१ राजे ९:१-२८

  • यहोवा पुन्हा शलमोनला दर्शन देतो (१-९)

  • शलमोनने हीराम राजाला दिलेली भेट (१०-१४)

  • शलमोनचे वेगवेगळे बांधकाम प्रकल्प (१५-२८)

 शलमोनने यहोवाचं मंदिर, आपला राजमहाल+ आणि त्याच्या मनात होतं ते सगळं बांधून पूर्ण केलं,+ त्यानंतर लगेचच २  यहोवाने त्याला दर्शन दिलं. देवाने शलमोनला गिबोनमध्ये पहिल्यांदा दर्शन दिलं होतं,+ तसंच या वेळीही त्याला दर्शन दिलं. ३  यहोवा त्याला म्हणाला: “तू मला केलेली प्रार्थना आणि कृपेसाठी केलेली विनंती मी ऐकली आहे. तू बांधलेल्या मंदिराला मी कायमचं माझं नाव देऊन ते पवित्र केलंय.+ माझी दृष्टी आणि माझं मन नेहमी तिथे राहील.+ ४  तू जर तुझे वडील दावीद यांच्यासारखं माझ्यासमोर खऱ्‍या मनाने+ आणि सरळ मार्गाने+ चाललास,+ माझ्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केलंस,+ माझे न्याय-निर्णय* आणि कायदे पाळलेस,+ ५  तर मी तुझ्या वडिलांना, दावीदला वचन दिलं होतं त्याप्रमाणे इस्राएलवर तुझं राजासन कायमचं स्थापन करीन. मी दावीदला म्हणालो होतो: ‘इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ ६  पण जर तुम्ही आणि तुमची मुलं माझ्या मार्गापासून भरकटली, मी दिलेल्या आज्ञांचं व कायद्यांचं तुम्ही पालन केलं नाही आणि तुम्ही जाऊन दुसऱ्‍या दैवतांची उपासना केलीत व त्यांच्या पाया पडलात,+ ७  तर मी इस्राएलला दिलेल्या देशातून त्यांना घालवून देईन,+ मी माझ्या नावाच्या गौरवासाठी पवित्र केलेलं मंदिर माझ्या नजरेपासून दूर करीन+ आणि इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टेचा आणि निंदेचा विषय बनेल.+ ८  हे मंदिर उद्ध्‌वस्त होऊन त्याचा ढिगारा बनेल.+ येणारा-जाणारा प्रत्येक जण ते पाहून चकित होईल आणि थट्टेने डोकं हालवून* म्हणेल: ‘यहोवाने या देशाची आणि या मंदिराची अशी दशा का केली?’+ ९  मग ते म्हणतील, की ‘ज्या देवाने त्यांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं, त्या यहोवा देवाला त्यांनी सोडून दिलं. त्यांनी इतर दैवतांना जवळ केलं आणि त्यांच्या पाया पडून त्यांची उपासना केली. म्हणूनच यहोवाने हे संकट त्यांच्यावर आणलंय.’”+ १०  शलमोनला दोन्ही इमारती, म्हणजे यहोवाचं मंदिर आणि आपला राजमहाल बांधून पूर्ण करायला २० वर्षं लागली.+ ११  सोरचा राजा हीराम+ याने शलमोनला देवदाराची व गंधसरूची लाकडं पुरवली. तसंच, त्याला जितकं सोनं हवं होतं तितकं सोनंही त्याने त्याला पुरवलं.+ म्हणून शलमोन राजाने हीरामला गालीलच्या प्रदेशातली २० शहरं दिली. १२  मग शलमोनने दिलेली शहरं पाहायला हीराम सोरमधून तिथे गेला. पण ती शहरं पाहून तो खूश झाला नाही.* १३  तो म्हणाला: “माझ्या भावा, असली कसली शहरं दिलीस तू मला?” म्हणून आजपर्यंत ती शहरं काबुलचा देश* या नावाने ओळखली जातात. १४  हीरामने शलमोन राजाला १२० तालान्त* सोनं पाठवलं.