेवण्यासाठी सोन्याचे मेज;+ ४९  सोन्याचे दीपवृक्ष+​—आतल्या खोलीसमोर उजवीकडे पाच आणि डावीकडे पाच; सोन्याच्या पाकळ्या,+ सोन्याचे दीप आणि सोन्याचे चिमटे.+ ५०  तसंच शुद्ध सोन्याची गंगाळं, आग विझवण्यासाठी कातरी,+ कटोरे, प्याले,+ धूप जाळण्याची पात्रं;+ तसंच, आतल्या खोलीच्या म्हणजे परमपवित्र स्थानाच्या, तसंच मंदिराच्या पवित्र स्थानाच्या दरवाजांसाठी+ सोन्याच्या बिजागऱ्‍या बनवल्या.+ ५१  अशा रितीने, शलमोन राजाने यहोवाच्या मंदिराचं सगळं काम संपवलं. मग त्याने आपले वडील दावीद यांनी पवित्र केलेल्या वस्तू आत आणल्या;+ त्याने चांदी, सोनं आणि सगळ्या वस्तू यहोवाच्या मंदिराच्या भांडारात आणल्या.+

तळटीपा

बीम; छताला आधार देणारा लाकडाचा लांब ओंडका.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “मोठ्या फळ्या.”
‘१५’ ही संख्या कशाला सूचित करते हे निश्‍चित नाही; ती खांबांना, खोल्यांना किंवा तुळयांना सूचित करत असावी.
किंवा “आयताकार.”
किंवा “कांस्याची; ब्रॉन्झची,” इथे आणि या अध्यायात येणाऱ्‍या वचनांत जिथे तांबं म्हटलं आहे तिथे ब्रॉन्झ असू शकतं.
साच्यात ओतून तयार केलेले.
किंवा “प्रत्येक स्तंभाचा परीघ १२ हात होता.”
किंवा “लिली फुलाच्या.”
“त्याच्यात सामर्थ्य आहे,” असा कदाचित याचा अर्थ असावा.
किंवा “उत्तरेकडे.”
म्हणजे, “तो [अर्थात, यहोवा] कायमचं स्थापित करो.”
किंवा “दक्षिणेकडे.”
या ठिकाणी हे पवित्र स्थानाला सूचित करतं.
किंवा “त्याचा परीघ ३० हात होता.”
किंवा “पाण्याचा मोठा हौद.”
सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.
एक बथ म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “पाण्याच्या हातगाड्या.”
चाकांना जोडणारे दांडे.