१ शमुवेल १०:१-२७

  • राजा म्हणून शौलचा अभिषेक (१-१६)

  • शौलला लोकांपुढे आणलं जातं (१७-२७)

१०  मग शमुवेलने तेलाची कुपी* घेऊन शौलच्या डोक्यावर ओतली.+ आणि त्याचा मुका घेऊन तो त्याला म्हणाला: “यहोवाने आपल्या लोकांचा*+ पुढारी होण्यासाठी तुझा अभिषेक केलाय.+ २  आज जेव्हा तू इथून जाशील, तेव्हा बन्यामीनच्या प्रदेशातल्या सेल्सह इथे राहेलच्या कबरेजवळ+ तुला दोन माणसं भेटतील. ती तुला म्हणतील: ‘तू जी गाढवं शोधायला गेला होतास ती सापडली आहेत. आणि आता तुझ्या वडिलांना गाढवांची नाही तर तुझीच काळजी लागली आहे.+ ते म्हणत आहेत: “माझा मुलगा अजून आलेला नाही, मी काय करू?”’ ३  मग तिथून पुढे ताबोरमधल्या मोठ्या झाडाकडे जा. बेथेलला+ खऱ्‍या देवाची उपासना करायला चाललेली तीन माणसं तुला तिथे भेटतील. त्यांतल्या एकाकडे बकरीची तीन पिल्लं, दुसऱ्‍याकडे तीन भाकरी आणि तिसऱ्‍याकडे द्राक्षारसाचं मोठं मडकं असेल. ४  ती माणसं तुझी ख्यालीखुशाली विचारतील आणि तुला दोन भाकरी देतील. त्या तू घे. ५  त्यानंतर तू खऱ्‍या देवाच्या टेकडीकडे पोहोचशील. तिथे पलिष्टी सैनिकांची चौकी आहे. तू शहराकडे आलास, की उच्च स्थानावरून* खाली येणारा संदेष्ट्यांचा एक गट तुला भेटेल. ते भविष्यवाण्या करत असतील आणि त्यांच्यापुढे तंतुवाद्य, डफ, बासरी आणि वीणा* वाजवली जात असेल. ६  मग यहोवाची पवित्र शक्‍ती* तुझ्यावर जोरदारपणे कार्य करू लागेल,+ आणि तूही त्यांच्यासोबत भविष्यवाणी करायला लागशील. तुझ्यात बदल होऊन तू वेगळाच मनुष्य होशील.+ ७  ही सगळी चिन्हं घडून आल्यानंतर आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुला जे काही शक्य असेल ते कर. कारण खरा देव तुझ्यासोबत आहे. ८  मग पुढे गिलगालला+ जा. मागून मी होमार्पणं आणि शांती-अर्पणं द्यायला येईन. मी येईपर्यंत सात दिवस थांबून राहा. मग तू काय-काय करायला पाहिजे ते मी तुला सांगीन.” ९  शौल शमुवेलला सोडून जायला वळला न वळला तोच देव त्याचं अंतःकरण बदलू लागला. आणि ती सगळी चिन्हं त्याच दिवशी घडून आली. १०  शौल आणि त्याचा सेवक टेकडीकडे आले, तेव्हा शौलला संदेष्ट्यांचा एक गट भेटला. त्याच क्षणी देवाची पवित्र शक्‍ती त्याच्यावर जोरदारपणे कार्य करू लागली.+ आणि तोसुद्धा त्यांच्यासोबत भविष्यवाणी करू लागला.+ ११  त्याला ओळखणाऱ्‍या लोकांनी जेव्हा त्याला संदेष्ट्यांसोबत भविष्यवाणी करताना बघितलं, तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले: “कीशच्या मुलाला काय झालंय? शौलसुद्धा संदेष्टा आहे की काय?” १२  मग तिथला एक माणूस म्हणाला: “पण त्यांचे वडील कोण आहेत?” म्हणून मग अशी एक म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्टा आहे की काय?”