+ १५  शलमोन राजाने ज्या लोकांना यहोवाचं मंदिर,+ आपला राजमहाल, टेकडी,*+ यरुशलेम शहराची भिंत, हासोर,+ मगिद्दो+ आणि गेजेर+ बांधण्यासाठी सक्‍तीची मजुरी करायला लावली होती, त्यांचा हा अहवाल आहे.+ १६  (इजिप्तचा राजा फारो याने गेजेर शहर काबीज करून ते जाळून टाकलं होतं. आणि त्यात राहणाऱ्‍या कनानी लोकांनाही त्याने मारून टाकलं होतं.+ त्याने ते शहर शलमोनच्या बायकोला, म्हणजे आपल्या मुलीला+ लग्नाच्या वेळी भेट* म्हणून दिलं होतं.) १७  शलमोनने जी शहरं पुन्हा बांधली ती ही: गेजेर, खालचं बेथ-होरोन,+ १८  बालाथ+ आणि देशातल्या ओसाड रानातलं तामार. १९  तसंच त्याने कोठारांसाठी, रथांसाठी आणि घोडेस्वारांसाठीही शहरं बांधली.+ याशिवाय शलमोनने यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि त्याच्या अधिकाराखाली असलेल्या संपूर्ण देशात त्याला जे काही बांधायचं होतं ते बांधलं. २०  इस्राएली लोकांपैकी नसलेले+ अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ यांच्यापैकी उरलेल्या सर्व लोकांना, २१  म्हणजे देशात उरलेल्या त्यांच्या वंशजांना (ज्यांचा इस्राएली लोक पूर्णपणे नाश करू शकले नाहीत), शलमोनने सक्‍तीची मजुरी करायला लावली आणि आजपर्यंत ते हेच काम करत आहेत.+ २२  पण शलमोनने इस्राएली लोकांपैकी कोणालाही दास बनवलं नाही;+ ते त्याचे योद्धे, सेवक, अधिकारी, सहायक सेनाधिकारी आणि त्याच्या रथस्वारांचे व घोडेस्वारांचे प्रमुख होते. २३  शलमोनच्या कामाची देखरेख करणारे ५५० प्रमुख अधिकारी होते; ते काम करणाऱ्‍या लोकांवर देखरेख करायचे.+ २४  फारोची मुलगी+ दावीदपुरातून,+ तिच्यासाठी शलमोनने बांधलेल्या तिच्या महालात राहायला आली; मग त्याने टेकडी*+ बांधली. २५  यहोवासाठी बांधलेल्या वेदीवर शलमोन वर्षातून तीन वेळा+ होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहायचा. तसंच, यहोवासमोर असलेल्या वेदीवर तो बलिदानांचं हवनही करायचा.*+ आणि अशा प्रकारे, शलमोनने मंदिर बांधण्याचं काम पूर्ण केलं.+ २६  शलमोन राजाने एस्योन-गेबेर+ इथे जहाजांचा एक ताफासुद्धा तयार केला; एस्योन-गेबेर हे अदोम देशात,+ तांबड्या समुद्राच्या किनाऱ्‍यावर असलेल्या एलोथच्या शेजारी आहे. २७  शलमोनच्या सेवकांसोबत काम करण्यासाठी हीरामने आपल्या सेवकांनाही जहाजांचे ताफे घेऊन पाठवलं;+ त्याचे हे सेवक अनुभवी खलाशी होते. २८  ते ओफीर+ इथे गेले आणि तिथून ते शलमोन राजासाठी ४२० तालान्त सोनं घेऊन आले.

तळटीपा

शब्दशः “शिट्टी वाजवून.”
शब्दशः “ती त्याच्या दृष्टीने योग्य नव्हती.”
किंवा कदाचित, “काहीही उपयोगाचा नसलेला देश.”
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “मिल्लो.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.
किंवा “आहेर; हुंडा.”
किंवा “मिल्लो.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायचा.”