+ १३  भविष्यवाणी करून झाल्यानंतर शौल उच्च स्थानाकडे आला. १४  शौलच्या काकाने नंतर त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारलं: “कुठे गेला होतात तुम्ही?” तेव्हा शौल म्हणाला: “आम्ही गाढवं शोधायला गेलो होतो,+ पण ती सापडली नाहीत म्हणून शमुवेलकडे गेलो.” १५  त्यावर त्याचा काका त्याला म्हणाला: “मग काय सांगितलं शमुवेलने तुम्हाला?” १६  तेव्हा शौल म्हणाला: “त्यांनी आम्हाला सांगितलं की गाढवं सापडली आहेत.” पण राजा होण्याबद्दल शमुवेलने जे काही म्हटलं होतं, ते मात्र शौलने आपल्या काकाला सांगितलं नाही. १७  शमुवेलने नंतर इस्राएली लोकांना मिस्पामध्ये यहोवासमोर एकत्र बोलावलं.+ १८  आणि तो त्यांना म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मीच इस्राएलला इजिप्तमधून बाहेर आणलं. इजिप्तच्या लोकांपासून आणि तुमच्यावर जुलूम करणाऱ्‍या सर्व राज्यांपासून मीच तुमची सुटका केली.+ १९  पण, ज्याने तुम्हाला तुमच्या सगळ्या संकटांतून आणि दुःखांतून सोडवलं, त्या तुमच्या देवाला आज तुम्ही नाकारलंत.+ आणि म्हणालात: “नाही, तू आमच्यावर एक राजा नेम.” तर आता आपापल्या वंशांप्रमाणे आणि घराण्यांप्रमाणे यहोवासमोर या.’” २०  मग शमुवेलने इस्राएलच्या सगळ्या वंशांना जवळ बोलावलं,+ आणि बन्यामीन वंश निवडला गेला.+ २१  मग त्याने बन्यामीन वंशातल्या सगळ्या घराण्यांना जवळ बोलावलं, आणि मात्रीचं घराणं निवडलं गेलं. शेवटी, कीशचा मुलगा शौल निवडला गेला.+ तेव्हा ते त्याला शोधू लागले, पण तो कुठेही सापडला नाही. २२  म्हणून त्यांनी यहोवाला विचारलं:+ “तो माणूस आलाय का इथे?” यहोवाने उत्तर दिलं: “पाहा, तो तिथे सामानात लपलाय.” २३  तेव्हा ते तिथे धावत गेले आणि त्याला घेऊन आले. शौल लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा तो सगळ्यात उंच दिसत होता; बाकीचे सगळे लोक फक्‍त त्याच्या खांद्याला लागत होते.+ २४  शमुवेल सर्व लोकांना म्हणाला: “यहोवाने ज्याला निवडलंय त्याला पाहा!+ सगळ्या लोकांत त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही.” तेव्हा सर्व लोक मोठमोठ्याने म्हणू लागले: “राजाला दीर्घायुष्य लाभो!” २५  मग, राजाला लोकांकडून काय-काय मागण्याचा हक्क आहे हे शमुवेलने सांगितलं.+ त्याने या सगळ्या गोष्टी एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ यहोवापुढे ठेवला. त्यानंतर शमुवेलने सर्व लोकांना आपापल्या घरी पाठवून दिलं. २६  शौलसुद्धा गिबामध्ये आपल्या घरी परत गेला. आणि ज्या शूरवीरांना यहोवाने प्रेरणा दिली तेसुद्धा शौलसोबत गेले. २७  पण काही दुष्ट माणसं म्हणाली: “हा काय आपल्याला वाचवणार?”+ त्यांनी त्याला तुच्छ लेखलं. शिवाय त्यांनी त्याच्यासाठी काही भेटही आणली नाही.+ पण शौल काहीच बोलला नाही.

तळटीपा

निमुळत्या तोंडाचं छोटं मडकं.
शब्दशः “वारशाचा.”